नयनरम्य समुद्रकिनारे, नारळी -पोफळीच्या बागा आणि कोकणी मेवा यापलीकडे कोकणात आदिम संस्कृतीच्या खुणा सांगणारी अनेक कातळशिल्पंही आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यंतील ही देखणी कातळशिल्पे आवर्जून पाहावी अशीच आहेत. आपली भटकंती डोळस असेल तर नक्कीच आपलं पर्यटन समृद्ध होईल.
कोकणातले पर्यटन सध्या खूपच लोकप्रिय आहे. अथांग समुद्र किनारे, वळणावळणाचे रस्ते, दुतर्फा गर्द झाडी, खाडय़ा, जुनी देवळे, सुंदर टुमदार कौलारू घरे आणि खास कोकणी चवीचे विविध खाद्यपदार्थ. अतिशय शांत रमणीय परिसर म्हणून कोकणामध्ये आवर्जून भटकंती केली जाते. पण कोकण म्हणजे नुसते समुद्रावर भटकणे, आंबे, फणस, काजू खाणे आणि माशावर ताव मारणे असं नाहीये. किल्ले, जुनी मंदिरे यांच्यासोबतच काही गूढ, चमत्कारिक आणि आश्र्चकारक निसर्गनवल देखील या प्रदेशात विखुरलेले आहे. गरम पाण्याचे झरे, बारमाही धबधबे याचसोबत सडय़ावर लांबच लांब परिसरात पसरलेल्या कातळावर खोदलेली कातळशिल्पे. इंग्रजीमध्ये याला पेट्रोग्लीथ असा शब्द आहे. आपल्या भटकंतीमधे ही कातळशिल्पे वेळ काढून पहिली पाहिजेत.
पर्यटकांबरोबरच पुरातत्व आणि इतिहासाच्या अभ्यासकांना सुद्धा कोकणाची भुरळ पडली. ही अभ्यासक मंडळी जसजसे शोध घेऊ लागली तसतसे एकेक निसर्गनवल समोर येऊ लागले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांमध्ये या कातळशिल्पे खूप मोठय़ा प्रमाणावर आहेत.
कातळावर ठराविक अंतराची चौकट खोदून घेतली जाते आणि त्यामध्ये ही कातळशिल्पे कोरली जातात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. पावसाळा संपल्यावर गेले तर ही शिल्पे अगदी ठसठशीत दिसतात. कारण त्याच्या बाजूला गवत उगवलेले असते आणि त्यामध्ये ही शिल्पे उठून दिसतात. पण नेमके असते काय या कातळशिल्पांमध्ये? मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आकृती इथे दिसतात. काही भौमितिक रचना आढळतात. वीजवाहक मनोरे आणि त्यांच्या तारा जशा दिसतील अशा काही रचनादेखील दिसतात. कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाटय़ाजवळ गावडेवाडी, भू, भालावल, देवीहसोळ, वेळणेश्वर या ठिकाणी ही कातळशिल्पे खोदलेली दिसतात. परंतु कोकणात इतरही अनेक ठिकाणी ती आढळतात. त्यासाठी जरा चौकस दृष्टी ठेवून फिरले पाहिजे.
दुसरी एक गंमतीची गोष्ट म्हणजे या कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे २०० मीटर इतक्या त्रिज्येमध्ये एखादी खोल दगडी विहीर आढळते. हा काही नियम नाहीये. परंतु, याचे प्रमाण खूप आहे. कदाचित ही शिल्पे खोदणाऱ्या लोकांसाठी ही सोय केली होती का? उत्तर अवघड आहे. याचप्रमाणे या कातळशिल्पांचे प्रयोजन काय होते? ती कोणी आणि का खोदली? हे सुद्धा अजून पुरते न उलगडलेले कोडे आहे. या सर्व कातळशिल्पांमध्ये अत्यंत देखणे शिल्प राजापूरजवळ बारसू गावी असलेल्या तारव्याचा सडा इथे पाहायला मिळते. राजापूरपासून देवाचे गोठणेच्या दिशेने गेले की १० किलोमीटरवर बारसू/बारसव गाव लागते. इथून डावीकडे एक रस्ता जातो. या रस्त्याने अंदाजे दीड किलोमीटर गेले की आपण एका देखण्या आविष्कारापाशी येऊन थांबतो. अंदाजे ५० फूट लांब आणि २० फूट रुंद अशी एक काळ्या खडकावर खोदचित्र चौकट आहे. काय आहे इथे. दोन वाघ एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांच्या मधेच एक मानवी आकृती या दोन वाघांना थोपवून धरते आहे असे चित्र खडकात खोदलेले आहे. पण खरे आश्चर्य पुढेच आहे. हेच चित्र जर विरुद्ध बाजूने समोर जाऊन पाहिले तर एक मोठ्ठे गलबत समुद्रातून चाललेले दिसते. त्याला शिडे आहेत आणि खाली पाण्याच्या लाटा, पाण्यामधले मासे असे सर्व दाखवले आहे. इतके सुंदर, अद्भूत आणि आखीव रेखीव चित्र पाहून थक्क व्हायला होते. असेच एक चित्र गणपतीपुळ्याला जाणाऱ्या निवळी फाटय़ावर होते. परंतु रस्तारुंदीकरणात ते निम्म्याहून अधिक संपले आहे. याची कोणालाही ना खेद, ना खंत. किमान या चित्राचे जतन तरी व्हायला हवे. हा अगदी दुर्मिळ असा ठेवा आहे.
या सर्व कातळशिल्पांचा अभ्यास रत्नागिरीतील अभ्यासक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे गेली अनेक वर्षे सातत्याने करीत आहेत. कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत विधिमंडळातसुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आपल्या पर्यटनात मुद्दाम लक्ष ठेऊन अशी काही ठिकाणे पहिली पाहिजेत. अनेक कातळशिल्पांच्या जवळच जुनी विहीर खोदलेली दिसते. स्थानिक याला पांडवांची विहीर म्हणतात. तशी विहीर दिसली तर थांबून त्या परिसरात शोध घ्यावा. शिल्पे मिळू शकतील. प्रत्येक सडय़ावर हे शिल्प पाहायला मिळतीलच असे नाही. आणि उगाच अभ्यास नसेल तर कोणत्याही रेखाटनाला शिल्प म्हणून प्रसिद्धीच्या मागे देखील लागू नये. परंतु जर डोळस भटकंती केली तर अशी अनेक निसर्गनवल पाहता येतील, अनुभवता येतील. कोकणातली आपली भटकंती आणखी समृद्ध होईल.
आशुतोष बापट  ashutosh.treks@gmail.com

प्रत्येक सडा हा काही शिल्पांकित नाही.
कातळशिल्पे दिसली तर त्यावर कचरा न करता जमेल तसा उंचावरून त्याचा फोटो घ्यावा.
आजूबाजूचे गवत काढून जागा स्वच्छ करावी पण चुना, खडूने रंगवू नये.
पावसाळा संपल्यावर गेले तर ही कातळशिल्पे ठसठशीतपणे उठून दिसतात.