कॅन्टोनिज भाषेत ‘हाँग’ म्हणजे सुवासिक किंवा सुगंधी आणि ‘काँग’चा अर्थ होतो बंदर. पूर्व आशियातील हे सुगंधित बंदर पूर्वापार व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. आधुनिक काळातही हाँगकाँग नाव धारण केल्यानंतर त्याचं हे महत्त्व कमी झालेलं नाही. हाँगकाँगला येणारा प्रत्येक जण इथल्या आधुनिक शहरात आणि मॉल्सच्या दुनियेत रममाण होत असला तरी पर्यटकांना मोहिनी घालणारी अनेक ठिकाणे तेथे आहेत.

हाँगकाँग राज्य हे अनेक छोटय़ा-मोठय़ा बेटांमध्ये विखुरलेला आहे. त्यातले सर्वात मोठे बेट म्हणजे मध्यभागी असलेले कावलून (ङ६’ल्ल). आणि उरलेले हाँगकाँग बेट, लामा (Lamma) आणि लॅनताऊ (Lantau) ही काही मुख्य बेटे आहेत. ही सर्व बेटं एकमेकांना उत्तम वाहतुकीनी जोडलेली आहेत. त्यामुळे आपल्यासारखा पर्यटक मेट्रो, बस, टॅक्सी आदी साधनांमध्ये बसून रुळलेल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांना जात असताना एकसंध भूमीवर फिरल्यासारखे वाटते. जरा वाट वाकडी आपण लॅनताऊ बेटावरील तुंगचुंग (ळ४ल्लॠ उँ४ल्लॠ) किल्ला आणि परिसर फिरून येऊ.

लॅनताऊ बेट हे हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागूनच आहे. लॅनताऊ बेटाच्या तुंगचुंग भागात पर्ल नदी समुद्रला जाऊन मिळते. साहजिकच पूर्वी पर्ल नदीच्या या मुखावरून चीनच्या मुख्य भूमीवर सहज प्रवेश करता येत असे. चिनी साम्राज्यातील क्विंग राजवटी (१६४४-१९११) दरम्यान या समुद्री प्रवेशमार्गाला अत्यंत महत्त्व मिळाले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात लॅनताऊच्या द्वीपसमूहावर ताई ओ (ळं्र ड) आणि तुंगचुंग ही दोन सुरक्षित स्थळं असल्याचं प्रकर्षांने लक्षात आलं. ताई ओ येथे फक्त ३० अधिकारी आणि सैनिक राहण्याची व्यवस्था होती. परंतु तिथून तुंगचुंगच्या नदी मुखावर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. चिनी प्रांतातील नोंदीनुसार, गुआंग्डोंग व ग्वांग्शी प्रांताचे व्हाईसरॉय जियांग युक्सियन आणि रुआन युआन यांनी तुंगचुंग हो (Tung Chung Ho) येथे रॉकी लॉयन हिलच्या पायथ्याशी तोफखान्यांच्या दोन तुकडय़ा (Battery) बांधण्याचे प्रस्तावित केले. तुंगचुंगला मजबूत किल्ला स्थापन झाला, वापरला गेला आणि जिज्ञासूंना एक ऐतिहासिक असं हटके ठिकाण मिळालं.

हाँगकाँगच्या कुठल्याही भागातून विमानतळाकडे जाणारे कोणतेही वाहन आपल्याला तुंगचुंगला आणून सोडते. मेट्रो रेल्वेने तुंगचुंगच्या भव्य स्टेशनवर उतरल्यानंतर लॅनताऊ बेटावरील पर्यटनस्थळांच्या नकाशासहित माहितीचे बोर्ड ठिकठिकाणी लावलेले आहेत. तुंगचुंगला उतरलेले पर्यटक बीग बुद्धा, गोंडोला रोप वे आदी ठिकाणांना गर्दी करतात. त्यातले दोन-तीन टक्के पर्यटक तुंगचुंग किल्ल्याकडे जात असावे. तुंगचुंग परिसरात फिरताना मुख्य किल्ला, समुद्रकिनाऱ्यावरील तुंगचुंग तोफखाना, फू तेई वॅन (Fu Tei Wan) येथील जुनी चुनाभट्टी, हाऊ वाँग मंदिर (Hau Wong Temple) आणि तीन हाऊ मंदिर (Tin Hau Temple) अशी हटके ठिकाणं एकमेकांपासून जवळजवळ आहेत.

तुंगचुंगमधील शींग लिंग पे व्हिलेजच्या बाजूला किल्ला आहे. आता हे व्हिलेज म्हणजे गगनचुंबी इमारतींचा चकचकीत भाग आहे. पण किल्ल्याच्या बाजूला बठय़ा आकाराची घरं दिसतात. तुंगचुंगचा किल्ला फार मोठा नाही आणि उंचही नाही.

संपूर्ण किल्ला ७० मीटर बाय ८० मीटर आकाराचा आहे. संपूर्ण तटबंदी आठ ते दहा फूट रुंदीची असून, ग्रेनाईट दगडाच्या मोठाल्या कोरीव चिऱ्यापासून बनविलेली आहे. किल्ल्याचा दर्शनी भाग उत्तराभिमुख असून मागच्या बाजूला रॉकी लायन नावाचा दाट वनाच्छादित डोंगर आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडील तटबंदीत मध्यभागी आहे. अत्यंत देखणे आणि कमानदार अशा प्रवेशद्वाराच्या माथ्यावर चिनी भाषेतून गँग चेन (Gong Chen) असा शिलालेख कोरलेला आहे. पूर्व आणि पश्चिम तटबंदीलाही दोन उपमार्ग आहेत. त्यावरही अनुक्रमे जि शिऊ (Jie Xiu) आणि लियन गेंग (Lian Geng) अशी अक्षरे कोरलेली आहेत. आज उन-वारा-पावसाने खराब झालेल्या ह्य़ा शिलालेखांच्या ओळी हा किल्ला ‘कप्तान हे जोंगोलंगच्या देखरेखीखाली दोगुआंग सत्तेच्या बाराव्या वर्षी (१८३२) पूर्ण झाला’ असा आशय दर्शवितात. क्विंग राजवटीत हा किल्ला तुंगचुंग बटालियन सिटीतील मुख्यालय म्हणून ओळखला जाई.

तुंगचुंगच्या मुख्य उत्तर तटबंदीवर एकूण सहा तोफा ठेवलेल्या आहेत. यातल्या चार तोफांवर लेख कोरलेले आहेत. त्यानुसार या इ.स. १८०५, १८०९ आणि १८४३ मध्ये तयार करण्यात आल्या आहेत. तोफांच्या चिनी अक्षरांमधून बोटं फिरवत आपण या किल्ल्याच्या ताकदीची कल्पना करू शकतो. पिवळसर अशा तटबंदीतून तपकिरी ठळक रंगाच्या या तोफा उठून दिसतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला तोफांबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला जात नाही.

संपूर्ण तटबंदीवरून मस्त फिरता येतं. अधूनमधून खाली उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. मध्यभागी काही ब्रिटिशकालीन इमारती दिसतात. सन १९८९ मध्ये न्यू टेरीटरीज्चा हा भाग ब्रिटिशांना भाडेतत्त्वावर दिला तेव्हा तुंगचुंग किल्ला त्यांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांनी प्रथम त्याचे एका पोलीस स्टेशनमध्ये रूपांतरण केले आणि १९३८ साली किल्ल्यात वाहियग कॉलेजची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी लोकांनी या किल्ल्याला व्यापलं होतं. १९४६ मध्ये तुंगचुंग पब्लिक प्राईमरी स्कूल आणि तुंगचुंग ग्रामीण कमिशनच्या कार्यालयासाठी हा किल्ला वापरण्यात आला. तुंग चुंग किल्ला २४ ऑगस्ट १९७९ रोजी एक स्मारक म्हणून घोषित करण्यात आला. संपूर्ण किल्ला अतिशय उत्तमरीत्या जतन आणि संवर्धित करण्यात आलेला आहे. या संवर्धनाच्या कामाची सर्व छायाचित्रे आणि त्यात गवसलेल्या सर्व वस्तू किल्ल्यातील संग्रहालयात माहितीसकट प्रदर्शित केलेल्या आहेत. या सर्व वस्तू निरखताना आपण गतकाळात हरवून जातो.

बाकी किल्ल्याच्या परिसरात पायी रपेट करून समुद्राच्या धक्क्याजवळ असलेला तुंगचुंग तोफखाना, फू तेई वान येथील चुन्याची भट्टी जरूर पाहावी. ही चुनाभट्टी भग्नावस्थेत सापडली होती. सन १९९१ साली तिची पुनर्बाधणी भारतीय गोरखा इंजिनीअर्सनी केलेली आहे. मस्त पायी भटकण्याची सवय असेल तर हाऊ वाँग आणि तीन हाऊ या दोन मंदिरांना अवश्य भेट द्यावी. कारण मंदिरांतून स्थानिक रिवाज आणि परंपरांचे दर्शन घडते. हाँगकाँगच्या चकचकीत आणि झगमगीत वातावरणात तुंगचुंगसारखी अनेक हटके स्थळं हरवलेली आहेत. गरज आहे अशी ठिकाणं बघण्याची आस असण्याची आणि जिज्ञासूवृत्तीने धुंडाळण्याची..

सुदर्शन कुलथे sudarshan.kulthe@gmail.com