गेल्या काही वर्षांत पर्यटनात काही नव्या प्रकारांची भर पडली आहे. त्यातला वाइन टुरिझम हा अलीकडचा प्रकार. परदेशात शेती, वायनरीच्या अनुषंगाने गुंफलेले पर्यटन नवे नाही. आता भारतातही ते वाढू लागले आहे.

गेल्या दशकापासून भारतात वाइनविषयी कुतूहल वाढले आहे. जागतिकीकरणानंतर संपूर्ण जगाची दारे उघडली गेली आणि भारतीयांच्या परदेशवाऱ्या वाढल्या. परदेशी खाद्यपदार्थानी जसे हळूच आपल्या जेवणात स्थान पटकावले तशी अनेक पेयेदेखील परिचित झाली. व्हिस्की, रम आणि बीयरपलीकडेही काही चांगली पेये असू शकतात हे कळले आणि वाइनशी नव्याने ओळख होऊ लागली.

भारतात काही ठिकाणी आधीपासून वाइन बनवली जात होती. पोर्तुगीजांचे राज्य असल्याने गोव्यात काही प्रमाणात वाइनचे उत्पादन होत होते; पण जेव्हा परदेशवारी करून आलेले भारतीय परदेशी वाइनसारख्या वाइनची अपेक्षा इथे करू लागले तेव्हा तशा प्रकारच्या वाइनचा अभाव जाणवू लागला. काही धाडसी उद्योजकांनी वाइनचे उत्पादन सुरू केले आणि भारतात चांगल्या प्रतीच्या वाइन्स मिळू लागल्या. आजघडीला भारतात बनवलेल्या काही वाइन्स जागतिक पातळीच्या वाइन्सच्या तोडीस तोड आहेत. नाशिक, बारामती आणि बंगळुरूच्या आजूबाजूचा प्रदेश, ही आपल्या देशातली वाइन उत्पादनाची मुख्य केंद्रे आहेत.

बरे, आता वाइन तर मिळू लागली, पण त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळायला वेळ लागला. इतर दारूसारखी ही सोडा किंवा पाण्याबरोबर पिता येत नव्हती. वाइनचे प्रकार इतके होते की, आपल्याला कोणती आवडू शकेल याचा बाटलीतून अंदाज घेणे कठीण होत असे. वाइन वितरकांना ‘तुम्ही नुसती ही विका,’ असं सांगून भागणार नाही हे लक्षात घेऊन, बऱ्याचशा उत्पादकांनीच ‘वाइन अप्रिसीएशन’च्या कार्यशाळा राबवायला सुरुवात केली. वाइन म्हणजे काय, ती कशी बनवली जाते, ती कशी नीट ठेवावी लागते, तिचा कसा सांभाळ करावा, कोणती वाइन कोणत्या टेम्परेचरला सव्‍‌र्ह करावी, ती कशी प्यावी आणि सर्वात मुख्य म्हणजे, जेवणाची आणि वाइन या दोन्हीची लज्जत कशी वाढेल, यासाठी कोणती वाइन कोणत्या पदार्थाबरोबर प्यावी, हे सर्व त्या कार्यशाळेत शिकवले जाई. काही कॉर्पोरेट्समधून, छोटय़ा गेट-टुगेदर्समधून या कार्यशाळा राबवल्या जाई. हळूहळू वाइनची ओळख शहरी भारतीयांना होऊ लागली.

पंचतारांकित हॉटेल्स आणि काही उच्च प्रतीच्या रेस्तरॉमधून वाइनची विक्री ‘बाय द ग्लास’ होऊ लागली. त्यामुळे वाइन टेिस्टगला वाव मिळाला आणि वाइनची लोकप्रियता वाढू लागली. आज खास वाइनचे प्रशिक्षण घेतलेले ‘सोमेलीए’ (रेी’्री१) जवळजवळ प्रत्येक नामांकित हॉटेलमध्ये असतात. त्याचे मुख्य काम म्हणजे कोणत्या पदार्थाबरोबर कोणती वाइन प्यावी हे सुचवणे. जेव्हा काही वाइनच्या बाटल्यांची किंमत पाच आकडय़ांमध्ये जाऊ शकते, तेव्हा त्यांचा सल्ला उपयोगी पडतो. वाढत्या वाइनच्या मागणीमुळे वाइनचे उत्पादन करणारे जगभरातील देश आज भारताकडे एक भराभर वाढणारी बाजारपेठ म्हणून कुतूहलाने पाहू लागले आहेत. काही भारतीय वाइन्सने जागतिक वाइन प्रदर्शनांमध्ये नाव कमावल्याने परदेशी वाइन कंपन्यांची भारतीय वाइन्सबद्दलची उत्सुकता अजून वाढली आहे. २००५ साली जेमतेम बोटावर मोजण्याएवढे क्वॉलिफाइड भारतीय सोमेलीए होते. आज जगातल्या पाच सोमेलीएंपकी एक भारतीय आहे.

 

वाइन टुरिझम म्हणजे काय?

अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर जे पर्यटन वाइनभोवती गुंफले असेल ते ‘वाइन टुरिझम’! त्यात वाइनरीला भेट देणे, वाइन टेिस्टग करणे, वाइन्स विकत घेणे आदी करता येते. काही ठिकाणी हंगामात द्राक्षाचे घोस उतरवण्यातही मदत करता येते. सर्वात धमाल अनुभव म्हणजे ‘स्टोिम्पग द ग्रेप्स’. आता वाइन जरी स्टेनलेस स्टीलच्या उपकरणांमध्ये बनवली जात असली, तरी एक आगळा अनुभव म्हणून पारंपरिक पद्धतीने द्राक्षांचा रस काढायची पद्धत गंमत म्हणून अनुभवली पाहिजे. लाकडाच्या एका प्रचंड मोठय़ा टबमध्ये द्राक्षे ओतून ती पायाने तुडवली जातात – अगदी व्यवस्थित नाचून!

वाइनरीजने आज वाइनचे पर्यटन अगदी मनावर घेतले आहे. हंगाम नसताना द्राक्षे उतरवणे आणि नंतर ती तुडवणे, असे करता येत नाही. तर मग पर्यटकांना आपल्याकडे आकर्षति करायला त्यांनी उत्तम प्रतीची हॉटेल्स काढून वर्षभराच्या पर्यटनाची सोय केली आहे. त्यातल्या रेस्तरॉमधल्या मेन्यूमधले पदार्थदेखील आपल्याच विनयर्डमधल्या वाइनबरोबर खाण्याजोगे असतात. काही वाइनरीजने वाइन करून उरलेल्या चोथ्याचा वापरही ‘स्पा’मध्ये केला आहे. ग्रेपसीड’ म्हणजे द्राक्षाच्या बियांमध्ये ओषणी गुण असल्याने ते निरनिराळ्या ब्युटी थेरपीजमध्ये वापरले जाते.

आज असे दिसून येते की, वाइनचे दर्दी आपल्या सुट्टीतले फिरणे वाइनच्या भोवती ठरवतात आणि भारतीयही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. सुट्टीची मजा, वाइनबद्दलच्या ज्ञानात भर आणि एक अनोखा अनुभव हे तिन्ही एकत्र आणल्यामुळे ‘वाइन टुरिझम’ लोकप्रिय झाले आहे. अनेक भारतीयदेखील वाइनच्या ‘ओल्ड वर्ल्ड’ देशांना – ( मुख्यत: फ्रान्स, इटली आणि स्पेन) भेट देतात. फ्रान्समध्ये बोर्दो, बरगंडी ही ठिकाणे वाइन टुरिझमसाठी प्रसिद्ध आहेत. स्पेनमध्ये रीओहा, अंदालुशिया, जर्मनीमध्ये ऱ्हाइन, मोसेल नद्यांच्या काठाने विनयर्डस आहेत. कॅलिफोíनयातील नापा आणि सोनोमा, दक्षिण आफ्रिकेत क्लाइन कारू, इस्टर्न केप, ऑस्ट्रेलियामध्ये दक्षिण ऑस्ट्रेलिया, न्यू साऊथ वेल्स ही वाइन टुरिझमची केंद्रे आहेत.

वाइन टुरिझम आज भारतातही छोटय़ा प्रमाणात का होईना तग धरायला लागले आहे. महाराष्ट्रात नाशिक, अकलूज, नारायणगावच्या परिसरात, कर्नाटकात बंगळुरूच्या नंदी हिल्स परिसरात वाइनची लागवड केली जाते आणि तिकडच्या वाइनरीजमध्ये संपूर्ण वाइन टुरिझमचा अनुभव घेता येतो. सध्याचा मोसम हा आपल्या देशात वाइन टुरिझमसाठी  उत्तम आहे.

पर्यटनासाठी ऑस्ट्रेलिया अनेक बाबतीत प्रसिद्ध आहे. तसाच तेथील वातावरणात वाढलेल्या द्राक्षांमुळे तो वाइनरीजसाठीदेखील प्रसिद्ध आहे. बरोसा, अ‍ॅडलेड हिल्स आणि क्लेअर या तीन ठिकाणच्या वाइनरीज पाहिल्याशिवाय ऑस्ट्रेलियातील भटकंती पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही.

क्लेअर व्हॅलीचा परिसर हा वाइनच्या उत्पादनासाठी सर्वात जुना असा प्रदेश म्हणता येईल. एकटय़ा क्लेअर व्हॅलीमध्येच ४० हून अधिक वाइनरीज आहेत. साधारण ४० किलोमीटरच्या परिसरात हा वाइन उद्योग एकवटला आहे. अबुर्न आणि क्लेअर व्हॅलीदरम्यान अनेक ठिकाणचे निसर्गसौंदर्य परिसरात ३६ किलोमीटरचे सायकल रुटवरून भटकून हे सारे पाहता येते. साधारण तीन तास लागतात. वाइन साठवलेल्या अनेक तळघरांनादेखील भेट देता येते. १८५१ साली सुरू झालेल्या वाइनरीजच्या खुणा दर्शविणारे ज्यू मॉनेस्ट्री आणि सेवनहिल परिसरातील ही ठिकाणे, क्लेअरव्हॅली संग्रहालय ही येथील पर्यटनाची अन्य आकर्षणे.

पर्थच्या दक्षिणेस असणारी मार्गारेट व्हॅली ही वाइन आणि खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे. वाइन साठवलेल्या तळघरांना आपण भेट देऊ शकतो, वाइनचा आस्वाद घेता येते. या परिसरात तब्बल १२० वाइनरीज आहेत.  बरोसा व्हॅलीमध्ये तर वाइनचा उद्योग १८४२ पासून सुरू आहे. वाइनच्या साठवणुकीची जवळपास ५० टक्के ठिकाणे खुली असतात.

गौरी खेर – मेलरॉय फर्नाडिस

hosquo@gmail.com