डोकलामच्या वादातून गेला महिनाभर भूतान हा आपला शेजारी देश राजकीय आणि लष्करी बाबतीत असंतोषाचे कारण ठरला आहे. पण पर्यटनदृष्टय़ा भूतान हा आजही आपणा भारतीयांसाठी भटकंतीचा खजिना आहे.

शांत, सुंदर, निसर्गरम्य, अगत्यशील अशी अनेक बिरुदे मिरवणारा भूतान हा भारताचा शेजारी देश. आधुनिकीकरणाचे अजीर्ण झालेल्या आजच्या काळात भूतान मात्र आजही आपली पाळंमुळं घट्ट रोवून उभा आहे. पर्यटनाच्या नकाशावर आजही आपल्या देशातील ईशान्येकडील राज्ये ही विकासाच्या प्रतीक्षेतच आहेत. मात्र, या राज्यांच्या शेजारी असलेला भूतान मात्र भारतीय पर्यटकांनी बऱ्यापकी गजबजलेला असतो. भारताशी असलेल्या मत्रीपूर्ण संबंधांमुळे भारतीय पर्यटकांना इतर परदेशी पर्यटकांच्या तुलनेने खर्चात होणारी बचत ही त्यातील जमेची बाजू (भारताव्यतिरिक्त इतर पर्यटकांना  व्हिसापोटी मोठी रक्कम मोजावी लागते).

Mayank Yadav for bowling record 155 point 8 kmph against PBKS
Mayank Yadav : ‘… कुठे लपला होतास’, माजी दिग्गज डेल स्टेनकडून भारताच्या युवा वेगवान गोलंदाजाचे कौतुक
Pune, Pune Ring road
पुणे : आचारसंहितेमुळे रिंगरोडच्या भूसंपादनाला ब्रेक
Sealed by an international organization on the name Chandrayaan 3 landing site Shiva Shakti
‘शिवशक्ती’ नावावर आंतरराष्ट्रीय संघटनेचे शिक्कामोर्तब
Cycle track Palm Beach route
सायकल ट्रॅक की वाहनतळ? पामबीच मार्गालगतच्या बहुचर्चित सायकल ट्रॅकचे ११.५८ कोटी रुपये वाया जाणार

खरं म्हणायचं तर भूतानच्या पर्यटनाचादेखील एक साचा झालेला आहे. पण त्या साच्यातूनदेखील वेगळा मार्ग शोधायचा असेल तर शोधता येतो. त्यापकीच एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे टायगर मोनेस्ट्री.

भूतानची शान असलेली टायगर नेस्ट मोनेस्ट्री पारोपासून अवघ्या १२ किलोमीटरवर आहे. पण हे ठिकाण एका कडय़ावर आहे. भूतानी लोकं यालाच ताकसांग मोनेस्ट्री म्हणतात. डोंगरात ३१२० मीटर उंचीवर असलेल्या या मोनेस्ट्रीला भेट देण्यासाठी पायथ्याच्या ताकसांग गावातून दोन तासांचा ट्रेक करून जावे लागते. या ट्रेकचे तीन टप्पे आहेत. बहुतांश लोकं पहिल्या टप्प्यापर्यंत ट्रेक करतात. येथे कॅफेटेरिया असून, येथपर्यंत खेचरांच्या पाठीवर बसूनही जाता येते. कॅफेटेरियाच्या परिसरातून ढगांशी लपंडाव खेळणाऱ्या ताकसांग मोनेस्ट्रीची झलक पाहणे हाही एक खासा अनुभव असतो. कॅफेटेरियाच्या पुढची चढाई मात्र पायीच करावी लागते. सायप्रस वृक्षांच्या दाट जंगलातून चढणारी ही पायवाट पुढे पुढे निमुळती होत जाते. चढाई पण तीव्र होते. दुसरा टप्पा म्हणजे या ट्रेकचा सगळ्यात उंचावरील भाग. येथून ताकसांग मोनेस्ट्री अगदी नजरेच्या समांतर टप्प्यावर दिसते. मात्र ती डोंगराच्या पलीकडील कडय़ात असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी येथून काहीशा पायऱ्या उतरून, एक धबधबा ओलांडून, पुन्हा तेवढय़ाच पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्यांची ही चढ-उतर अनेकांना झेपत नाही. त्यामुळे निम्मे पर्यटक येथून परततात. पण हा तिसरा कष्टदायी टप्पा पार करून गेल्यावर मात्र जेव्हा आपण ताकसांग मोनेस्ट्रीजवळ पोहचतो, ती मोनेस्ट्री आतून फिरून पाहतो तेव्हा कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते.

या मोनेस्ट्रीबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, पद्मसंभवा वाघावर स्वार होऊन येथे आले. त्यांनी येथे ३ वर्षे, ३ महिने, ३ दिवस, ३ तास खडतर तपश्चर्या करून विनाशकारी, विध्वंसक शक्तींपासून येथील जनतेची सुटका केली. मूळ मोनेस्ट्री जरी इसवी सन १६०० मध्ये बांधली असली तरी वेगवेगळ्या काळात येथे नवनवीन बांधकाम करण्यात आले आहे. कडय़ाच्या पोटात असलेल्या गुहेत बसून गुरूंनी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. मोनेस्ट्रीच्या आवारातून पारो व्हॅलीमध्ये दूरदूर पसरलेल्या डोंगररांगा आणि त्यातून वाहणाऱ्या नदीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. तेथील आध्यात्मिक अनुभूतीबद्दल माहीत नाही, पण एकूणच त्या वातावरणात एक अनोखा आनंद सामावलेला असतो. पण हा आनंद सर्वच पर्यटक घेतातच असे नाही. मोनेस्ट्रीपर्यंत पोहचण्यासाठी संपूर्ण ट्रेक करायला ३ ते ५ तास लागतात. पायथ्याशी असलेल्या सरकारी कचेरीतून तिकीट (प्रत्येकी ५०० रुपये) घ्यावे लागते. भूतानी जनतेसाठी ही एक धार्मिक श्रद्धा स्थान असून, आयुष्यात एकदा तरी भूतानी लोक या मोनेस्ट्रीला भेट देतातच.

भूतानमध्ये आवर्जून पाहावी अशी दुसरी एक वास्तू म्हणजे पुनाखा शहरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले डोंगरात बांधलेले ‘खामसुम युलेय नामग्याल चोरटन’. ही एक अद्भुत वास्तू आहे. भूतानच्या राजमातेने १९९० साली तत्कालीन राजाच्या आणि भूतानी प्रजेच्या सुखशांती-समृद्धीसाठी या वास्तूची निर्मिती करवून घेतली. मो चू नदीवरील झुलता पूल ओलांडून मिरची आणि भाताच्या शेताच्या बांध्यावरून चालत साधारण पाउण तासाची सोपी चढाई करत या मंदिरापर्यंत पोहोचता येते. हे बांधकाम अर्वाचीन असले तरी येथील कलाकुसर प्राचीन कलेच्या तोडीची आहे. या चार मजली वास्तूचा एक एक मजला वर चढत जाताना येथील िभती, छत, महिरिपवरील चित्रे आणि नक्षीकाम पाहून आपण थक्क होऊन जातो. भडक रंग, वळणदार नक्षीकाम, फुल, पान, पशु, पक्षी, मनुष्य सगळं काही या चित्रांमध्ये समाविष्ट झालं आहे.

मंदिराच्या गच्चीवरून अमनकोरा आणि पुनाखा व्हॅलीमधील भात शेती, त्यातून वाहणारी पुनाखा नदी, दोन्ही बाजूला पसरलेल्या जंगलाने वेढलेल्या डोंगररांगा असा भित्तीचित्रागत दिसणारा मंत्रमुग्ध करणारा देखावा पाहून आपण बराच वेळ येथे रेंगाळतो. मंदिराच्या आवारात आवोकाडो, पीच वगरेची झाडे लावलेली आहेत. वाटेवर तसेच आवारात मोठाली प्रार्थना चक्रं बसवलेली आहेत.

‘पुनाखा झोंग’ म्हणजेच पुनाखा किल्ला. तो ‘मो चू’ आणि ‘फो चू’ या नद्यांच्या संगमावर बांधण्यात आला आहे. पुनाखा झोंग हा भूतानमधील दुसऱ्या क्रमांकाचा जुना किल्ला आहे. हीच भूतानची हिवाळी राजधानीसुद्धा आहे. भक्कम तटबंदीच्या आत अनेक वास्तू पाहायला मिळतात. कचेऱ्या, अधिकाऱ्यांच्या राहण्याच्या खोल्या, स्वयंपाकघर आणि त्याच जोडीला एक मोनेस्ट्री. पर्यटकांना फक्त मोनेस्ट्री पाहण्याची परवानगी असते.

भूतान हा देश तसा छोटासाच देश. सारा प्रवास डोंगराळ भागातून होणारा. त्यातही सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खाजगी वाहतुकीवर अधिक भर. चारही बाजूंनी वेढेलेले डोंगर, मधून वाहणारी एखादी नदी आणि त्याच्या बाजूने वसलेली वस्ती. असं एक टिपिकल दृश्य भूतानमध्ये कोणत्याही गावापाशी पाहायला मिळते. परदेशी पर्यटकांचे हे आवडते ठिकाण. चार पैसे जास्त मोजूनही ते येथे येतात. कारण येथील शांतता, निसर्गरम्य आणि प्रदूषणविरहित जीवनशैली याची त्यांना ओढ असते. भारतीय पर्यटकही तेथे सध्या खूप वाढले आहेत. पण भूतानच्या भटकंती जाणवले की, आपण भारतीय तेथेदेखील आपल्या नेहमीच्या सवयी सोडत नाही. मुख्यत: उत्तर भारतीय पर्यटक ज्या पद्धतीने वागतात त्याबद्दले तेथील मार्गदर्शक आणि महिला काहीसा नाराजीचाच सूर काढतात. अगदी मूलभूत नागरी जाणिवादेखील आपल्याला नाहीत. पण आपल्याला हे जाणवले तर पाहिजे. आज सुखी माणसांचा म्हणून ओळखला जाणारा हा देश वाढवायची जेवढी जबाबदारी तेथील नागरिकांवर आहे तेवढीच आपल्यावरही आहे.

प्रीती पटेल patel.priti28@gmail.com