कुठलीही नवीन वस्तू घेताना शरीराच्या ठेवणीनुसार काही विशिष्ट आकाराच्याच वस्तू आपण विकत घेतो. त्याचप्रमाणे आपल्याला सायकल चालवण्याचा आनंद लुटायचा असेल तर योग्य फ्रेमच्या आकाराची सायकल विकत घेणं अतिशय आवश्यक आहे. मुख्य म्हणजे रंग आणि फॅन्सी मॉडेलच्या नादी न लागता तुमच्या शरीराची रचना, त्याचा उपयोग लक्षात घेऊन सायकल खरेदी करायला हवी. तसे न केल्यास शरीराच्या एखाद्या अवयवाच्या दुखण्याने डोके वर काढल्यास त्याचा दोष सायकलला दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सायकल विकत घेतानाच खबरदारी घेणं किंवा असलेल्या सायकलमध्ये वेळीच आवश्यकतेनुसार बदल करणं अतिशय गरजेचं आहे. चुकीच्या फ्रेमची सायकल चालवण्याने शरीराचा आवश्यक व्यायाम होत नाहीच. शिवाय तुम्हाला विकतचे दुखणे मिळू शकते. खरेतर सायकल चालविणे एक असा प्रकार आहे की, जी तुम्ही कितीही वेळ चालवली तरी त्याचा तुमच्या शारीरिक हालचालींवर काहीच परिणाम होत नाही. झालाच तर त्याचा फायदाच होतो.

अलीकडे सायकलचं तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे की, तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक सायकल फिटनेस किटवर बसून त्याने दिलेल्या मोजमापांच्या आधारे शरीररचनेनुसार तुम्हाला ज्या ब्रॅन्डची सायकल हवी आहे तिचीदेखील निवड करू शकता. परंतु, आपल्याकडे हे तंत्रज्ञान नाक्यानाक्यावर उपलब्ध नाही. त्यामुळेच काही प्राथमिक गोष्टींची माहिती आपणास असणे आवश्यक आहे. शेल्डन ब्राऊन या प्रसिद्ध अमेरिकन सायकल मेकॅनिक आणि तांत्रिक बाबींच्या तज्ज्ञाने याबाबत भरपूर लेखन करून ठेवले आहे. त्यांच्याच नावाने असलेल्या संकेतस्थळावर तुम्ही ते वाचू शकता.

सायकल घेताना  किंवा सायकलमध्ये बदल करायचे असतील तर  चार महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वय, शरीराची लवचिकता, सायकल चालविण्याची पद्धत आणि तुमच्या शरीराला झालेली एखादी मोठी इजा (उदा. फ्रॅक्चर). या गोष्टी विचारात घेतल्या की तुम्हाला सायकलची निवड करणे आणि त्यामध्ये बदल करणे सोपे होईल. त्याचप्रमाणे खाली नमूद केलेल्या शरीराच्या अवयवांचे आणि सायकलच्या मुख्य भागांचे मोजमाप करून जे गुणोत्तर प्रमाण निघेल त्यातून तुमच्या शरीरयष्टीला आवश्यक त्या फ्रेमची सायकल तुम्हाला निवडता येऊ शकते. किंवा असलेल्या सायकलमध्ये गरजेनुसार बदल करता येऊ शकतात.

शरीराच्या या अवयवांचे मोजमाप करणे आवश्यक

  • पायाच्या तळव्यांची लांबी
  • इन्सिम लांबी (पायाच्या टाचांपासून बसण्याच्या जागेपर्यंतचे उभे अंतर)
  • हात, पाय आणि डोके वगळून तुमच्या धडाच्या भागाची लांबी
  • हाताची लांबी (खांद्यापासून बोटांपर्यंत)

सायकलच्या या गोष्टींचे मोजमाप करणे आवश्यक

  • टॉप ट्यूब लांबी (तुमच्या बसण्याच्या जागेपासून हँडलपर्यंतच्या मधल्या आणि सर्वात वरच्या बारची लांबी)
  •  स्टेमची लांबी (सायकलची फ्रेम आणि हँडलला जोडणारा छोटा बार)
  • सीट हाइट रेंज (पेडलपासून तुमच्या बसण्याच्या सीटपर्यंतची लांबी)

स्पिरिट लेव्हल

घरच्या घरी वेगवेगळी मोजमापे अचूक पद्धतीने घेण्यासाठी ‘स्पिरिट लेव्हल’ हे मोबाइल अ‍ॅप तुम्हाला उपयोगी पडू शकते.

prashant.nanaware@expressindia.com