एका दांडय़ाने जोडलेली दोन लाकडी चाके इतकेच जगातील पहिल्या सायकलचे मूळ स्वरूप होते. मात्र, १८८७ मध्ये सायकलच्या जगतात जॉन बॉइड डनलॉप यांच्या रबरी टायरने खरी क्रांती केली. लाकडी चाक मागे पडून भरीव, मऊ रबराचे आणि रबरी नळीत हवा भरून फुगविलेले टायर वापरात आले. गती आणि सोय या दृष्टीने हवा भरलेले टायर सर्वापेक्षा उत्तम ठरले. १८८८ मध्ये डनलॉप कंपनीने न्यूमॅटिक टायर्सची कल्पना अस्तित्वात आणली आणि दुचाकी चालवणे सुखावह झाले. एका तासात सुमारे २५ किलोमीटरहून अधिक अंतर कापण्याचा विक्रम एफ. एल. डॉड्स या सायकलपटूने २५ मार्च १८७६ रोजी प्रस्थापित केला. तेव्हा सायकली भरीव टायरच्या असल्याने त्यांचा वेग कमीच असे. त्यानंतर हवेचे टायर वापरात आल्यापासून सायकलचा वेग वाढत गेला. १९४२ मध्ये फॉस्टो कोपी या सायकलपटूने एका तासात ४५.८५ किलोमीटरचे अंतर कापले होते.
रिम, स्पोक आणि हब हे चाकाचे तीन मुख्य भाग. परंतु सायकलचे चाक धावते ते रिमवर बसवले जाणारे टायर आणि त्यामध्ये असलेली हवा भरून फुगवता येणारी रबरी नळी म्हणजेच टय़ूब यामुळे. आजघडीला तुम्ही जगातील कुठलीही सायकल घेतलात तर तिच्या चाकाला टायर आणि टायरच्या आत रबराची गोल आणि वर्तुळाकार नळी बसवून त्यात हवा भरावयाची सोय केलेली असते. आपल्याकडे तीन प्रकाराच्या सायकल प्रचलित आहेत. रोड सायकल, हायब्रीड आणि माऊंटन सायकल.
रोड सायकल : साधारणपणे सपाट पृष्ठभागाचे अतिशय पातळ टायर या सायकलला असतात. लांब पल्ल्याच्या सपाट रस्त्यावर चालवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहेत. चाकांच्या किनारी अरुंद असतात आणि विशेष प्रकारची टय़ूब व टायर वापरतात.
हायब्रीड सायकल : या सायकलचे टायर मध्यम जाडीचे असतात. टायरचा पृष्ठभाग थोडाबहुत आकार दिलेला असतो. शहरातील डांबरी रस्त्यांवर आणि ट्रेलमध्ये अशा दोन्ही ठिकाणी याचा वापर करता येऊ शकतो. आकाराने मोठी चाके,टायरची कमी जाडी असल्याने ही सायकल वेगाने जाते.
माऊंटन सायकल :सहज नजरेत भरणारे, नक्षीदार, वजनाला जड आणि आकाराने जाड टायर या सायकलींना असतात. खडबडीत किंवा डोंगरद-यांमधील चढ-उताराच्या मातीच्या रस्त्यांवर हे टायर अतिशय उपयुक्त ठरतात. जाडी,मजबूत आणि नक्षीमुळे हे टायर दगडगोटय़ांमध्येही पकड घेतात.

टायरची काळजी कशी घ्याल?
* टायरची स्वच्छता करताना त्याच्या नक्षीमध्ये अडकलेले छोटे दगडाचे खडे आणि इतर गोष्टी जरूर काढाव्यात.
* सायकलचे ब्रेक्स टायरला घासले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
* सपाट रस्ता असो वा जंगल, सायकल चालवताना नेहमी चांगली वाट निवडा.
* लांब पल्ल्याच्या सायकल सफरीवर जाताना कमीत कमी एक नवीन टायर सोबत ठेवावा.
* लांब पल्ल्याच्या सायकल सफरीवर जाताना टायर कुठेही फाटला नसल्याची खातरजमा करून घ्यावी.
* सायकल सफरीवर असताना टायर फाटल्यास शक्यतो नवीन टायर बसवावा.
* टायरला चिर गेला असल्यास त्याला आतल्या बाजूने रबरी पॅच लावावा जेणेकरून आतली टय़ूब सुरक्षित राहील.
* टायरमध्ये नवीन टय़ूब घालण्याआधी टायरच्या आतून बाहेरून काही टोकदार वस्तू अडकलेली नाही, याची खात्री करून घ्यावी.
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com