इसवी सन आठव्या शतकात उत्तर अटलांटिक समुद्रातील स्कँडिनेव्हियन् देशांमध्ये समुद्री हल्लेखोरांची एक साहसी जमात होती. त्यांना ‘व्हायकिंग्ज्’ असे म्हणत. स्कँडिनेव्हिया द्वीपकल्पातील अनेक देशांमध्ये पोलादाच्या खाणी होत्या. त्यासाठी युरोपातील अनेक देशांची व्यापारी जहाजे उत्तर समुद्रातून ये-जा करीत. तेव्हा हे व्हायकिंग्ज् शिडांच्या बोटींनी समुद्रात जाऊन त्या जहाजांवर हल्ले करून लुटालूट करीत. या व्हायकिंग लोकांच्या वस्त्या आíक्टक वर्तुळाजवळच्या नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आदी देशांमध्ये होत्या. त्यांच्या अनेक उपजाती होत्या. हे लोक अतिशय रांगडे, अशिक्षित, लढवय्ये आणि कुशल दर्यावर्दी होते. अत्यंत पुरातन अशी ‘नॉर्स’ भाषा ते बोलत. आठव्या शतकानंतर पुढे अकराव्या शतकापर्यंतचा तीनशे वर्षांचा काळ हा स्कँडिनेव्हियन् देशांमध्ये ‘व्हायकिंग युग’ म्हणून ओळखला जात असे. त्यामुळे आम्ही स्कँडिनेव्हियाच्या दौऱ्यावर निघालो तेव्हा आपण ‘क्रूर, हल्लेखोर समुद्री चाच्यांच्या’ मुलुखात जातोय ही भावना मनात होती, पण आम्ही डेन्मार्कच्या कोपेनहेगन या राजधानीच्या शहरात पोहोचलो तेव्हा ध्यानी आले की, या देशाचे ते जुने रूप आता पार बदलून गेलेले आहे. आजचे कोपेनहेगन शहर हे अत्यंत स्वच्छ, नीटनेटके आणि जगातील सर्वात सुखी मानले गेलेले शहर आहे. या शहरातील नागरिक इतर नॉíडक देशांतील लोकांप्रमाणेच प्रगत आणि सुधारलेले आहेत. अर्थात इथल्या नागरी समाजात जुन्या साहसी व्हायकिंग संस्कृतीचा अभिमान बाळगणारे लोक आजही भरपूर आहेत. आता इतिहासजमा झालेले त्यांचे पूर्वज आक्रमक असले तरी ते गुणी होते, असे इथले नागरिक सांगतात. ते लोक मातीची कलात्मक भांडी, लोकरीचे विणलेले कापड, सोने-चांदीसारख्या धातूंचे दागिने, दगड-ब्राँझ-तांबे-लोखंड यांच्या मूर्ती आणि तरतऱ्हेची वाद्ये  निर्माण करणारे कुशल कारागीर होते. निरनिराळ्या धातूंची शस्त्रे निर्माण करण्यातही ते वाकबगार होते. त्या जुन्या व्हायकिंग संस्कृतीतून अनेक चांगल्या परंपरा, गाणी आणि लोककथा आजच्या डॅनिश संस्कृतीने उचललेल्या आहेत असे इथले लोक सांगतात. डेन्मार्कच्या पुरातन लोककथांचे पुनरुज्जीवन तिथल्या अनेक लेखकांनी आपापल्या लेखनातून केलेले आहे.

लहान मुलांसाठी अजोड अशा परीकथा लिहिणाऱ्या हॅन्स ख्रिश्चन अँडरसन या सुप्रसिद्ध डॅनिश कथालेखकाने १८३७ मध्ये अशाच एका लोककथेवर आधारित ‘लिट्ल मरमेड’ नावाच्या मत्स्यकन्येची कथा लिहिली. डेन्मार्कच्या समुद्रात पाण्याखालच्या जगात राज्य करणाऱ्या समुद्री राजाची एक लाडकी मुलगी होती. तिचे वरचे अध्रे अंग स्त्रीचे आणि खालचे अध्रे अंग माशाचे होते. त्यामुळे तिला मत्स्यकन्या म्हटले जात असे. ही मत्स्यकन्या एकदा पाण्याच्या पृष्ठभागावर आली असताना किनाऱ्यावर राज्य करणारा एक देखणा राजपुत्र तिला दिसला. त्या राजपुत्राच्या मोहाने मत्स्यकन्येने एका चेटकिणीमार्फत स्वत:च्या माशासारख्या शेपटीचे रूपांतर दोन मानवी पायांत करून घेतले. आणि मग समुद्राबाहेर येऊन आपल्या डौलदार पायांनी चालत ती मत्स्यकन्या त्या राजपुत्राकडे गेली आणि त्याच्यासोबत राहू लागली. काही वर्षांनी त्या राजपुत्राने शेजारच्या राज्यातील राजकन्येशी विवाह करण्याचे ठरवले. त्यामुळे मत्स्यकन्येने त्याला ठार केले. त्याप्रसंगी उडालेल्या रक्ताचे काही थेंब मत्स्यकन्येच्या पायांवर पडले आणि तिच्या पायांचे रूपांतर पूर्ववत माशाच्या शेपटीत झाले. त्यामुळे ती मत्स्यकन्या समुद्रात परत गेली आणि मग ती कायमची समुद्रातच राहू लागली, अशी ती डॅनिश् लोककथा आहे. कोपेनहेगन शहराच्या लॅन्गेलिनी भागात खडकाळ समुद्रकिनारी एका उंच दगडावर या मत्स्यकन्येचा पुतळा बसवण्यात आला आहे. १९०९ साली हा ब्राँझचा पुतळा एडवर्ड एरिक्सन् नावाच्या शिल्पकाराने तयार केला. हा पुतळा तुलनेने अगदी छोटा, चार फूट उंचीचा आहे. तिकडच्या एका बियर कारखानदाराने या मत्स्यकन्येच्या कहाणीवर आधारित असे एक बॅलेनृत्य पाहिले होते. त्या गृहस्थाने मत्स्यकन्येचा हा पुतळा उभारण्याचे ठरवले. नृत्यनाटय़ात ज्या अभिनेत्रीने मत्स्यकन्येची भूमिका केली होती, तिनेच या पुतळ्यासाठी शिल्पकारासमोर मॉडेल म्हणून बसावे अशी त्याची इच्छा होती; परंतु पुतळा नग्न मत्स्यकन्येचा असल्याने त्या अभिनेत्रीने मॉडेल बनण्यास नकार दिला. अखेर त्या शिल्पकाराने पुतळ्याचा फक्त चेहराच सदर अभिनेत्रीच्या चेहऱ्यासारखा केला आणि बाकीचे शरीर मात्र स्वत:च्या पत्नीच्या शरीरासारखे केले. १९१३ सालच्या ऑगस्ट महिन्यात या पुतळ्याचे रीतसर अनावरण केले गेले. तेव्हापासून कोपेनहेगनचा हा मत्स्यकन्येचा पुतळा साऱ्या जगासाठी एक आकर्षण बनून राहिला आहे.

विजय दिवाण  vijdiw@gmail.com