स्नोडोन हे इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात उंच शिखर (३५६०फूट). तशा इंग्लंडमध्ये डोंगररांगा मर्यादितच. युनायटेड किंग्डममधील स्कॉटलण्डचे बेन नेव्हिस, वेल्सचे स्नोडोन आणि इंग्लंडचे स्काफेल पाइक ही तीन शिखरे डोंगरभटक्यांच्या प्रतिष्ठेची. ही तीन शिखरे चढून गेलो की आपण काही तरी मिळवले अशी एकंदरीतच भावना. हे डोंगर किती कठीण आहेत, वगैरे बाबींपेक्षा एकूणच तेथील निसर्गसौंदर्य आणि तेथील व्यवस्था पाहिल्यास डोंगरभटकंतीचा निखळ आनंद मिळतो. स्नोडोनचे रूप प्रत्येक ऋतूनुसार बदलत असते. हिवाळ्यात त्याच्या माथ्यावर साचलेला पांढरा शुभ्र बर्फ असो की उन्हाळ्यातील हिरव्या पिवळ्या रंगाच्या छटा. हे सारेच तुम्हाला अफलातून अनुभव देणारे असते. इथली दृष्य डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत.

सर्वसाधारण फिटनेस असेल तर तुम्ही आरामात स्नोडोनचा ट्रेक  करू शकता. प्रवास तसा मोठा आहे, पण एकूणच निसर्गसौंदर्यामुळे आनंददायी आहे. या डोंगरावर चढायला एकूण सहा मार्ग आहेत. पायथ्याच्या कॅफेमध्ये एक स्वतंत्र माहितीकेंद्र असून त्यामध्ये तुम्हाला या मार्गाची, तेथील हवामानाची संपूर्ण माहिती मिळते. त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन केले जाते. अगदी सुरुवातीला तर त्या दिवसाचे हवामान आणि अंदाज एका बोर्डावर लिहिलेले असतात. त्यामुळे त्यानुसार तुम्ही तुमचा ट्रेक आखू शकता. सर्व सहा मार्गाची सुरुवात एकाच ठिकाणी नसल्यामुळे आपल्याला कोणत्या वाटेने जायचे, त्यानुसार पार्किंग निवडावे लागते. स्नोडोनच्या सहाही मार्गाची काठिण्य पातळी सारखीच फक्त दिशा वेगवेगळ्या आणि काही हौशी पर्यटकांसाठी रेल्वेची सोयही आहे. पण ती फक्त इथल्या उन्हाळ्यात सुरू असते. कितीही प्लानिंग केले तरी राणीच्या देशात पार्किंगची गुगली खेळणं काही सोपं नाही. त्यामुळे कधी कधी ठरलेल्या जागेपेक्षा दोन किलोमीटर आधी पार्क करायला लागल्यामुळे अनायसे वॉर्मअप होऊन जाते.

मायनर्स ट्रॅकने जाताना स्नोडोन ढगांची वाट अडवून बसलेला दिसतो. तलावांच्या सोबत जाता जाता रस्त्यात अनेक ट्रेकर्सची हसत बोलत साथ मिळत राहते. जसजशी उंची गाठू लागतो तसे स्नोडोनचे आणि स्नोडोनियाचे सौंदर्य वाढत जाते. आखीवरेखीव असे ते डोंगरमार्ग तुम्हाला चुकू देत नाहीत. मार्गदर्शक फलक, तसेच दगडावर कोरलेले दिशादर्शक बाण हे सारे तुमच्या सोबतीला असते आणि सभोवतालचा नजारा इतका रम्य असतो की डोंगर चढण्याचे श्रम विसरून जावेत. वाटेत एक मजेशीर झाडाचे खोड पाहायला मिळते. हे झाड कधीचेच पडून गेलेले. पण खोड अजूनही तग धरून आहे. कधी काळी कोणी तरी त्या खोडामध्ये एखादे पौंड किंवा सेन्टचे नाणे खोचले होते. पुढे ती प्रथाच होत गेली. आज हे खोड अशा नाण्यांनी भरून गेले आहे.

जसजसा माथा जवळ येऊ लागतो, तसे स्नोडोनचे शिखर दृष्टिक्षेपात येते. डोंगरातून येणारे सर्व सहा मार्ग येथे एकत्र येतात. स्नोडोनच्या सर्वोच्च जागी पोहोचणे यापुढे तसे सोपे आहे. माथ्यावर धातूचे एक चक्र लाकडात बसवले आहे. या चक्रावर तेथून वेगवेगळ्या दिशांना असणाऱ्या ठिकाणांची नोंद केली आहे. सात किमी चालण्याचा सर्व थकवा माथ्यावरून दिसणार विहंगम दृश्य क्षणात दूर करते. स्नोडोनियाची अकरा शिखरे, आयरिश समुद्र, जुन्या तांब्याच्या खाणी, तलाव आणि वेगवेगळे मार्ग पाहताना शब्दांत वर्णन न करता येण्यासारखे समाधान मिळते. निर्सगाची आखीवरेखीवता विचार करायला भाग पाडते. निसर्गच स्वत: वास्तुविशारद होऊन पट्टी-पेन्सील घेऊन जणू काही हे सगळे आखत होता की काय असे वाटावे इतके सगळे रेखीव दृश्य. एखाद्या कलाकाराने त्याच्या कुंचल्यातील सारे रंग उधळून येथे रंगछटा भरल्यात असे वाटावे.

या सर्व आनंदात भर घालतो तो म्हणजे १०८५ मीटर उंचीवर असलेला कॅफे आणि थकलेल्या ट्रेकर्सना हसत कॉफी सव्‍‌र्ह करणारी तेथील हसतमुख लोक.

उतरताना अंतर लवकर संपते पण स्नोडोनियाचे रूप हवामानानुसार बहरत असते. आणि विशेष म्हणजे ट्रेकर्सच्या सुरक्षेसाठी अधून मधून हेलिकॉप्टर चकरा मारत असते. सुरक्षितता आणि पर्यायाने ट्रेकर्सना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची तयारी आपल्याला शिकण्यासारखीआहे. स्नोडोनपेक्षा आरोहण करायला किती तरी पटींनी अवघड असे गड-किल्ले, डोंगर आपल्या सह्य़ाद्रीतच आहेत, पण आपल्याकडे असे प्रयत्न तुलनेने कमीच होतात. स्नोडोनच्या भटकंतीत हेच सतत जाणवत राहते. स्नोडोन तुम्हाला डोंगरभटकंतीचा निखळ आनंद मिळवून देतो. देश कोणताही असो, भाषा कोणतीही असो निसर्ग मात्र आपल्याशी एकाच भाषेत बोलतो. सुरांनी बहरलेल्या चित्रांच्या भाषेत. आपल्याला फक्त ही भाषा समजून घेण्यासाठी त्यात रमले पाहिजे. मग निसर्गाच्या मिठीत आपल्याला देण्यासारखे खूप आहे, फक्त घ्यायचे कळले पाहिजे!!

कसे जाल?

रस्तामार्गे – पोस्टल कोड LL55 4NU/LL554 वा आणि स्नोडोनिया

शेर्पा बस सेवा.

रेल्वेमार्गे – जवळचे स्टेशन बांगोर

त्यानंतर कॉन्वे व्हॅली लाइन

केव्हा जाल? 

उन्हाळा (एप्रिल ते सप्टेंबर) योग्य कालावधी. हिवाळ्यात वरच्या टप्प्यात बर्फ असतो. त्यानुसार साधनसामग्री असेल तरच तुम्हाला पुढे सोडले जाते.

अजय महाजन ajaymahajan.1989@gmail.com