तंत्रज्ञानाने शिरकाव केलेला नाही असे एकही क्षेत्र सध्या नाही. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक वस्तूंनी कात टाकली असून वस्तू पूर्णपणे तांत्रिकदृष्टय़ा स्वयंचलित झाल्या आहेत किंवा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्या कार्यरत आहेत. सायकलही याबाबतीत मागे नाही. विज्ञान कथांमध्ये रंगवलेली सायकल अद्याप रस्त्यावर अवतरलेली नसली तरी अनेक बडय़ा कंपन्यांनी हुबेहूब प्रतिकृती निर्माण केल्या असून त्याच्या चाचण्या वेगात सुरू आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत विशेषत: सायकलींसाठी म्हणून अनेक प्रकारची गॅजेट्स बाजारात आली आहेत आणि नवनवीन येत आहेत. म्हणूनच सायकलच्या उपयुक्त अ‍ॅक्सेसरीजबद्दल माहिती घेतल्यांतर आपण या लेखामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सबद्दल जाणून घेणार आहोत.

बाईक कॉम्प्युटर – वेग, अंतर, चढ-उतार, दिशादर्शक, जीपीएस, मॅप अशा अनेक गोष्टी बाईक कॉम्पुटरमध्ये एकत्रित असतात. तुमच्या कॉम्प्युटर आणि मोबाईलशीही ते सहज जोडता येतात. वेगवेगळ्या आकारात, प्रकारात आणि मोठी स्क्रिन असणारे, सर्व डेटा एकत्रित स्क्रिनवर दाखवणारे कॉम्प्युटर उपलब्ध आहेत.

स्मार्ट वॉच – बाजारात दाखल झालेले डिजिटल वॉच अनेक कारणांमुळे सायकलस्वारांसाठीही फायदेशीर ठरले आहेत. बाईक पॉड तुम्ही वायरलेव्दारे वॉचसोबत जोडून केडन्स, अंतर आणि वेगाची मोजणी करू शकता. ह्रदयाचे ठोके मोजण्यासाठी असलेला बेल्टही स्मार्टवॉचसोबत कनेक्ट करता येतो. वॉचमध्ये जमा होणारी माहिती गुगल मॅपवर साठवता येते आणि इतरांसोबतही शेअर करता येते. त्याचप्रमाणे सायकलिंग करताना तुच्या ह्रदयाचे ठोके किती होते, वेग काय होता, चढ-उतार यांचीही माहिती साठवली जात असल्याने तुम्हाला तुमची कामगिरी सुधारण्यासाठीही त्याची मदत होते.

जीपीएस – आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती मिळवण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) अतिशय उपयुक्त डिव्हाईस आहे. त्यात ते ठिकाण आपण उभे असलेल्या ठिकाणापासून किती दूर आहे, तिथे पोहोचण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो अशी माहिती जीपीएस उपकरणाच्या पटलावर एका बटनाद्वारे मिळू शकते. जीपीएस तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे माहिती मिळत असल्याने अगदी रोजच्या रोज होणारे बदलही टिपले जातात. या सुविधेमुळे नेमके ठिकाण शोधणे अधिक सोपे बनते. आडवाटेला गेल्यानंतर रस्ता, उंची यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती रेकॉर्ड करण्यासाठी जीपीएस खूपच फायदेशीर ठरते.

वायरलेस सिग्नल – दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांना असतात त्याच धर्तीवर वायरलेस सिग्नल तयार करण्यात आले आहेत. हे सिग्नल इंडिकेटर्स सायकल सीटच्या खाली आणि त्याचं कंट्रोलर तुमच्या हॅंडलबारवर लावता येतं. अतिशय तेजस्वी एलईडी लाईट आणि वळण्याचा सिग्नल दिल्यानंतर मोठ्याने वाजण्याची सोय यामध्ये असते.

सायकल अ‍ॅटम – सायकलिंग करताना कायनेटीक ऊर्जा निर्माण करण्यासाठी म्हणूनही डिवाईस बाजारात दाखल झाले आहे. हे डिव्हाईस तुम्ही सायकलच्या अक्सलला लावल्याने त्यातून निर्माण होणारी ऊर्जा यूएसबीचा वापर करून इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चार्ज करण्यासाठी वापरू शकता.

दिशादर्शक – परदेशात सायकलसाठी विशिष्ट लेन आणि सिग्नल असल्याने त्याच धर्तीवर दिशादर्शक तयार करण्यात आली आहेत. स्ट्रावा किंवा मॅप माय राईड सारख्या मोबाईल अ‍ॅपसोबत तुम्ही हे दिशादर्शक सिंक केल्यानंतर तुम्ही जो रस्ता मॅपवर ठरवला असेल त्यानुसार हे दिशादर्शक तुम्हाला हॅंडलबारवर लावलेल्या प्रकाशित होणा-या इंडिकेटरद्वारे मार्गदर्शन करत राहतं.

स्पीकर्स – लांब पल्ल्याचं सायकलिंग करताना काहीतरी मनोरंजन लागतं. त्यासाठी अनेकजण हेडफोन लावून गाणी ऐकतात. परंतु, त्यामुळे इतर आवाजांपासून आपण तुटतो. आता पोर्टेबल स्पीकर्स बाजारात आले आहेत. ब्लूटूथद्वारे जोडता येणारे हे स्पीकर्स सायकलवर बसवले की गाण्यांसोबत आपण इतरही आवाज ऐकू शकतो. सोबतीला कोणी असेल तर त्यांचेही मनोरंजन होऊ शकते. टॉर्च असणारे स्पीकर्सही बाजारात उपलब्ध आहेत.

prashant.nanaware@indianexpress.com
Twitter – @nprashant