भारतात असलेली नैसर्गिक सधनता, पुरेसं मनुष्यबळ आणि विपुल व्यापार संधी उपलब्ध असल्याने अनेक परकीय राजवटींनी येथे पाय रोवले. पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिशांप्रमाणेच डेन्मार्कच्या डॅनिशांनीही भारतात नशीब अजमावून पाहिले. भारतात डेन्सबोर्ग हा डॅनिशांचा एकमेव किल्ला आवर्जून पाहायला हवा.

डॅनिश कंपनीने इ. स. १६२० मध्ये तंजावूरचा तत्कालीन राजा रघुनाथ नायकाकडून समुद्रकिनाऱ्याचे ‘तरंगमबाडी’ नावाचे खेडेगाव भाडेतत्त्वावर घेतले. भाडं होतं वर्षांला ३,१११ रुपये. तंजावूरच्या ईशान्य-पूर्वेस सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या या पाच मल लांब आणि तीन मल रुंद असलेल्या भागावर डॅनिशांनी लगेचच एक किल्ला बांधून घेतला. समुद्रकिनाऱ्यावरील जागा आणि व्यापार या दृष्टिकोनातून डॅनिश नौदल अधिकारी ओर गेड्डे याच्या अधिपत्याखाली किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याचे नाव ‘डेन्सबोर्ग’ ठेवले गेले तर गावाचे नाव ‘ट्रॉंक्वेबार’ करण्यात आले. डॅनिश लोकांची ही कंपनी त्यांच्या डेन्मार्कच्या राजाचे काही देणं लागत होती. त्यापोटी १६२४ मध्ये हा किल्ला त्यांनी डेन्मार्कच्या राजाच्या हवाली केला. तेव्हापासून राजाने नेमलेला अधिकारी डेन्सबोर्गचा किल्लेदार असे. डेन्सबोर्ग किल्ला आणि वसाहतीचा पहिला गव्हर्नर रोलॅण्ड क्रापे याची नियुक्ती झाली.

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आजही बऱ्यापैकी स्थितीत उभा असलेला हा किल्ला चन्नईपासून २८० किलोमीटरवर आहे. नागापट्टीणम किंवा चिदंबरम ही तीस ते चाळीस कि.मी. अंतरांवरचे रेल्वे स्टेशनही त्यासाठी सोयीचे पडतात. पुदुचेरीहूनही इथं पोहोचणं अवघड नाही.

ट्रॉंक्वेबारला पोहोचताच आपल्याला एका मोठय़ा जुन्या अशा प्रवेशद्वारातून आत जावं लागतं. या गावाला वेस असल्यासारख्या िभतीत हे भव्य गेट बनवलं गेलंय. सतराव्या शतकातल्या या प्रवेशद्वारावर डेन्मार्कचं राजचिन्ह स्पष्ट दिसतं. मोठं वाहनही सहज आत जाईल एवढय़ा या

प्रवेशद्वारातून प्रवेश करताक्षणी आपल्याला एखाद्या वेगळ्या अशा युरोपिय धाटणीच्या जुन्या गावात आल्याची जाणीव होते. गाव तसं छोटं, म्हणजे साधारण तीन-साडेतीन तासांच्या पायी यात्रेत पूर्ण बघून होईल एवढंच आहे. पण या अनोख्या स्थळाचा आनंद घ्यायचा तर इथल्या हेरिटेज हाउसेसमध्ये मुक्काम केला पाहिजे. ती फार महागडी नाहीत. शिवाय गावात मच्छिबाजार भरत असल्याने अगदी ताजं म्हावरं खायला मिळतं. ‘तरंगमबाडी’चा अर्थ सुरेल गाणाऱ्यात लाटांवर वसलेलं गांव. शांततेत निवांत होऊन सागराच्या लाटांची गाज ऐकत केलेला मुक्काम म्हणजे अस्सल भटक्यांच्या डायरीतली कायमस्वरूपी नोंद.

गावात प्रवेश केल्याबरोबर लागणारा मोठा रस्ता म्हणजे किंग्ज् स्ट्रीट. या राजमार्गाच्या दुतर्फा असलेल्या युरोपिय शैलीच्या इमारती आणि वास्तू आपलं लक्ष वेधून घेतात. मोठाले व्हरांडे, उंच खांब आणि आकर्षक िभती जुन्या डेन्मार्कचं दर्शन घडवतात. रेहिलंग्स् हाऊस, वॅन देिलजन हाऊस, चर्च ऑफ झिऑन, न्यू जेरुसलेम चर्च आणि गव्हर्नर्स बंगलो अशा काही महत्त्वाच्या इमारती त्यात आपापला इतिहास सांगत उभ्या आहेत. पूर्वाभिमुख असलेला मुख्य डेन्सबोर्ग किल्ला उंच आणि दुमजली आहे. किल्ल्याच्या मुख्य वाडय़ाभोवती उंच आणि खालून वर निमुळत्या िभतींचा तट उभा केलेला आहे. इमारतीत विविध दालनं काढलेली असून कर्मचारी, व्यापारी आणि सनिकांना राहण्यासाठी मागच्या बाजूला काही घरं बांधलेली दिसून येतात. किल्ल्याच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत सामानाची साठवणूक करण्यासाठी गोदामं दिसून येतात. गोदामाच्या बाजूसही सलग तटबंदी दिसून येते. तटबंदीच्या कोनाडय़ामध्ये असलेले बुरूज पोर्तुगीज किंवा डच किल्ल्यांप्रमाणे टोकदार बाणाकृती आकाराचे आहेत. किल्ल्यातील समुद्राभिमुख असलेली दुमजली इमारत आजही राहण्यायोग्य आहे. १९४७ ते १९७५ पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पर्यटकांची आणि अधिकाऱ्यांची निवासाची सोय म्हणून ही इमारत वापरात होती. पुढे १९७९ मध्ये किल्ल्यात वास्तुसंग्रहालय सुरू करण्यात आलं. त्यात तत्कालीन वस्तू, हत्यारं, जहाजांचे मॉडेल्स, नकाशे इत्यादी वस्तू आज बघता येतात. १६३७ च्या सुमारास डॅनिशांनी त्यांची स्वतंत्र नाणीही पाडायला सुरुवात केली होती. ती नाणीही या वस्तुसंग्रहालयात बघता येतात.

डॅनिश कंपनीची ताकद फार मोठी नव्हती. हा किल्ला आणि दोनचार वखारी पलीकडे त्यांचा पसारा काही वाढला नाही. दोनतीन जहाजे आणि ट्रॉंक्वेबारला हाताशी असलेली चारपाच लहान जहाजे यापलीकडे त्यांचे नावीक बळ नव्हते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यांची कुठेही वसाहत किंवा वखार नव्हती.

१७५५ मध्ये त्सुनामीसदृश वादळाने डेन्सबोर्गसकट संपूर्ण ट्रॉंक्वेबारचे मोठे नुकसान झाले. तर १७५६ मध्ये तंजावूरच्या राजाने डेन लोकांवर मोठा दंड लागू केला.  इ.स. १७८० मध्ये म्हैसूरच्या शत्रूला शस्त्र पुरविल्याबद्दल हैदरअलीने डेनांना दंड ठोठावला आणि त्यांची ट्रॉंक्वेबारमधून हकालपट्टी करायला सुरुवात केली. वैतागलेल्या डेनांनी १८४५ मध्ये सर्व मालमत्ता साडेबारा लाख रुपयांना ब्रिटिशांना विकली. पण, मिशनरी बिल्डिंग आणि चर्च मात्र त्यांच्याच ताब्यात ठेवले. डेन्सबोर्ग किल्ल्याने स्थापनेपासून ते ब्रिटिशांना हस्तांतरित करण्यापर्यंतच्या सव्वादोनशे वर्षांच्या कालावधीत डॅनिशांचे ३४ गव्हर्नर (किल्लेदार) बघितले.

ट्रॉंक्वेबारमध्ये फिरत असताना एका युरोपियन माणसाचा पुतळा ठळकपणे दिसतो. हा ‘बार्थोलम्यु झिगेनबाल्ग’ होय. डेन्मार्कच्या राजाने डेन्मार्कमधल्या ‘लुथेरन चर्च’चे झिगेनबाल्ग आणि प्लुटेश्चाऊ या दोन प्रोटेस्टंट धर्मप्रचारकांना डेन्सबोर्गला पाठवले. ९ जुल १७०६ मध्ये ते डेन्सबोर्गला पोहोचले. झिगेनबाल्ग तामीळ भाषा शिकला आणि त्याने ‘न्यू टेस्टामेंट’ हा ग्रंथ तामीळमध्ये केला. पाठोपाठ छपाईचे मशीनही मागवण्यात आले आणि १७१२ मध्ये तामिळ भाषेतलं पहिलंवहिलं पुस्तक छापलं गेलं. भारताच्या इतिहासातही पहिला मशीन छापखाना डेन्सबोर्गचा समजला जातो. धर्मप्रसाराचे कार्य करताकरता १७१९ मध्ये  झिगेनबाल्गचा डेन्सबोर्गमध्ये मृत्यू झाला. चर्चला भेट देणारे डॅनिश नागरिक आजही या ट्रस्टला भरभरून देणग्या देतात.

सुदर्शन कुलथे sudarshan.kulthe@gmail.com