अमेरिकेच्या चाकोरीबद्ध पर्यटनात फिनिक्सच्या वाळवंटाला भेट देणाऱ्यांची संख्या तशी तुरळकच असते. पण, मैलोन्मैल पसरलेल्या या वाळवंटात ‘होल इन द रॉक’सारखी काही भौगोलिक आश्यर्च तर आहेतच; पण मानवनिर्मित डेझर्ट बोटॅनिकल गार्डन म्हणजे वाळवंटातील नंदनवनच ठरले आहे.

फिनिक्स हे अमेरिकेतील अरिझोना राज्याचे राजधानीचे शहर. उत्तर अमेरिका खंडात अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागापासून ते थेट मेक्सिकोपर्यंत मलोन्मैल पसरलेल्या सोनोरान वाळवंटात वसलेल्या या शहरात शिरताच आजवर पाहिले त्यापेक्षा खूप वेगळे, काही तरी भन्नाट पाहायला मिळणार, याची खात्री पटायला लागते. सगळ्यात आधी दिसतात ते म्हणजे लहानमोठी नेढी असलेले लाल उघडेबोडके डोंगर, भोवतालची लालपिवळी जमीन आणि दोन्हीत बेमालूमपणे मिसळून जावीत अशी त्याच रंगांची एक किंवा क्वचित दुमजली इमारत. लालपिवळेपणा हा तर वाळवंटाचा आवडता गुणच आणि तो टिकतो तिथल्या कायम गायब असणाऱ्या पावसामुळे. शिवाय वाळवंटी प्रदेशात सतत भरारणाऱ्या वाऱ्यामुळे कालांतराने इथले डोंगर झिजून वाळूरूप होत जातात आणि पुन्हा हीच वाळू वाऱ्यावर स्वार होऊन त्याच डोंगरांवर मारा करायला लागली की त्यातून त्यांना हळूहळू गोलाकार नेढी पडत जातात. फिनिक्समधल्या ‘होल इन द रॉक’ नावाने प्रसिद्ध असलेल्या एका अवाढव्य नेढय़ाच्या वाटेवर कधी काळी शिकलेल्या खास वाळवंटी भूरूपांची डोक्यात उजळणी न झाली तरच नवल! दाटीवाटीने बसवली तर पन्नासेक माणसे सहज मावू शकतील असले हे प्रचंड नेढे गाठायला एक डोंगरी चढण आणि त्यात खोदलेल्या पायऱ्यांचा वापर करावा लागतो आणि मग एक छोटी हाइक केल्याच्या आनंदात त्याच्या पोटात निवांत हवा खात बसता येते. या ठिकाणाहून सॉल्ट नदीचे खोरे आणि त्यात वसलेला शहराचा टेम्पे हा भाग बघता येतो.

Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय
america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?

काही तुरळक बहुमजली इमारती सोडल्या तर या खोऱ्यात सपाटपणाला छेद देईल अशी एकमेव जागा म्हणजे खुरटय़ा ताडांनी वेढलेली चारपाच लहानशी मरुद्याने! हेही खास वाळवंटी वैशिष्टय़; भूजलाच्या आणि हंगामी नद्यानाल्यांच्या साहाय्याने तयार होणाऱ्या या पाण्याच्या साठय़ांनी (आणि आता त्यावर उभारलेल्या धरणांच्या) या विलक्षण कोरडय़ा, रखरखाटी भागातल्या पाण्याचे दुर्भिक्ष कमी केलेले आहे. शिवाय सॉल्ट नदीने उत्तर-पूर्वेकडून वाहून आणलेल्या सुपीक गाळाचे हे खोरे गेली हजारो वर्षे कसेल त्याला अन्न पुरवीत आले आहे. त्यातले अलीकडच्या काळातले भिडू म्हणजे ‘हुहूकाम’ नावाने ओळखले जाणारे आदिवासी (इ.स. १०० ते १४५०). त्यांनी या खोऱ्यात कालव्यांचे अजस्त्र जाळे विणून या कठीण प्रदेशात मका, कडधान्ये, फळभाज्या, अगदी चक्क कापूससुद्धा पिकवल्याचे पुरातत्वीय- ऐतिहासिक पुरावे सापडतात.

‘होल इन द रॉक’मध्ये फिरताना या हुहूकाम लोकांच्या संदर्भात आणखी एक कुतूहल जागवणारी गोष्ट बघायला- वाचायला मिळते ती म्हणजे त्यांनी या जागेचा ‘वार्षिक सौरघडय़ाळ’ म्हणून केलेला वापर! जगातल्या अनेक प्राचीन शेतीप्रधान संस्कृतींप्रमाणे यांच्यातही सूर्याला, विशेषकरून पेरणीचे वेळापत्रक ठरवायला आवश्यक असणाऱ्या उत्तरायण-दक्षिणायनाची सुरुवात आणि वर्षांतल्या सगळ्यात मोठय़ा-लहान दिवसांना विशेष महत्त्व होते. त्यामुळेच त्यांनी या उत्तर-दक्षिण पसरलेल्या भल्यामोठय़ा नैसर्गिक नेढय़ाच्या छतापासून ते तळापर्यंत वर्षभर विशिष्ट दिशेने सरकत जाणाऱ्या सूर्यकिरणांचा अभ्यास करून वर्षांतल्या या प्रमुख दिवसांचे आडाखे बांधले आणि मग हे ज्ञान पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवायला तळाच्या दगडात विशिष्ट ठिकाणी त्या त्या दिवसांची सूर्यस्थिती दर्शविणारे पाटे-वरवंटे (मटाटी) कोरून ठेवले, असा एक ऐतिहासिक कयास आहे.

सॉल्टच्या खोऱ्यातला हा इतिहास-भूगोल अनुभवण्यासाठी तिथल्या नगरपालिकेने होल इन द रॉक आणि मरुद्यानांलगतचा भाग सर्वासाठी पापागो पार्क या नावाने खुला करून दिलेला आहे. शिवाय, सखोल ऐतिहासिक माहिती घेण्याची इच्छा असल्यास हुहूकामचे वंशज समजले जाणाऱ्या, फिनिक्सच्या पूर्व भागात वस्तीला असलेल्या सॉल्ट रिव्हर पिमा-मारिकोपा नेटिव अमेरिकन कम्युनिटीच्या हुहूग्राम की वस्तुसंग्रहालयाला भेट देता येते.

फिनिक्सचा वाळवंटीपणा ठळक करणारे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सगळीकडे मुबलक प्रमाणात पाहायला मिळणारी किमान चारेक फूट उंचीची अजस्र निवडुंगे! ही घराच्या दारात किंवा अंगणात मध्यभागी, रस्त्याच्या कडेला किंवा डोंगरउतारावर यापकी कोणत्याही ठिकाणी ताठ उभी असतात. यांचे ज्ञात-अज्ञात प्रकार आणि भौगोलिक-सांस्कृतिक महत्त्व लक्षात आणून देणारे डेझर्ट बोटॅनिकल गार्डन हे जगातले एकमेव वाळवंटी उद्यान. याच्या १४० एकरांच्या परिसरात जवळजवळ पन्नास हजारांहून अधिक वाळवंटी झाडाझुडपांचे प्रदर्शन त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात मांडले आहे. याची जन्मकथा खूप प्रेरणादायी आहे. १९३० च्या दशकाच्या सुरुवातीला वाढत्या यांत्रिकीकरणामुळे वाळवंटी भूरूपांचे सौंदर्य नष्ट होऊ नये म्हणून काही स्थानिक मंडळींच्या पुढाकारातून या भागात वाळवंट वाचवा मोहीम सुरू झाली. वाळवंट वाचायचे म्हणजे आधी त्याबद्दल जनजागृती व्हायला हवी आणि एकुणात वाळवंटी भूभागांची, त्यातल्या वनस्पतींची आणि त्यावर आधारलेल्या मानवी जीवनाची ओळख-माहिती वाढायला हवी यासाठी जोमाने प्रयत्न सुरू झाले. अशा प्रकारचा एखादा कायमस्वरूपी उपक्रम बंदिस्त खोल्यांमध्ये करण्यापेक्षा उघडय़ाबोडक्या, खऱ्याखुऱ्या माळरानावर उभारता आला तर अधिकच उत्तम असा विचार झाला आणि मग त्यातूनच हळूहळू डेझर्ट बोटॅनिकल गार्डन आकाराला येत गेले. त्यासाठी कुणी स्वत:ची जमीन देऊ केली, कुणी आपले वनस्पतिशास्त्राचे ज्ञान, तर कुणी ते उभारण्याच्या कामी लागणारा वेळ आणि पसा! त्यातूनच १९३९ मध्ये लोकांनी लोकांसाठी उभे केलेले हे अनोखे उद्यान रूपास आले आणि तिथपासून आजपर्यंत इथली पर्यावरणीय चळवळ बनून वाढत राहिले आहे. सध्या इथे पाच वेगवेगळ्या लूप ट्रेल्सवर निवडुंगे आणि त्याच्या असंख्य वाळवंटी भाऊबंदांना त्यांच्या मूळ (अगदी आपण मॅकेनाज गोल्डमध्ये तर नाही ना अशी शंका यावी इतक्या!) नैसर्गिक अधिवासात बघता येते. त्यांची पाणी साठवण्याची अपार क्षमता, त्यांच्या उत्क्रांतीतले निरनिराळे टप्पे, सोनोरानचे आदिवासी आणि त्यांच्या शेतीच्या पद्धती, त्यांच्या जगण्यावागण्यातले वाळवंटाचे स्थान याबद्दलची माहिती वाळवंटाच्याच सान्निध्यातच घेता येते. शिवाय साधारण मार्च-एप्रिलदरम्यान ही उद्यानभेट ठरवता आली तर काटय़ांमधून वाट काढणारी विविधरंगी वाळवंटी फुले आणि अक्राळविक्राळ निवडुंगांच्या खोडांमध्ये नांदणारे असंख्य पक्षी आपल्याला दर्शन देतात. कधी अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागाचा दौरा काढलात तर या वाळवंटी नंदनवनाला भेट देऊन त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ द्यायला विसरू नका!

कसे आणि केव्हा जावे?

फिनिक्स शहराच्या दक्षिण भागात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. विमानतळापासून शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणारी छोटी रेल्वे आहे. शहरात फिरण्यासाठी गाडय़ा भाडय़ाने मिळण्याची सोय आहे, तसेच स्थानिक बस सेवा २४ तास उपलब्ध आहे. या विलक्षण कोरडय़ा वाळवंटी भागात विनासायास फिरण्यासाठी नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ उत्तम.

डॉ. चारुता कुळकर्णी charutaindia@gmail.com