महाराष्ट्रातील तमाम डोंगरभटक्यांचं हक्काचं व्यासपीठ असणारं गिरिमित्र संमेलन यंदा ९ व १० जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे होणार आहे. संमेलनाचं हे १५ वे वर्ष आहे. ‘महिला आणि गिर्यारोहण’ अशी या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे.
संमेलनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही छायाचित्रण, दृकश्राव्य सादरीकरण, ट्रेकर्स ब्लॉगर, पोस्टर अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. छायाचित्रण स्पर्धेसाठी सुळके, हिमालयीन मोहिमा आणि किल्ल्यांचे लॅण्डस्केप असे विषय आहेत. ही स्पर्धा संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दृक्श्राव्य सादरीकरण स्पर्धेसाठी गिर्यारोहण मोहिमा, प्रस्तरारोहण मोहिमा, किल्ले, गिरिभ्रमण, माऊंटन बाईकिंग असे विषय असून त्यात सादरीकरण, चित्रफितींचा समावेश असेल.
दृक्श्राव्य सादरीकरण स्पर्धेबरोबच अभ्यासपूर्ण सादरीकरण हा एक नवीन विषय संमेलनात समाविष्ट करण्यात आला आहे. डोंगर भटकंतीत आढळणाऱ्या एखाद्या नावीन्यपूर्ण विषयावर विविध अंगाने अभ्यास करून त्यावरील सादरीकरण यामध्ये अपेक्षित आहे. या सादरीकरणासाठी संमेलनात विशेष वेळ देण्यात आलेला आहे. पण ही स्पर्धा असणार नाही, पण सादरीकरणांचे परीक्षण करून योग्य
सादरीकरणाची निवड करण्यात येईल. अशाच प्रकारे डोंगर भटकंतीतल्याच एखाद्या विषयावर
अभ्यासपूर्ण पोस्टर्सची स्पर्धादेखील घेण्यात येणार आहे.
डोंगर भटकंतीबरोबरच गेल्या काही वर्षांत गिरिभ्रमंतीच्या ब्लॉगची संख्यादेखील लक्षणीयरीत्या वाढलेली आहे. त्यामुळेच दोन वर्षांपासून ट्रेकिंग ब्लॉगची स्पर्धादेखील आयोजित केली जाते.
या सर्व स्पर्धाची नियमावली, अंतिम मुदत, विषय,संपर्क या अधिक माहितीसाठी http://www.girimitra.org ही वेबसाइट पाहावी.