सर्वसाधारणपणे ताग, कापूस इ. धाग्यांपासून बनविलेले दोर बाजारात सहज उपलब्ध असतात, परंतु प्रस्तरारोहणाच्या वापरासाठी ते योग्य नाहीत. दोर म्हणजे प्रस्तरारोहकाची जीवनरेषा. त्यामुळे खास प्रस्तरारोहणासाठी तयार केलेले वेगवेगळ्या जाडीचे दोर गिर्यारोहण साहित्य विकणाऱ्या दुकानात उपलब्ध आहेत. आरोहणासाठी बनविलेल्या दोरांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात. १) कर्नमॅन्टल डायनॅमिक दोर २) स्टॅटिक दोर
कर्नमॅन्टल डायनॅमिक दोर : अमेरिकेतील ‘डयुपाँट’ कंपनीने सर्वप्रथम नायलॉन म्हणजे पॉलिमाइड सिंथेटिक धाग्यांपासून दोर बनविले. तर १९५१ मध्ये एडलरीडने सर्वप्रथम कर्नमॅन्टल दोर बनविला. धाग्यांपासून तयार केलेल्या गाभ्याला इजा पोहोचू नये, म्हणून त्यावर धाग्यांचेच आवरण विणले जाते. त्यामुळे हे दोर अधिक सुरक्षित असतात. कर्नमॅन्टल दोराचा शोध लागण्याआधी तयार केले जाणारे दोर हे धाग्यांच्या गोफांना पीळ मारून तयार केले जात. त्यावर बाहेरील आवरण नसे. त्यामुळे ते लवकर खराब तर होतातच, परंतु ते लवकर तुटण्याची भीतीही असे. आधुनिक तंत्राने तयार केलेले दोर ताणणारे, लवचीक तसेच जास्त वजन पेलणारे व वजनाने हलके असतात. प्रस्तरारोहणात वापरले जाणारे आधुनिक दोर हे साधारणपणे पॉलिमाइड नायलॉन फायबरपासून बनवलेले असतात. या दोरात ताणण्याची क्षमता असते. यामुळे प्रस्तरारोहक पडल्यानंतर दोर िस्प्रगसारखा ताणला जातो व येणाऱ्या जोराच्या झटक्याला/आघात बलाला नियंत्रित करता येते. उठावदार रंगांमुळे ते बर्फात व प्रस्तरावर लांबूनही स्पष्ट दिसतात. काही कंपन्या आवरण विणताना व त्याला रंग देताना अशा प्रकारे देतात की दोराचा मध्य लक्षात येईल, तसेच टोकाला काही फुटांचा रंग वेगळा असतो. त्यामुळे दोर किती संपला व किती शिल्लक आहे ते सुरक्षा दोर देणाऱ्या प्रस्तरारोहकाला लक्षात येते व तो नेतृत्व चढाई करणाऱ्या प्रस्तरारोहकाला त्याप्रमाणे मार्गदर्शन करू शकतो.
स्टॅटिक दोर : स्टॅटिक दोरांचा गाभा तयार करताना कमी पीळ दिलेले गोफ वापरले जातात. त्यामुळे स्टॅटिक दोर अल्प प्रमाणात ताणले जातात. त्यामुळे हे दोर नेतृत्व चढाईत, डायनॅमिक बिले देण्याच्या पद्धतीत वापरले जात नाहीत. यांचा उपयोग फिक्स दोर म्हणून, जुमािरग, रॅपिलगसाठी, टॉप रोपिंग किंवा सामान वर खेचून घेण्यासाठी केला जातो. सामान ओढून घेणे, रॅपिलग, टॉप रोपिंग यासारख्या वापरात दोराच्या आवरणाचे साधने आणि प्रस्तर यांच्याशी सतत घर्षण होत असते. त्यामुळे आवरणाची झीज जास्त होते. याच कारणामुळे अशा वापरासाठी उपयोगात आणल्या स्टॅटिक दोरांचे आवरण दणकट व जाड ठेवलेले असते.

 

अशोक पवार-पाटील
ashok19patil65@gmail.com