लडाखमधले निसर्गाचे सगळे रंग बघायचे असतील, तर कॅम्पिंगला पर्याय नाही. रात्री निरभ्र आकाशात चांदण्यांचं इतकं दाट पांघरूण कधी पाहिलं नसेल. निरव शांतता भंग करणारा झाडा-पानाच्या सळसळीचा नाद नसलेला केवळ पर्वतांमध्ये घुमणारा वारा अनुभवायचा असेल तर इथं तंबूतच राहायला हवं.
सारा देश उन्हाच्या काहिलीनं भाजून निघत असतो, तेव्हा जुलै! असं म्हणत लडाख आपल्या स्वागताची तयारी करतो आणि मान्सूननं देश धुतला जात असतो, तेव्हा तर या प्रदेशात जाण्याचा सर्वोत्तम काळ असतो. थोडी थंडी, बरंचसं ऊन, भणाणा वारा आणि साद घालणारं ते गहिरं निळं आकाश यामुळे जुलै, ऑगस्टचे महिने पर्यटनप्रेमींना लडाखकडे खुणावत असतात. आपल्याच देशात असलेला, तरीही जगावेगळा हा प्रांत. कुणी मून लँड म्हणून तिथलं वेगळेपण सांगतं तर कुणी शाईसारख्या निळ्या रंगाच्या इथल्या सरोवरांच्या प्रेमात पडतं. या थंड वाळवंटी प्रदेशात निसर्गाची अनेक आश्चर्यकारक रूपं दडली आहेत. पण ती संपूर्णपणे अनुभवण्यासाठी त्या निळ्या गहिऱ्या आकाशानं दिलेल्या हाकेला तितक्याच खुलेपणाने दाद द्यायला हवी. लडाखमधले निसर्गाचे सगळे रंग बघायचे असतील, तर कॅम्पिंगला पर्याय नाही.
खुल्या आकाशाखाली, काँक्रीटच्या भिंती आणि छताशिवाय वास्तव्य केलं तरच तिथंला निसर्ग पुरता अनुभवता येतो. रात्री निरभ्र आकाशात चांदण्यांचं पांघरूण इतकं दाट कधी पाहिलं नसेल, निरव शांतता भंग करणारा झाडा-पानाच्या सळसळीचा नाद नसलेला केवळ पर्वतांमध्ये घुमणारा वारा अनुभवला नसेल तर इथे तंबूतच राहायला हवं. तंबूच्या कापडाची फडफड तेवढी आपल्याला माणसाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते.
लडाखमध्ये सर्व ठिकाणी कॅम्पिंग शक्य नसलं, तरी थोडा वेगळा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांना ‘होमस्टे’चा एक वेगळा पर्याय उपलब्ध आहे. बाकी पँगाँगचा अपवाद वगळता पर्यटकांसाठी हॉटेल्स आहेतच. जूनच्या मध्यापासून लडाखची थंडी कमी होते. लडाखच्या मुख्य शहरात – म्हणजे लेहमध्ये दुपारी पोहोचलात तर कदाचित गरम होतंय म्हणून पंखा लावावा लागेल. संध्याकाळी कधी वारा सुटून अचानक हवामान बदलतं आणि चांगलीच थंडी भरते. काही तासांत बोचरी थंडीही अनुभवायला मिळते. सकाळी उठून बघतो तो पुन्हा निळंभोर आकाश आणि बोचरं ऊन. ऐन लेह शहरात कॅम्पिंगची सोय फारशी नसली, तरी शहराजवळच्या गावांमध्ये ‘होम स्टे’च्या पाटय़ा अनेक दिसतात.अनेक स्थानिकांनी ‘बेड अँड ब्रेकफास्ट’च्या धर्तीवर सोय उपलब्ध करून दिलेली आहे. प्रथमच लडाखमध्ये जाणाऱ्यांनी खात्री करून अशा होम स्टेचा अनुभव घेण्यास हरकत नाही.
लडाखमधील सर्वात लोकप्रिय कॅम्पसाइट आहे ती अर्थात पँगाँग सरोवराचा काठ. इथे काँँक्रीटचं बांधकाम नाही. आहेत ते असे कापडी तंबूच. या लांबच लांब खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या काठावर अनेक ठिकाणी अशी कॅम्पिंगची सोय होऊ शकते.आपल्या बजेटच्या हिशोबाने किमान निवारा ते सुखसुविधांनी युक्त अत्याधुनिक लक्झरी कॅम्पिंग असे बरेच पर्याय आहेत.
तुमचा स्वतचा तंबू असेल तर स्थानिकांच्या सल्ल्याने तो उभारून राहता येईल. पण त्यासाठी आगाऊ चौकशी आवश्यक आहे. शक्यतो अनोळखी, निर्जन ठिकाणी तंबू उभारून राहणं टाळावं. हा संपूर्ण परिसर सीमेलगत असल्यामुळे लष्करी नियम लक्षात घेऊनच असं स्वतंत्ररीत्या कॅम्पिंग करावं. अतिउंचीवरील प्रदेशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्रास होणाऱ्या व्यक्तींसाठी इथलं कॅम्पिंग धोकादायक आहे. कारण समुद्रसपाटीपासून जवळपास १५०००फूट उंचीवर असणाऱ्या या परिसरात हाय अल्टिटय़ूड सिकनेस जाणवू शकतो. हा त्रास रात्री आडवं पडल्यावर जास्त जाणवतो. तिथल्या व्यावसायिक कॅम्पिंग साइट्सवर ऑक्सिजन सिलिंडरची सोय असतेच, तरीही अशा व्यक्तींनी खबरदारी म्हणून आपल्यासोबत मोठा ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणं योग्य. लेहमधून जगातला सगळ्यात उंचीवरील मोटार जाईल असा रस्ता – खार्दूगला पार करून नुब्रा व्हॅलीत उतरता येतं. या व्हॅलीमध्येही सुमूर, टायगर, डेस्किट अशा काही गावांमध्ये, गावांच्या जवळ कॅम्पिंगची सोय होऊ शकते. या भागाची उंची फारशी नाही, त्यामुळे अल्टिटय़ूड सिकनेसचा त्रास होत नाही. पाण्याचा अखंड खळखळाट ऐकत इथे मनसोक्त कॅम्पिंग अनुभवता येतं.
सोमोरिरी सरोवराच्या काठावरदेखील कॅम्पिंग करायला वाव आहे. सोमोरिरी आणि सोकार ही दोन सरोवरंदेखील अगदी विलोभनीय आहेत. पँगाँगची चित्रपटामुळे प्रसिद्धी झाली, पण ही दोन गोडय़ा पाण्याची सरोवरं अजून प्रसिद्धीपासून दूर आहेत, पण तिथली निळाईदेखील अद्वितीय अशीच. मनाली लेह रस्त्यावर एक- दोन कॅम्पसाइट्स दिसतात. श्रीनगर- लेह रस्त्यावर मात्र सोनमर्ग सोडल्यानंतर अशी सोय कुठे दिसत नाही. या राष्ट्रीय महामार्गाचा कारगिलजवळचा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला अगदी खेटून असल्याने या भागात कॅम्पिंगचा विचार न करता, हॉटेलमध्येच राहणं श्रेयस्कर आहे.
arundhati.joshi@expressindia.com