‘सायकल घ्यायची ऐपत नाही आणि गाडी घ्यायला चाललाय.’, काही वर्षांपूर्वी हे वाक्य म्हणजे शिवी वाटायची. पण गेल्या काही वर्षांत बाजारात आलेल्या आधुनिक सायकलींमुळे हे वाक्य आता जवळपास इतिहासजमा होत चाललं आहे. डोंगरांमध्ये चढ-उतारांवर सहज चालणाऱ्या किंवा सपाटीवर वेगात पळणाऱ्या सायकलींकडे पाहून अनेकजण या सायकली किती महागडय़ा असतील यावर पजा लावतात. अनेकजण या आधुनिक सायकलींच्या गिअर्सकडे पाहतात आणि त्यांच्या किमतीचा अंदाज बांधतात. पण फक्त सायकलच्या गिअर्सवरच त्यांच्या किमती ठरतात का? तर याचं उत्तर नाही असं आहे. आधुनिक सायकलींमधील प्रत्येक गोष्ट त्यांच्या किमती वाढवण्यास कारणीभूत ठरते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक सायकल तयार करताना संशोधन आणि बनावटीवर भरपूर खर्च होतो. सायकलचं डिझाइन, वजन, एरोडायनॅमिकपणा, िवड टनल टेस्टिंग, कम्फर्ट, रिजिडिटी, वेग वाढवण्यासाठीच्या उपाययोजना आणि प्रत्येक भागासाठी कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरता येईल यांचा मुख्यत्वे समावेश होतो. सायकलची फ्रेम सर्वात महत्त्वाची असते. स्टील, अ‍ॅल्युमिनिअम, कार्बन फायबर आणि टायटॅनियम अशा चढत्या क्रमाने मटेरियलचा सायकल तयार करण्यासाठी वापर केला जातो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण सर्वात महागडी पण तरीही मजबूत सायकल ही अवघ्या साडेचार किलो वजनाची आहे. बोइंग विमान हे सुमारे सत्तर टक्क्यांच्या वर कार्बन फायबरचं बनलेलं असतं यावरूनच तुम्हाला कार्बन फायबरच्या मजबुतीची कल्पना येईल. कार्बन फायबर किंवा टायटॅनियम सायकली या वजनाला हलक्या असतात. त्यामुळे अनेकांना वाटतं त्या नाजूक असतात आणि आपल्या रस्त्यांवर तुटू शकतात. पण कार्बन फायबरची मजबुती ही सरळ असते. सायकल चालवताना त्यावर वरून खालच्या दिशेने वजन पडत असतं किंवा आघात होत असतात. त्यामुळे एका दिशेत त्याच्यावर कितीही आघात झाला तरी त्याला कोणतीच इजा होत नाही. सायकलची संपूर्ण फ्रेम आपल्याला सारखी दिसत असली तरी अतिशय आधुनिक सायकलींमध्ये असं दिसतं की त्यांच्या दोन्ही बाजू सारख्या नसतात. सायकलमध्ये उजव्या बाजूला ड्राइव्ह ट्रेन असते आणि त्यामुळे उजव्या बाजूला पडणारा ताण हा डाव्या बाजूला पडणाऱ्या ताणापेक्षा अधिक असतो. हे लक्षात घेऊन उजवी बाजू डाव्या बाजूच्या तुलनेत थोडी अधिक जाड असते.

सायकलला ऊर्जा देणाऱ्या चेनवरही भरपूर संशोधन केलं जातं. गिअर्स बदलताना ती अधिक सहजतेने कार्य करेल याची काळजी काळजी घेतली जाते. उच्च दर्जाचे हॉलो क्रँक हे आतून पोकळ असतात. पण बाहेरून मजबूत असतात. तसंच बॉटम ब्रॅकेटमध्ये आणि डिरेलर्सच्या पुलीमध्ये सिरॅमिकचे बॉल बेअरिंग बसवले जातात. सायकल चालवताना कायम पेडल्सवर ताण येत असतो. त्यामुळे तुम्ही जेवढी ऊर्जा त्यामध्ये टाकता ती सायकलला पुढे न्यायला मदत करत असते. म्हणून ते हलके असले तरी मजबूत असतात. आणि तिथेही कार्बन फायबर आणि टायटॅनियम या प्रीमियम मटेरियलचा वापर केला जातो.

सायकलचे संपूर्ण चाक ज्यामध्ये हब, स्पोक आणि रिम यांचा समावेश होतो ते अतिशय चांगल्या दर्जाचे घ्यायचे झाल्यास त्याची किंमत लाखात जाते. टायरचं रबरही चांगल्या दर्जाचं असतं. हे टायर वळणावर, दगडगोटे, खडींवरही सायकलला धरून ठेवतात आणि ओल्या रस्त्यांवरून गेलात तरी ते घसरत नाहीत. चांगल्या दर्जाच्या टायरमध्ये १४५ पीएसआयपर्यंत हवा भरली जाऊ शकते. (ट्रकच्या टायरमध्ये सुमारे १०५ पीएसआय हवा भरली जाते.) यावरून सायकलच्या टायरची क्षमता तुमच्या लक्षात येईल.

आता तर सायकलला आत्तापेक्षा अधिक जलद व परिणामकारक बनविण्यासाठी फॉम्र्युला वन रेसिंग टीम आणि सायकल बनविणारी कंपनी एकत्र आले आहेत. शिवाय सायकल बनवण्यासाठी लागणारे कारागीर आणि विशिष्ट ब्रॅण्डही सायकलची किंमत वाढवत असतात.

प्रशांत ननावरे – prashant.nanaware@expressindia.com