पावसाळ्यात डोंगरकडय़ावरून कोसळणाऱ्या धबधब्यात मनसोक्त भिजण्याची ओढ प्रत्येकालाच लागते. आज अशाच काही धबधब्यांची ओळख करून घेऊया.
वरदायिनी धबधबा
नागोठणे -कोलाड प्रवासादरम्यान सुकेळी खिंडीच्या काही अंतर आधी डावीकडच्या डोंगरात उंचावर कोसळणारा भलामोठा प्रपात हमखास लक्ष वेधून घेतो. हाच तो वरदायिनी धबधबा. येथे पोहोचण्यासाठी सुकेळी खिंडीच्या आधी जिंदाल कंपनीच्या पुढील डावीकडच्या फाटय़ावरून खेरवाडी गाव गाठावे.खेरवाडी गावातून बैलगाडी जाईल, अशा कच्च्या रस्त्याने १५ मिनिटे चालत जाऊन आपण एका विस्तीर्ण पठारावर पोहोचतो. पुढे साग, हिर्डी, पळसाच्या जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने धबधब्यापाशी पोहोचायला अर्धा तास लागतो. पिट्टा, ड्रोंगो, मलबार व्हिसलिंग थ्रश अशा पक्ष्यांचा कलकलाट आपली साथ करत असतो. दोन टप्प्यांत कोसळणाऱ्या या धबधब्याच्या तळाशी सपाट कातळ आहे. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे येथे बरेच शेवाळ जमा होतं. थेट धबधब्याखाली जाताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. धबधब्याच्या वरच्या डोंगरात वरदायिनी मातेचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या मागे ओहोळात पाण्याची दगडी टाकी कोरलेली आहेत. येथे जाण्यासाठी तासाभराची चढाई करावी लागेल. वरदायिनी मंदिरापर्यंत जायचे झाल्यास गावातून वाटाडय़ा घ्यावा. अनुभवी ट्रेकर वरदायिनी ते सुरगड असा तीन तास चालीचा ट्रेक करू शकतात.

धोंदाणे धबधबा
मुंबई – अलिबाग रस्त्यावर अलिबागच्या आधी चार किलोमीटरवर खंडाळे गाव लागते. गावातून डावीकडे वळत सिद्धेश्वर आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे. पक्की सडक संपल्यावर गाडय़ा तेथेच सोडून १५ मिनिटांत आपण जंगलातील पायवाटेवर येतो. अध्र्या तासाची सोपी चढाई करून डोंगरधारेवर येताच समोर येतो तो उजवीकडच्या जंगलात कोसळणारा धोंदाणे धबधबा. आश्रमाची पायवाट सोडून उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेने १५ मिनिटे आडवे चालत जाताच आपण धबधब्याच्या पोटाशी पोहोचतो. वर डोंगरमाथ्यावर वसलेल्या सिद्धेश्वर आश्रमाशेजारूनच हा धबधबा कोसळतो. धबधब्याच्या मागील छोटय़ा घळीत गेले असता असंख्य तुषारांची उधळण करत घळीच्या तोंडाशी कोसळणाऱ्या प्रपाताच्या पाण्याची जणू एक पातळ चादरच हेलावत बरसत असल्याचा आभास होतो. धबधब्याच्या माथ्यावरील सिद्धेश्वर आश्रमाला भेट द्यायची असल्यास आल्या वाटेने मागे फिरून पुन्हा मुख्य पायऱ्यांच्या वाटेने आणखी २० मिनिटे चढून जावे लागते. येथूनच जवळ सागरगड माची नावाची वाडी आहे. आणखी अध्र्या तासाची पायपीट करत सागरगडावर पोहोचता येते.

कालोते मोकाशीचा धबधबा
फारसा कोणाच्या माहितीत नसलेला एक देखणा धबधबा खालापूर- चौक(कर्जत) रस्त्यावर कालोते मोकाशी गावाजवळ आहे. रस्त्यालगतच्या डोंगररांगेमागे दडल्यामुळे लोंढेच्या लोंढे येथपर्यंत फारसे पोहोचत नाहीत. सात-आठ वर्षांपूर्वी फारसे माहीत नसलेले कालोते मोकाशी गाव आता परिसरात झालेल्या भपकेबाज रिसॉर्ट्स आणि फार्म हॉऊसेस बऱ्यापैकी गजबजलेलं असतं. येथे पोहोचायला कर्जत अथवा चौक येथून सहा आसनी रिक्षा मिळतात. गावामागील डॅमच्या पाण्याला अर्धप्रदक्षिणा घालत ओढय़ाच्या काठाने डोंगरात चढणाऱ्या पायवाटेने अवघ्या पाऊण तासात ८०-९० फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याच्या माऱ्याने तयार झालेल्या डोहाच्या मुखावर आपण पोहोचतो. धबधबा कोसळतो तो कातळ खालून झिजून छतासारखा पुढे आल्याने पाण्याचा झोत कातळकडय़ावरून न ओघळता थेट डोहात कोसळतो. पाउस जास्त असल्यास डोहात उतरण्याचा मोह टाळावा. धबधब्याच्या वर डोंगरात चालत गेल्यास अनेक ठिकाणी छोटय़ामोठय़ा टप्प्यांवरून खळाळत वाहणाऱ्या पाण्यात सुरक्षित जागा आहेत.
प्रीती पटेल patel.priti.28@gmail.com