बऱ्याचदा दिवाळीच्या सुट्टय़ांच्या तारखा माहीत असूनही कार्यालयातील कामं किंवा एखाद्या प्रोजेक्टमुळे आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत सुट्टीचा नेमका अंदाज येत नाही. दहा-पंधरा दिवस आधी समजतं तेव्हा सगळ्या चांगल्या ट्रॅव्हल डील्स संपलेल्या असतात किंवा महाग झालेल्या असतात. परदेशात जायचं असेल तर व्हिसा कधी मिळेल आणि कधी जाता येईल असे विचार येऊ लागतात. पण तुमच्या आनंदासाठी एक गोष्ट सांगायची तर अजूनही काही डेस्टिनेशन्स अशी आहेत की तिथे तुम्ही अगदी शेवटच्या क्षणी ठरवूनदेखील निघू शकता. हो, अगदी आज ठरवा आणि उद्या निघा! या लास्ट मिनिट टूर्समधील सगळ्यात हॉट फेव्हरेट डेस्टिनेशन आहे साउथ ईस्ट एशिया. कधीही ठरवावं आणि तिथे निघावं असे हे देश म्हणजे आदरातिथ्याचा एक उत्कृष्ट नमुनाच. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान हे देश झळाळून गेलेले असतात. साधारण दिवाळीपासून सुरू झालेली ही रोषणाई ख्रिसमस- नववर्षांपरयत सुरू असते. सिंगापूरमधील ‘लिटिल इंडिया’मधील सेरांगून रोडवरील दिवाळीचे सेलिब्रेशन आणि मलेशियातील ‘हरी दीपावली’ बघायला कित्येक पर्यटक दरवर्षी साउथ एशियाची वाट धरतात. यंदा तर सिंगापूरधील लिटिल इंडिया भागातून धावणारी ट्रेन दिवाळी थीमने सजविण्यात आली आहे. रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघालेले तेथील रस्ते, घरं, विविध मॉल्समध्ये लागलेले सेल्स यामुळे भारताइतकीच दणक्यात दिवाळीची मजा तेथेही येते.

पारंपरिक थाई मसाजपासून ते मुइ थाई म्हणजे थाई बॉिक्सगपर्यंत अनेक पारंपरिक गोष्टींनी थायलंड पर्यटकांना आकर्षति करतो. थायलंडमधील एक ऑफबीट पण लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे चांगमाई. हे पर्यटकांसाठी सरप्राइज पॅकेज ठरते. कारण अतिशय सुंदर देवळे आणि निसर्गरम्य परिसर यापेक्षाही चांगमाईमध्ये बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं बरंच काही आहे. आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज्, एलिफंट कॅम्पस्, लिसी हिल ट्रायब व्हिलेज, बांबू राफ्ट ट्रिप या सगळ्यांचा चांगमाईमध्ये आनंद घेता येतो. या शहरात ऐतिहासिक आणि आधुनिक थाई संस्कृतीचा उत्तम मेळ बघायला मिळतो. बीच टुरिझम, अ‍ॅडव्हेंचर टुरिझम, स्पिरिच्युअल टुरिझम अशा अनेक प्रकारचे पर्यटन येथे अनुभवता येते. या शहराला ‘क्रिएटिव्ह सिटी’ म्हणून युनेस्कोने गौरवले असून चांगमाई हे थायलंडमध्ये असे एकमेव टुरिस्ट डेस्टिनेशन ठरले आहे ज्याला ‘२५ बेस्ट डेस्टिनेशन्स इन द वर्ल्ड’मध्ये समाविष्ट केले आहे.  याच चांगमाईमध्ये साधारण नोव्हेंबरमध्ये दरवर्षी साजरा होणारा एक युनिक फेस्टिव्हल म्हणजे लँटर्न फेस्टिव्हल. ‘यी पेंग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फेस्टिव्हलचे खास आकर्षण म्हणजे एकाच वेळी हजारोंनी आकाशात सोडले जाणारे आकाशकंदील. असे हजारोंनी सोडलेले कंदील आणि त्याने झाकोळलं गेलेलं आकाश बघणं म्हणजे अविस्मरणीय अनुभव ठरतो. या आकाशदिव्यांसोबत मनातली इच्छा पाठवायची असते व ती नक्की पूर्ण होते असा इथे समज आहे.

रामायणाशी नातं जुळलेल्या श्रीलंकेचं दिवाळीशी खास सख्य आहे. येथील दाक्षिणात्य भारतीयांमुळे दिवाळी जोरदार साजरी केली जाते. श्रीलंकेतील पर्यटनही अनोखंच. श्रीलंकेतील नुवारा एलिया हे गाव त्याच्या भौगोलिक स्थानामुळे निसर्गरम्य आणि आल्हाददायक आहे. हिरवाईने सजलेल्या या गावाजवळ हनुमानाचे मंदिर आहे. नुवारा एलियातील हकगाला बोटॅनिकल गार्डन हे आवर्जून पाहण्यासारखे आहे. याच परिसरात प्राचीन सीता अम्मान टेम्पल आहे. श्रीलंकेच्या सहलीत टी फॅक्टरी, जेम्स म्यूझियम, आर्ट्स अँड क्राफ्ट सेंटर या ठिकाणांना भेट देऊन शॉिपगची हौस पूर्ण करू शकता. आणखी महत्त्वाचे स्थान म्हणजे टेंपल ऑफ टूथ. कॅण्डीमध्ये हे गौतम बुद्धाचा दात जतन करणारे मंदिर आहे. आज जे टेंपल ऑफ टूथ बघतो ते वीर नरेंद्र सिन्हा या राजाने बांधलेले आहे.

दिवाळी – नववर्ष साजरे करण्यासाठी अजून एक खास डेस्टिनेशन म्हणजे दुबई. पर्यटनाला, सहलीला जायचे म्हटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर वेगवेगळी चित्रे दिसू लागतात. कोणाला हिरव्या वनराईचे आकर्षण वाटते, कोणाला पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या राज्यात विहार करावासा वाटतो, कोणाला निळ्याशार सागराच्या लाटा खुणावू लागतात तर कोणाला पहाडांच्या आडून उगवणारी आणि धुक्याच्या लोटात हरवलेली सकाळ अनुभवावी असे वाटते, आणखी कोणाला रोमांचक इतिहासाच्या खाणाखुणा जपणाऱ्या पुरातन वास्तू पाहाव्यात असे वाटते. या सर्व इच्छा पूर्ण करणारं ठिकाण म्हणजे दुबई. विविध सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यटकांना अतिशय अनुकूल असे वातावरण निर्माण करणारे दुबई हे महत्त्वाचे प्रेक्षणीय पर्यटनस्थळ आहे. सोन्याने लखलखणारं दुबई दिवाळी, ख्रिसमसदरम्यान एक वेगळी कात टाकते. बिगेस्ट शॉिपग फेस्टिव्हल तोंडावर आलेला असतो. त्यामुळे तेथील लगबग आणि रोषणाईदेखील अप्रतिम केली जाते.

अफाट महासागरात असलेली चिमुकली बेटे नकाशावर किंवा विमानातून पाहताना एखाद्या ठिपक्यासारखी दिसतात. पण जेव्हा या ठिपक्याच्या अंतरंगाची ओळख होते आणि जाणवतं की या ठिपक्याचं आपल्या मातीशी, संस्कृतीशी जवळचं नाते आहे, तेव्हा तो ठिपका आपल्याला अचानक मोठा वाटायला लागतो. हा अनुभव येतो िहदी महासागरातील मॉरिशस या बेटावरच्या देशाला भेट दिल्यानंतर. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेलं मॉरिशसचं क्षेत्रफळ आहे फक्त २०४० चौ.कि.मी. म्हणजे भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यापेक्षाही सुमारे एक हजार चौ.कि.मी. कमीच. या देशाला निसर्गाचे वरदान मात्र भरभरून लाभलेले आहे. इथल्या भारतीय वंशाच्या लोकांनी ग्रँड बस्सीन या तलावाचे नामकरण गंगा तलाव असेच केले आहे. गंगा तलावाचे मुख्य आकर्षण म्हणजे इथला शिवशंकराचा १०८ फूट उंचीची भव्य मूर्ती. २००८ मध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या मूर्तीची स्थापना करण्यात आली.  इथे हनुमान, लक्ष्मी यांची मंदिरेही आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला हजारो भारतीय गंगा तलावावर येऊन शंकराची पूजा करतात. मॉरिशसच्या राष्ट्रध्वजामध्ये लाल, निळा, पिवळा आणि हिरवा या रंगांचे पट्टे आहेत. यातला लाल रंग हा फ्लॅमबॉयंट ट्री म्हणजे गुलमोहराच्या फुलांचे प्रतीक आहे, निळा रंग हा मॉरिशसभोवतीच्या हिंदी महासागराचे प्रतीक आहे, पिवळ्या रंगातून स्वातंत्र्याचा प्रकाश सूचित केला आहे तर हिरवा रंग मॉरिशसच्या हिरवाईची आठवण करून देतो. येथील भारतीयांमुळे इथे दिवाळी दणक्यात होते.

स्मृती आंबेरकर writersmruti@gmail.com