घाटी रुग्णालयाच्या सरकारी क्वार्टरपासून हाकेच्या अंतरावर असलेला बिबी का मकबरा आणि पाणचक्की,  जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत कैलास लेण्यासमोर साजरा होणारा वेरुळ महोत्सव, कोरीव घृष्णेश्वराचे मंदिर, झोपलेला भद्रा मारोती, कितीदा तरी शर्यत लावून चढलेला दौलताबाद किल्ला. नागमोडय़ा घाटातून सामोरं येणारं म्हैसमाळ, जगप्रसिद्ध अजिंठा या सगळ्याच गोष्टी माझ्या आकर्षणाच्या. मला आठवतं, कुडकुडणाऱ्या थंडीत रात्री अकरा-बाराला वेरुळ महोत्सवाहून परतताना केलेली मस्ती, मित्र-मत्रिणींचा मेळा आणि अंगावर शहारा आणणारा थंडगार वारा. सगळंच कसं एकदम भन्नाट होतं. या आठवणीतलं एक पान म्हणजे दर पावसाळ्यात पठणला जाऊन नाथसागर किती भरला हे पाहणं. नाथसागरात पाण्याचा साठा वाढला म्हटलं की आमचे पाय आपोआप पठणच्या दिशेने धावायला लागायचे. पठण हा औरंगाबाद जिल्ह्यचा केवळ एक तालुका का? तर नाही. पठणची स्वत:ची अशी एक ओळख आहे. शालिवाहन राजाची राजधानी म्हणून पठण शहराचे वेगळेच महत्त्व आहे. राजा रामदेवरायच्या काळात ज्या शहराला दक्षिण काशी म्हणून ओळख मिळाली ते हेच पठण.  औरंगाबादपासून दक्षिणेकडे ५० किलोमीटरवर असलेला पठण तालुका गोदावरी नदीच्या तीरावर वसला आहे. पठण तालुक्याला मराठवाडय़ाचं प्रवेशद्वार असंही म्हणतात. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ याच शहरात आहे. नाथषष्ठीच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते.

पदरावरती नाचरा मोर विणणाऱ्या गर्भ रेशमी पठणीचं शहर पठण. या शहराची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे रंगीबेरंगी पक्ष्यांचं आश्रयस्थान असलेलं  जायकवाडी पक्षी अभयारण्य. हजारो स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांनाही नाथसागराच्या जलाशयाचं आकर्षण आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

दक्षिण गंगा म्हणून ज्या गोदावरीला मान मिळाला, त्या गोदावरीवर बांधलेला प्रकल्प मराठवाडय़ाच्या विकासाला संजीवन देणारा ठरला. सुमारे ५५ किमी लांब आणि २७ किमी रुंद असा अथांग जलाशय सपाट जमिनीवर पसरलेला असल्याने त्याला उथळ बशीसारखं रूप मिळालं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, पठण, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासे तालुक्यातील मिळून ११८ गावांतील ३४१०५ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. जलाशय क्षेत्रात झाडोरा कमी असला तरी जलाशयाच्या बाहेरच्या बाजूने लिंब, आंबा, जांभूळ, चिंच, वड, उंबर, शिसम, सुबाभूळ, आमलतारा चंदन यांसारखी झाडं आहेत. १० ऑक्टोबर १९८६ रोजी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. नाथसागर जलाशयात माशांच्या ५० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. पाणपक्ष्यांना प्रिय असणारी दलदल, शेवाळ, पाणवनस्पती, छोटे मासे, कीटक या खाद्यपदार्थाची आणि  वैविध्यपूर्ण जलीय अधिवासाची विपुलता यामुळे नाथसागराचा जलाशय देशी -विदेशी पक्ष्यांचे  माहेरघरच बनला आहे.

कायम वास्तव्यास असलेल्या २०० प्रजातींच्या पक्ष्यांशिवाय हिवाळ्याची चाहूल लागताच विविधरंगी मनोहारी पक्षी नाथसागर जलाशयाच्या आश्रयास येतात. दक्षिण आफ्रिका, नेपाळ, तिबेट, चीन, रशिया येथून दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या ७० च्या आसपास प्रजाती इथं पाहायला मिळतात. केवळ एक किंवा दोन दिवसांत इथल्या सगळ्याच गोष्टी पाहता येत नाहीत इतका हा जिल्हा पर्यटनदृष्टय़ा समृद्ध आहे. हिवाळा हा पर्यटनासाठी आणि जायकवाडी पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी उत्तम ऋतू आहे. औरंगाबादसह पठणमध्ये खासगी -सरकारी निवास व्यवस्था आहे.  अभयारण्याला जाण्यासाठी पठणला जावे लागते. पठण शहर औरंगाबादहून ५० किमी आणि अहमदनगरहून ७५ किमी अंतरावर आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com