निसर्गाने भूतकाळात उघडलेली खिडकी म्हणजे ‘फॉसिल्स’ अर्थात ‘जीवाश्म’. निसर्गाच्या या खिडकीतून डोकावायचे असेल तर मध्य प्रदेशमधील घुघवा येथील फॉसिल पार्कला भेट द्यायलाच हवी.

आपल्याला हिंदी चित्रपटांनी ज्या अनेक गोष्टी दिल्यात त्यातली एक म्हणजे फ्लॅशबॅक. कोणत्याही हिंदी चित्रपटात नायकाला लहानपणीचं खेळणं सापडतं किंवा नायिकेला पुस्तकात ठेवलेलं सुकलेलं फुल मिळतं आणि बघता बघता फ्लॅशबॅक सुरू होतो. आता प्रत्यक्षात अशा आठवणींच्या राज्यात हरवून जायला आपल्यालाही आवडतंच. पण ते सगळं कल्पना रंजन असतं. वास्तवात गेलेल्या काळाच्या खुणा प्रत्यक्षात पाहायला थोडय़ाच मिळतात? म्हणजे समजा एखाद्या परिसरात गेल्यावर तो परिसर पूर्वी, फार फार पूर्वी अगदी हजारो-लाखो वर्षांपूर्वी कसा होता याची कल्पना करता येईल, पण त्या कल्पनेला पुरावा काय? सृष्टीच्या अफाट पसाऱ्यात आणि निसर्गाच्या व्यामिश्र चक्रात मात्र अशा फ्लॅशबॅकची सोय आहे, जिथे हजारो-लाखो वर्षांपूर्वीचा काळाच्या खुणा प्रत्यक्षात पाहायला मिळतात. निसर्गाने भूतकाळात उघडलेली खिडकी म्हणजे ‘फॉसिल्स’अर्थात ‘जीवाश्म’. निसर्गाच्या या खिडकीतून डोकवायचे असेल तर मध्यप्रदेशमधील घुघवा येथील फॉसिल पार्कला भेट द्यायलाच हवी.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?

मध्य प्रदेश म्हटल्यावर ज्या कान्हा-बांधवगडची आठवण होते, त्या दोन्हींच्या मध्ये घुघवा आणि उमरिया या दोन गावांमध्ये मिळून २७.३४ हेक्टर परिसरात भारतातील एक आगळावेगळा पार्क आहे. सर्वसाधारणपणे फॉसिल्स म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात ते डायनॉसॉरस. पण फॉसिल्स फक्त डायनॉसॉरसचेच नसतात, निसर्गातल्या विविध जीवांचे फॉसिल्स बनतात, अगदी झाडांचेही. घुगवा पार्कमध्ये असेच लाखो वर्षांपूर्वीच्या वनस्पती सृष्टीचे अवशेष जीवाश्मांच्या रूपात पाहायला मिळतात.

लाखो वर्षांपूर्वी जमिनीच्या पोटात गाडला गेलेला हा जीवाश्मांचा खजिना जगासमोर आणण्याचं श्रेय जातं मंडला जिल्ह्यचे तत्कालीन सांख्यिकी अधिकारी डॉ. धर्मेद्र प्रसाद यांना. डॉ.प्रसाद जिल्हा पुरातत्त्व संघटनेचे मानद सचिवही होते. या संस्थेने इथल्या परिसरात रानोमाळ विखुरलेले फॉसिल्स गोळा करून मध्य प्रदेशाच्या निसर्ग इतिहासातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर प्रकाशझोत टाकला. घुघवा, पारापानी, सामनापूर, मोहगाव, कलान या परिसरात विखुरलेल्या फॉसिल्सचे वर्गीकरण करून त्यांचा शास्त्रशुद्ध संग्रह तयार करण्याचे काम जबलपूर सायन्स कॉलेजचे एस. आर. इंगळे आणि बिरबल साहनी इन्स्टिटय़ूट ऑफ पालिओबॉटनीचे डॉ. एम. बी. बांडे यांनी केलं. या पार्कमध्ये फॉसिल्सच्या रूपानं सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या वृक्षसंपदेचं दर्शन घडतं. हा काळ वनस्पतींच्या इतिहासातील महत्त्वाचा काळ आहे. कारण याच काळात सपुष्प वनस्पतींचे दालन विकसित व्हायला लागले होते. घुगवा पार्कमध्ये आज आवळा, केळी, नारळ, आंबा, रुद्राक्ष, खजूर, जांभूळ, यूकॅलिप्टस (निलगिरी) या झाडांचे फॉसिल्स पाहायला मिळतात. आता नारळ, आंबा, यूकॅलिप्टस आणि रुद्राक्ष अशा एकाच हवामानात न आढळणाऱ्या झाडांचे फॉसिल्स एकाच ठिकाणी कसे? इतकेच नव्हे तर आज जिथे एकही नदी, सरोवर, तलाव नाही, तिथे कवचधारी जलचर आणि शंख िशपल्यांचे फॉसिल्स कसे? या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत काळाच्या उदरामध्ये. सुमारे २० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खंडांची रचना आजच्यासारखी नव्हती. एकच एक मोठ्ठा खंड होता, ज्याला पॅंन्जिया म्हटले जाते. १५ कोटी वर्षांपूर्वी हा खंड दुभंगला आणि त्यातून लॉरेशिया व गोंडवन हे दोन खंड निर्माण झाले. गोंडवनात भारत, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटाíक्टका हे आजचे खंड एकत्र होते. त्यामुळे त्या काळात या खंडांवरील वनस्पती आणि प्राणिसृष्टीत साम्य होते. म्हणूनच आज मूळची ऑस्ट्रेलियातील मानलेली निलगिरीची झाडे भारतात नसíगक अवस्थेत होती, याचा पुरावा घुगवाच्या फॉसिल्समधून मिळतो. त्याच काळात अरबी समुद्राचा एक फाटा मध्य भारतात आजच्या नर्मदा खोऱ्याच्या ठिकाणी शिरलेला होता, याची साक्ष इथले जलचरांचे फॉसिल्स देतात.

हे फॉसिल्स बनतात कसे? तर एखादा जीव मरण पावल्यानंतर त्याच्या मृत शरीरातील सेंद्रिय भाग कुजून नष्ट होतो. पण जर प्राण्याचा मृतदेह किंवा वनस्पतीचा भाग गाळामध्ये गाडला जातो तेव्हा ही कुजण्याची, विघटित होण्याची क्रिया पूर्ण होत नाही. मग त्या प्राण्याची किंवा झाडाची आकृती त्या गाळावर उमटते, त्यालाच आपण फॉसिल म्हणतो. घुगवामध्ये सापडणारी फॉसिल्स पेट्रिफाइड प्रकारची आहेत. या प्रकारात फॉसिल तयार होताना मूळ वनस्पती किंवा प्राण्यांच्या शरीरातील सेंद्रिय घटकांची जागा भोवतालच्या गाळातील मिनरल्सनी घेतलेली असते. घुगवामधले नारळाच्या झाडाचे फॉसिल्स त्यामुळेच एखाद्या दगडात खोदलेल्या नारळाच्या झाडाच्या शिल्पासारखे दिसते. ही फॉसिल्स पाहिल्यावर स्थानिक लोकांनी दिलेलं ‘पत्थर के पेड’ हे नाव सार्थ वाटतं. आज इथे उघडय़ावर मांडलेली शेकडो फॉसिल्स आहेत. त्याचप्रमाणे फॉसिल्स कशी बनतात, हा परिसर पूर्वी कसा होता याचे दर्शन घडवणारे एक सुरेख प्रदर्शन आहे. हे सगळं बघण्यात अर्धा-एक तास कसा जातो कळतही नाही. मग आता मध्यप्रदेशच्या पर्यटनाला जाल तेव्हा हा निसर्गाचा फ्लॅशबॅक अनुभवायला घुगवा फॉसिल पार्कला अवश्य भेट द्या.

कसे जाल?

जवळचे रेल्वे स्थानक -जबलपूर (७६ किमी.) बांधवगडला भेट देणार असाल तर एक दिवस घुगवा फॉसिल पार्कसाठी ठेवावा.

ऑक्टोबर ते जून भ्रमंतीसाठी उत्तम

यासारखे दुसरे स्थान – हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यतील शिवालिक फॉसिल पार्क ( चंदिगढहून ७० किमी.)

मकरंद जोशी makarandvj@gmail.com