माणसाला जगण्यासाठी जशी हवा लागते तसंच सायकललाही पळण्यासाठी इंधन म्हणून फक्त हवेची आवश्यकता असते. आणि ती हवा ज्यामध्ये साठवली जाते ती म्हणजे टायरच्या आतमध्ये असलेली टय़ूब. अनेकदा टय़ूब पंक्चर आहे म्हणून अनेक सायकली घरात धूळ खात पडलेल्या असतात. पण पंक्चर काढणं हे काही रॉकेट सायन्स नव्हे. सायकलच्या दुकानात अगदी दहा मिनिटांमध्ये ते काढून मिळतं किंवा तुम्ही घरबसल्याही ते सहज दुरुस्त करू शकता. सायकल शहरात चालवायची असो वा शहराबाहेर, सर्वात मोठा धोका आपल्याला टय़ूब पंक्चर होण्याचाच वाटत असतो आणि ते झाल्यावर आपल्या आनंदावर विरजण पडतं. अनेकांना वाटतं बाजारात दाखल झालेल्या महागडय़ा सायकली या टय़ूबलेस टायरच्या असतात. पण तसं नसून टय़ूबलेस टायर ही संकल्पना अस्तित्वात असली तरी अद्याप तितकीशी रुळलेली नाही. रोड, हायब्रीड किंवा माऊंटन या सर्व सायकलींच्या टायरमध्ये टय़ूब ही असतेच पण तिच्या वॉल्टचे प्रकार आणि आकार वेगवेगळा असतो.
टय़ूबला टायरचे आवरण असणे अत्यंत गरजेचं आहे. टायरशिवाय केवळ टय़ूब सायकलला लागू शकत नाही. त्यामुळे टय़ूबच्या आधी टायरची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. टायरच्या आत रबराची गोल आणि वर्तुळाकार नळी बसवून त्यामध्ये हवा भरावयाची सोय केलेली असते. या टय़ूबमध्ये भरलेल्या हवेचा जास्त दाब सहन करण्याची क्षमता असते. टायरच्या कडांमध्ये कडक तार बसविलेली असते, त्यामुळे हवा भरलेल्या रबरी टय़ूबचा दाब आतून वाढला, तरी टायर किनारीवर पक्का बसतो.
टय़ूबच्या वॉल्वचे प्रकार
वूड्स किंवा डनलॉप वॉल्व- सी. एच. वूड्स यांनी या वॉल्वचा शोध लावला. भारतीय आणि आशियाई बनावटींच्या सायकलींना वूड्स किंवा डनलॉप प्रकारचे वॉल्व असतात. आपल्या आजही प्रत्येक नाक्यावर असलेल्या सायकलच्या दुकांनामध्येही डनलॉप वॉल्वच्या टय़ूबच उपलब्ध असतात आणि सर्वसामान्य सायकलींमध्ये त्याच वापरल्या जातात. याचं वैशिष्टय़ म्हणजे वॉल्वच्या आतील भागांमध्ये काही बिघाड झाल्यास ते भाग कुठल्याही विशेष साधनांशिवाय सहज बदलता येतात.
श्रेडर वॉल्व : हा वॉल्व प्रेस्टापेक्षा आकाराला जाड आणि विस्तीर्ण (८ एमएम)असतो. याच्या डोक्याचा आणि तळाचा घेर साधारणपणे सारखाच असतो. हवा भरण्याचा पंप सहज आत बसेल अशा प्रकारे त्याचा बाहेरील वॉल्व असतो. वॉल्वच्या आतमध्ये असलेली बारीक पीन हवेचा आतला आणि बाहेरचा दाब नियंत्रित करते. साधारणपणे या वॉल्वमध्ये हवेचा प्रवाह एकाच दिशेने होण्याची व्यवस्था असते आणि श्रेडर वॉल्वमध्ये हवेचा प्रवाह बाहेरून आतमध्ये जाण्याची आवश्यकता असते. श्रेडर वॉल्व आकाराने जाड असल्याने ही टय़ूब प्रेस्टा वॉल्वच्या बारीक पोकळी असलेल्या रीमला लावता येत नाही.
प्रेस्टा वॉल्व : हा वॉल्व आकाराला श्रेडर वॉल्वपेक्षा बारीक (६ एमएम) आणि पूर्णपणे धातूचा तयार केलेला असतो. बाह्य़ वॉल्व स्टेम आणि अंतर्गत वॉल्व बॉडी असे दोन महत्त्वाचे भाग यामध्ये असतात. श्रेडर वॉल्वपेक्षा याची लांबी जास्त असून डोक्याकडील भाग काडी जाईल इतक्या बारीक पोकळीव्यतिरिक्त जवळपास पूर्णपणे बंद असतो. प्रेस्टा वॉल्व कमी जाडीचे असल्याने रीमवरही तेवढय़ाच आकाराची पोकळी असते ज्याने रीमची ताकद वाढण्यास मदत होते. प्रेस्टा वॉल्वची जाडी कमी असली तरी हा वॉल्व असलेली टय़ूब श्रेडर वॉल्वच्या रिममध्ये वॉल्वच्या बाहेरील बाजूस नटबोल्ट लावून सहज बसवता येते.
हवेचा पंप
टय़ूबमध्ये हवा भरण्यासाठी पंपाची आवश्यकता असते. टय़ूबच्या वॉल्वचे वेगवेगळे प्रकार असले तरी हल्ली बाजारात उपलब्ध असलेल्या पंपांना तीनही प्रकारच्या वॉल्वमध्ये हवा भरता येईल अशा प्रकारचे अडॅप्टर असतात. त्यामुळे तुमच्याकडे ज्या प्रकारच्या वॉल्वची टय़ूब आहे, तसा त्यामध्ये बदल करून पंपाचा वापर करता येतो.

टय़ूबची काळजी कशी घ्यावी?
सायकलच्या टायरची योग्य काळजी घेतलात तर टय़ूब आपोआप सुरक्षित राहील.
टय़ूब विकत घेताना टायरचा आकारही लक्षात घेणं गरजेचं आहे. टायर आणि टय़ूबचं व्यस्त प्रमाण असता कामा नये.
प्रत्येक वेळी सायकल चालवण्यापूर्वी टय़ूबमधील हवा तपासून पाहणं गरजेचं आहे.
टय़ूबमध्ये हवा भरताना मीटर असलेला पंप वापरल्यास उत्तम.
टय़ूबमधील हवेचा दाब हा कमी किंवा जास्त नसावा. कमी दाबामुळे तुम्हाला सायकल चालवायला जास्त कष्ट पडतील आणि हवेचा दाब जास्त असेल तर टय़ूब फुटण्याची शक्यता असते.
टायरमध्ये नवीन टय़ूब टाकण्याआधी टायरच्या आतून बाहेरून कुठलीही टोकदार वस्तू अडकलेली नाही, याची खातरजमा करून घ्यावी.
टायरमध्ये टय़ूब टाकल्यानंतर सर्वप्रथम त्यामध्ये थोडी हवा भरावी आणि आतील टय़ूबला कुठेही चिमटा बसलेला नाही हे पाहण्यासाठी टायर सर्व बाजूंनी दाबून तपासून घ्यावा.
टय़ूबमध्ये हवा भरून झाल्यावर व्हॉल्वच्या डोक्याला कॅप बसवणे चांगले.
सायकलचे टायर जाड असले तरी त्यातून अनेकदा बारीक काटा, खिळा किंवा इतर टोकदार वस्तू सहज आत जातात आणि त्या आतील टय़ूबला इजा करतात.
लांब पल्लय़ाच्या सायकल सफरीवर जाताना टायरमध्ये शक्यतो नवीन टय़ूब टाकाव्यात आणि कमीत कमी दोन चांगल्या टयूब सोबत ठेवाव्यात.
ज्या प्रकारची टय़ूब तुमच्या टायरमध्ये आहे त्या व्हॉल्वचा पंप नेहमी सोबत बाळगावा.

 

प्रशांत ननावरे
prashant.nanaware@expressindia.com