गेले काही आठवडे आपण सायकलच्या निरनिराळ्या भागांविषयी आणि त्यांचे कार्य कसे चालते याविषयी माहिती जाणून घेतली. पण हल्ली साध्या सायकलपेक्षा लोकांना आधुनिक आणि महागडय़ा सायकलींविषयी अधिक आकर्षण वाटू लागलंय. आधुनिक सायकलीची व्याख्या करणं तसं कठीण नाही. गिअर्सची सायकल म्हणजे आधुनिक, असा आपला समज आहे. खरंतर बऱ्याच अंशी तो खरासुद्धा आहे. कारण सायकलचे गिअर्स हा खरोखरच क्रांतिकारी शोध म्हणावा लागेल. कारण गिअर्सने सायकलला वेगाचं वेगळं परिमाण लाभलं आणि अशक्य वाटणारे चढ सहज शक्य झाले.
जॉन केम्प स्टर्ली हा आधुनिक सायकलिंगचा निर्माता मानला जातो. त्यांनी १८८५ मध्ये पहिल्यांदा ‘द रोवर सेफ्टी बायसिकल’ची निर्मिती केली. त्यांच्या ‘स्टर्ली अँड सटॉन’ कंपनीतर्फे पहिल्यांदाच दोन्ही चाकं समान आकाराची असलेली सायकल तयार करण्यात आल्याने सायकल चालवण्याची सुरक्षितता अनेक पटींनी वाढली आणि लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्त्री-पुरुष सर्वचजण सायकलिंगकडे मोठय़ा प्रमाणात वळले ते याच काळात. आता सव्वाशे वर्षांनंतर सायकलमध्येही आधुनिकतेचे विविध निकष मोडीत काढले जात आहेत. वर म्हटल्याप्रमाणे सायकलमध्ये आधुनिकतेची व्याख्या गिअर्सशी जोडलेली आहे. त्यामुळे यापुढील काही भागांमध्ये गिअर्सचं कार्य, भाग आणि उपयोगांविषयी जाणून घेणार आहोत.
गिअर्सची माहिती करून घेताना त्याचे मुख्यत्वे तीन भाग पडतात. पहिला म्हणजे शिफ्टर्स – जे तुमच्या दोन्ही हाताजवळ असतात आणि ज्याचा उपयोग गिअर्स बदलण्यासाठी होतो. दुसरा भाग कसेट्स-वेग कमी-जास्त करणाऱ्या चकत्या. आणि तिसरा डिरेलर – जे गिअर्स बदलण्यासाठी मदत करतं. आजच्या सदरामध्ये आपण शिफ्टर्सविषयी माहिती घेणार आहोत.
सायकलला दोन ठिकाणी गिअर्स असतात. पुढचे (फ्रंट) गिअर्स तुमच्या पायडलशी आणि मागचे (रिअर) गिअर्स मागच्या चाकाजवळ. पुढचे गिअर्स बदलण्यासाठी शिफ्टर्स हँडलच्या डाव्या बाजूला असतात. येथे साधारणपणे तीन गिअर्स असतात. गिअर कमी करण्यासाठी, म्हणजे ३-२-१ या क्रमाने गिअर्स उतरवण्यासाठी वरच्या बाजूला आपण ज्या बोटाला चाफेकळी म्हणतो त्या बोटापाशी नॉब असतो. तर गिअर चढवण्यासाठी, म्हणजे १-२-३ या क्रमाने वर जाण्यासाठी अंगठय़ाजवळ नॉब असतो.
उजव्या हातापाशी (मागचे गिअर्स) साधारणपणे सात ते आठ गिअर्स असतात. गिअर कमी करण्यासाठी, म्हणजे ७-६-५-४-३-२-१ या क्रमाने गिअर्स उतरवण्यासाठी अंगठय़ाजवळ नॉब असतो. तर गिअर चढवण्यासाठी म्हणजेज १-२-३-४-५-६-७ या क्रमाने वर जाण्यासाठी वरच्या बाजूला म्हणजे चाफेकळी बोटाजवळ नॉब असतो.
शिफ्टर्सचेही विविध प्रकार आणि कार्य कसे चालते? थम्ब शिफ्टर्स (अंगठ्याच्या सहाय्याने बदलता येणारे) माऊंटन आणि हायब्रीड सायकलमध्ये हे शिफर्स आढळतात. हे शिफ्टर्स हँडलबारवरच ब्रेक लिव्हरच्या बाजूला असतात. सामान्य सायकलींना फ्रिक्शनवर आधारित शिफ्टर्स असतात. यामध्ये सायकलस्वार स्वत: गिअर केबलचा ताण कमी अथवा वाढवू शकतो. आधुनिक सायकलींमध्ये शिफ्टर्सना इंडेक्स स्लॉटही असतो. म्हणजे तुम्ही कोणता गिअर बदलत आहात (कमी-जास्त करत आहात) त्याचा क्रमांक तो तेथे दर्शवतो.
टिवस्ट ग्रिप शिफ्टर्स
गिअर बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शिफ्टर्सची ही नवीन डिझाइन आहे. हे शिफ्टर्स हँडलबारच्या ग्रिपमध्ये बसवण्यात आलेले असतात आणि गिअर कमी-जास्त करण्याच्या गरजेनुसार सायकलस्वाराला आपल्या मनगटाची वर-खाली हालचाल करायची असते. यामध्ये एक फायदा असतो की सायकलस्वाराला आपल्या हाताची फार हालचाल न करता लागलीच मनगटाच्या साहाय्याने गिअर्स बदलता येतात. परंतु, या गिअर्सची निगा राखणं थोडं कठीण असतं.
ड्रॉपबार इंटिग्रेटेड कॉम्बो शिफ्टर्स
रोड सायकलिंगमध्ये असलेले कॉम्बो ब्रेक आणि शिफ्ट लिव्हर हा तंत्रज्ञानाचा एक आधुनिक आविष्कार आहे. रोड सायकलिंगच्या वक्राकार हँडलबारवर ब्रेक लिव्हर आणि गिअर्स शिफ्टर्स अशा प्रकारे बसवण्यात आलेले असतात जे तुमच्या सायकलचं एकूण वजन आणि गिअर शिफ्ट करण्याचा कालावधीसुद्धा कमी करतं. शिफ्ट लिव्हर्स हे लागलीच तुमच्या ब्रेक लिव्हरच्या मागे बसवण्यात आलेले असतात. असं असलं तरी दोन्ही लिव्हर स्वतंत्र पद्धतीने काम करतात आणि एकमेकांच्या कार्यात कसलाही व्यत्यय आणत नाहीत. परंतु, हे गिअर्स शिफ्टर्स वापरण्यासाठी सरावाची आवश्यकता असते.
शिफ्टर्सचे आणखी काही प्रकार
जुन्या रोड सायकलिगंमध्ये स्टीम शिफ्टर्स पाहायला मिळतात. यामध्ये साधे मेटलचे शिफ्टर्स असते आणि त्याला इंडेक्सही नसत. त्याचप्रमाणे डाऊनट्यूब शिफ्टर्स हे रोड बाईकच्या डाऊनट्यूबवर म्हणजेच फ्रेमच्या खालच्या बाजूला जाणाऱ्या नळीवर असत. गिअर वायरच्या कमी वापरासाठी म्हणून ते वापरण्यात येत. या शिफ्टर्सच्या सायकली खूप स्थिर असत. परंतु, गिअर बदलण्यासाठी सायकलस्वाराला फार खाली झुकावे लागत असे. याशिवाय बार एन्ड शिफ्टर्सही काही काळ वापरात होते. हे शिफ्टर्स रोड सायकलच्या हँडल बारच्या टोकाला बसवलेले असत. यामुळे सायकलस्वाराला खाली झुकून त्याचे हात रेसिंग पोझिशनमध्ये ठेवता येत असत आणि त्यामुळे ब्रेक लिव्हरवरही योग्य नियंत्रण मिळत असे.

आवाहन
लोक पर्यटन : भटकतो तर आपण सर्वच. पण कधीतरी चिरपरिचित ठिकाणांपेक्षा जरा हटकेदेखील पाहावं. मग कधी ते भंडारदऱ्यानजीकचं सृष्टीचं कातळलेणं ‘सांधण’ असेल किंवा कधी मानवाने निर्मिलेली इसवी सनापूर्वीची एखादी लेणी किंवा स्थापत्यकलेचा
वारसा असणारं मंदिर. कदाचित
ते फारसं कोणाला माहीतही नसतं. अनेकांना माहीत नसेल असं तुम्हाला काही माहीत आहे? अशा ठिकाणाला भेट दिली असेल तर मग उचला पेन आणि २०० शब्दांत त्या माहिती छायाचित्रासह पाठवून द्या.
ऑफबीट क्लिक : हल्लीच्या भटकंतीत, भटकंती कमी आणि छायाचित्रण अधिक असंच झालंय. पण त्यापलीकडे जाऊन काहीतरी अनोखं फ्रेममध्ये उतरवणारे असतातच. कधी ती फ्रेम अचानक मिळते, तर कधी बरीच प्रतीक्षा करावी लागते. असं एखादं छायाचित्र तुमच्याकडे असेल तर लगेच आम्हाला पाठवा.
भटकंती डायरी : सर्व सुखसुविधांयुक्त असं पर्यटन आज एक उद्योग व्यवसाय म्हणून स्थिरावलं असलं तरी आजदेखील अनेक संस्था डोंगर-जंगल भ्रमंतीचे उपक्रम ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वयंसेवी पद्धतीने राबवत असतात. अशा उपक्रमांची नोंद भटकंती डायरीत घेण्यात येईल. आपल्या संस्थेचे आगामी उपक्रम संस्थेच्या लेटरहेडवर आपण पाठवू शकता.
आमचा पत्ता – लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.
ई-मेल – lokbhramanti@gmail.com
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com