द हिमालयन क्लबच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या वार्षिक कार्यक्रमात या वर्षी गिर्यारोहणातील सुरक्षा, अपघात आणि बचाव कार्य या संकल्पनेवर दिवसभराच्या विशेष चर्चासत्राचा समावेश करण्यात आला आहे. मार्टिन मोरान हे स्कॉटिश गिर्यारोहक स्कॉटलंड आणि आल्प्स पर्वतराजीतील अपघातांचे वैयक्तिक अनुभव कथन करणार असून मानवी चुकांमुळे अपघातांना कसे निमंत्रण मिळते हे ते स्पष्ट करतील. तर गिर्यारोहक डॉ. रघुनाथ गोडबोले हे एव्हरेस्ट व इतर आठ हजार मीटर उंचीवरील पर्वतांच्या आरोहणातील अपघात आणि त्या दरम्यानच्या मृत्यूंचे चिकित्सक विश्लेषण करतील. त्यांच्या अभ्यासातून एकूणच अवघड श्रेणीतील आरोहणातील अडचणी आणि मृत्यूचे प्रमाण यांचा तुलनात्मक आढावा घेतला जाईल. डोंगरातील संपर्कसाधने, त्यांच्या वापरावरील र्निबध, अडचणी, उपाय असा आढावा ज्येष्ठ गिर्यारोहक दिव्येश मुनी यांच्या सादरीकरणात असणार आहे. तर ऐतिहासिक अशा अपघात आणि बचाव मोहिमांचे परीक्षण ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया हे करणार आहेत. गिर्यारोहणातील सुरक्षेसाठीच्या स्वयंनियंत्रणावर विंग कमांडर अमित चौधरी भाष्य करतील. तसेच ते गिर्यारोहणातील अपघतांसाठी समूह सहभागातून बचावकार्याच्या प्रारूपाची संकल्पना विशद करतील. त्याचबरोबर तज्ज्ञांबरोबर खुली चर्चाही या विशेष सत्रात होणार आहे. वार्षिक कार्यक्रमातील हे विशेष सत्र दिनांक १४ फेब्रुवारीला होणार आहे.

वार्षिक कार्यक्रमांतर्गत दिनांक १३ फेब्रुवारीला केविन मिस्त्री स्मृती व्याख्यान व केकू नवरोजी पुस्तक पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. प्रदीर्घ काळ भारतात वास्तव्यास असणारे अमेरिकन गिर्यारोहक स्टीफन अल्टर यांच्या ‘बिकमिंग ए माउंटन’ या पुस्तकाला यंदाचा केकू नवरोजी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ते स्वत: या पुस्तकावर बोलतील. केकू नवरोजी स्मृती व्याख्यानामध्ये मार्टिन मोरान हे भारतीय हिमालयातील त्यांच्या ३० वर्षांच्या अनुभवावर व्याख्यान देतील. त्याचबरोबर दीपा बलसावर आणि नंदिनी पुरंदरे या दार्जिलिंगमधील गिर्यारोहक शेर्पाच्या कार्यावर व हिमालयन क्लबच्या विशेष उपक्रमावर सादरीकरण करतील.

दोन दिवसांचे हे चर्चासत्र दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे होणार असून, त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२ २४९१२८२९

info@himalayanclub.org 

Web: www.himalayanclub.org