नेहमीच्या कामातून चार घटका वेळ काढावा, छान निसर्गरम्य ठिकाणी भटकावं, आराम करावा, आठवणीच्या कप्प्यात अनेक क्षण साठवावेत, कॅमेऱ्यात बंदिस्त करावेत आणि पुन्हा नव्या दमाने नेहमीच्या रामरगाडय़ाला जुंपून घ्यावं. आपल्याकडच्या पर्यटनाची ही एक सर्वसाधारण पद्धत. पण अशा पर्यटनात कधी कधी अपघातांना सामोरे जावे लागते, कधी नैसर्गिक आपत्ती येते, कधी आपल्याकडूनच चुका होतात. मग आनंदावर विरजण पडते. कधी कधी ही बाब जीवावरही बेतते. मग सुरू होते ती चुकांची उजळणी. त्यापेक्षा चुका होऊच नयेत किंवा संभाव्य धोके कसे टाळता येतील, यावर आपला भर तुलनेने कमीच असतो. पर्यटन आणि सुरक्षा हा तसा खूपच व्यापक विषय आहे. म्हणूनच सध्या लोकप्रिय असणाऱ्या लडाख, मनाली व किनारपट्टी पर्यटनात घडणाऱ्या काही चुका, घ्यावयाची पूर्वकाळजी, नैसर्गिक घटकांशी जुळवून घेणे, अशा मुद्दय़ांचा ऊहापोह करणारे हे दोन विशेष लेख.

लडाखला जाताय..

गेल्या काही वर्षांत लडाख हे पर्यटकांसाठी हॉट डेस्टिनेशन झालंय. दळणवळणाच्या तसेच पर्यटनस्थळावरील मूलभूत सोयीसुविधांमुळे तेथील गर्दीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. पण त्याचबरोबर काही मूलभूत गोष्टींबाबत नियोजनाच्या टप्प्यापासूनच पर्यटकांमध्ये जागृती करणेही महत्त्वाचे ठरते.

लेह  परिसर हा अति उंचावरील पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. लेह हे समुद्रसपाटीपासून सुमारे ११ हजार फुटांवर वसले आहेत. अशा अति उंचावरील ठिकाणी आपलं शरीर तेथील वातावरणाशी टप्प्याटप्प्याने जुळणे महत्त्वाचे असते. गिर्यारोहणात यालाच अ‍ॅक्लमटायझेशन म्हणतात. पण बऱ्याच वेळा वेळेअभावी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्याचे टाळले जाते. लेहला जाण्यासाठी श्रीनगर (५५०० फूट) -कारगील (९५०० फूट) मार्गे जाता येते. तर दिल्ली चंदीगडमार्गे मनालीहून (६००० फूट) रोहतांगपास (१३,५०० फूट), केलाँगमार्गे  १६ ते १७ हजार ८०० फूटांवरील चार खिंडी पार करून  लेहला पोहोचता येते.

समुद्रसपाटीपासून एकदम उंचावर जाण्याऐवजी टप्प्याटप्प्याने उंचीत वाढ करणे, त्या त्या टप्प्यावर तेथील वातावरणाशी जुळवून घेणं योग्य ठरतं. पण लेहला विमानतळ झाल्यामुळे अनेक पर्यटक थेट लेहला जातात. अशा वेळेस शरीराला तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यास किमान एकदोन दिवसांची विश्रांती देणे गरजेचे असते. पण हल्लीच्या घाईगर्दीच्या पर्यटनात हा वेळ वाचवण्याकडे कल असतो. परिणामी तुमचे शरीर तक्रार करू लागते. गेल्या काही वर्षांत यामुळे अनेक पर्यटकांना जीवालादेखील मुकावं लागलं आहे. पण त्यामागील शास्त्राची नीट माहिती नसल्यामुळे हा मुद्दा काहीसा दुर्लक्षितच राहिला आहे. त्यामुळे श्रीनगर कारगीलमार्गे जायचे आणि एकदा तेथील वातावरणाशी जुळल्यावर मनालीपर्यंतची प्रेक्षणीय स्थळे पाहत परतीचा प्रवास करायचा हे योग्य ठरेल.

अति उंचावरील पर्यटनस्थळी प्राणवायूची कमतरता असते. लेहमध्ये प्राणवायूचं प्रमाण ६५ टक्केच आहे. तर अतिथंडीमुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. अशा वेळी डिहायड्रेशनचा धोका तर असतोच, पण त्याचबरोबर पाण्यातून मिळणाऱ्या प्राणवायूलादेखील मुकावं लागतं. भरपूर पाणी पिणे हा त्यावरील चांगला उपाय आहे. त्याचबरोबर अशा ठिकाणी अति उत्साहीपणा करून धावपळ, अति कष्ट करू नये. त्याची सवय तर नसतेच, पण अशा वातावरणात धावपळ करण्याइतपत शरीर साथ देईलच असे नाही.

लडाखला जाण्यासाठी सवरेत्कृष्ट कालावधी हा जूनच्या मध्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंतचा आहे. अर्थात त्यावेळी ऊन खूप कडक असते तर सावलीत एकदम थंड वातावरण असते. त्यामुळे चांगले गॉगल्स तर हवेतच, पण अंगावर कायमस्वरूपी जॅकेटदेखील गरजेचे आहे.

लडाखमधील पासेस (खिंड) हे पर्यटकांसाठी आवर्जून भेट देण्याचे ठिकाण. या सर्व पासेस अति उंचावर आहेत. तेथील बर्फ, एकंदरीतच निसर्ग पाहून तेथेच रमण्याची शक्यता अधिक आहे. पण अशा पासेसमध्ये १५-२० मिनिटांपेक्षा अधिक काळ थांबू नये. कारण त्या उंचीसाठी आपले शरीर पूर्णत: तयार झालेले नसते. सुरुवातीला आपणास हे कळत नाही. पण अधिक काळ थांबून बर्फात खेळत राहिले की शरीरास त्रास जाणवू लागतो.

लडाख परिसरातील भटकंती ही अनेक वेळा वळणावळणाच्या रस्त्याने होत असते. अशा वेळी तेलकट, तूपकट खाद्यपदार्थामुळे गाडीमध्ये उलटी होण्याची शक्यता असते. उलटी झालीच तर परत अन्नपाणी सेवन केले जात नाही. मात्र त्यामुळे पुन्हा डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रवासासाठी शक्यतो ड्रायफ्रूट्स अथवा घरून नेलेल्या पदार्थाचे सेवन करावे.

दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला काहीही त्रास होत असला तरी तो त्वरित आपल्या पर्यटन आयोजकाला सांगावा. मला काय होतंय?  असं म्हणून दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक आहे. एखादी छोटी घटनादेखील उग्र रूप धारण करू शकते. स्वत:ची औषधे, तसेच प्रथमोपचार किट आणि संपूर्ण ग्रुपसाठी किमान एक ऑक्सीमीटर जवळ ठेवावा.

atmparab2004@yahoo.com