निसर्गसौंदर्याने नटलेले प्रदेश पर्यटनासाठी हमखास हॉट स्पॉट असतात. पण स्कॉटलंडमधील ‘आईल ऑफ स्काय’ला भेट द्यायची ती तेथील फेअरी पूल्ससाठी. पऱ्यांच्या प्रदेशातली निरागसता पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी.

आपल्या सह्य़ाद्रीसारखाच हादेखील रांगडा प्रदेश. इथे पावसाळ्यात असते तशीच हिरवळ आणि झुळूझुळू वाहणारे झरे. यातल्या कुठल्या कारणाने ते नेमकं माहीत नाही, पण पहिल्या भेटीतच स्कॉटलंडच्या ‘हाय लॅण्ड्स’विषयी जवळीक वाटू लागते. निसर्गाच्या मनोहारी सौंदर्यात हरवून जायचं असेल तर स्कॉटलंडमधील ‘आईल ऑफ स्काय’ला एकदा तरी जायलाच हवं.

फोर्ट विलियम्स शहरात बरीच हॉटेल्स आहेत, पण अगदीच आधी बुकिंग मिळालंच नाही तर आसपासच्या छोटय़ा गावांत छोटी हॉटेल्स तर आहेतच, पण होमस्टेच्या सुविधादेखील बऱ्याच आहेत. कधीच नावं न ऐकलेल्या अशा बालाहुलीश सारख्या गावांत मस्त हॉटेलात मुक्काम ठोकायचा. अगदी शांत गाव. जास्त करून लोकं मासेमारी करणारे. पुंजक्या-पुंजक्यांनी पसरलेली वस्ती. सगळ्या बाजूंनी ढगांची पागोटी बांधलेल्या टेकडय़ा. जुल महिन्यात म्हणजेच उन्हाळा असूनही हवेत मस्त गारठा असतो. आणि अधूनमधून पाठपुरावा करणाऱ्या भुरुभुरु पावसाच्या संगतीने येणारा बोचरा वाराही. रात्रीचे दहा वाजायला आले तरी बाहेर सूर्यप्रकाश असतो. युरोपातल्या उन्हाळ्याची ही खासियत.

हॉटेल साधंच. बेड अँड ब्रेकफास्ट पद्धतीचं. खाली डाईिनग रूम, किचन. वर अगदी छोटय़ा खोल्या. काही ठिकाणी न्हाणीघरही सगळ्यांना मिळून एकच. पण ही सुविधांची टंचाई स्कॉटिश आदरातिथ्याने भरून निघते. अगदी रात्रीदेखील असणाऱ्या सूर्यप्रकाशात जॅकेट चढवून चक्कर मारायला अगदी मस्तच वातावरण.  हॉटेलच्यापाठीच थोडय़ा अंतरावरून वाहणारा ओढा.  त्या मंद संधिप्रकाशात ओढय़ाचं अखंड संगीत ऐकताना जणू काही ब्रह्मानंदी टाळीच लागायला हवी.

सकाळी खास स्कॉटिश पद्धतीचा नाश्ता घ्यायचा. ब्लॅक पुिडग, बेकन, पॅन केक वगरे. सगळे पदार्थ अतिशय चविष्ट. नाश्ता उरकून ‘आइल ऑफ स्काय’च्या दिशेने निघायचे. पावसाची भुरभुर चालूच असते. आइल ऑफ स्काय हे स्कॉटलंडच्या उत्तरेकडचं बेट. पूर्वीच्या काळात फेरीने जावं लागायचं. पण आता पूल असल्यामुळे थेट गाडी चालवत जाता येतं. सगळा प्रदेश उंचसखल. वळणावळणाचे रस्ते. अधूनमधून दिसणारी सरोवरं. छोटय़ा छोटय़ा गावांमधली टुमदार घरं. वाटेत कधी चहाला थांबावं. किटली भरून आणून ठेवलेला चहा निवांतपणे पीत बसावं. आजूबाजूला स्थानिक मंडळी. कुणी नवरा-बायको-दोन मुलं असं कुटुंब. कुणी मध्यम वयाचे फक्त नवरा-बायको.. आणि त्यांचा लाडका कुत्रा. त्या कुत्र्याचं कौतुक केलं की दोघांची कळी खुलणार आणि मग ते आपल्याशी मोकळेपणानं बोलणार.

आइल ऑफ स्कायचे ‘फेअरी पूल्स’ तर पाहायलाच हवे. काय यथार्थ नाव दिलंय त्या परिसराला! सुंदर प्रदेश! वाटतं पऱ्या खरंच राहात असतील इथे. स्कॉटलंडमध्ये दऱ्यांना ‘ग्लेन’ म्हणतात. त्या असंख्य ग्लेन्सपकी ‘ग्लेन ब्रिटल’मध्ये हे ‘फेअरी पूल्स’ आहेत. दोन्ही बाजूंनी उतरणाऱ्या डोंगरसोंडांतून वळतवळत दृष्टीपलीकडे जाणारी दरी. क्वचित कुठे दाटीनं उभी असलेली झाडं सोडता बाकी छोटी झुडपं आणि सर्वत्र उगवलेलं हिरवंगार गवत. डोंगरांच्या उतारांवरून टप्पे घेत झरे वाहतायत. सूर्यप्रकाशाच्या खेळाने मस्त रंगीत आविष्कार त्यात तयार होतात. सारं वातावरणं अगदी स्वप्नात असल्यासारखे. परीकथेतल्या वर्णनाला साजेसे. त्या परिसर-संमोहनात बालपणीच्या निरागसतेची जाणीव पुन्हा एकदा अनुभवता येते.

प्रसाद निक्ते prasad.nikte@gmail.com