किनारपट्टी पर्यटन हा वर्षांतील सदासर्वकाळ तेजीत असणारा प्रकार. पण मुरुडच्या दुर्घटनेनंतर कोणता बीच सुरक्षित, कोणता असुरक्षित असे प्रश्न विचारले जाऊ लागले असले तरी एकंदरीतच पर्यटकांची वर्तणूक आणि मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप हादेखील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे किनारपट्टी पर्यटन आणि त्यामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम या आमच्या प्रबंधातून जाणवले.

अमुक एक समुद्र किनारा सुरक्षित आणि अमुक एक असुरक्षित हे अनेक वेळा खूपच सापेक्ष असते. तेथील वातावरण, पर्यावरण, भौगोलिक स्थिती आणि नैसर्गिक स्थिती अशा सर्व घटकांच्या कमी -अधिक प्रमाणानुसार आणि पर्यटकांच्या वर्तणुकीवर ही शक्याशक्यता बदलते.

डहाणू ते तेरेखोलपर्यंत किनारपट्टीवरील ११८ ठिकाणांचा अभ्यास तीन वर्षांपूर्वी केला होता. पाणी, जमीन, वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे सुमारे ४५ ठिकाणांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती दिसून आली. तुलनेने सिंधुदुर्ग, रत्नागिरीची किनारपट्टी बऱ्यापैकी सुरक्षित आहे. पण अनेक ठिकाणी दुर्घटना घडलेल्या होत्याच. किनारपट्टी सुरक्षित असली तरी पर्यटक म्हणून आपली वर्तणूक कशी आहे, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. काशीदसारखा किनारा पूर्णत: धोकादायक असे थेटपणे ग्रामपंचायतीकडून सांगितले जात असतानाही मद्यपान करून पाण्यात उतरणारे पर्यटक पाहिले आहेत.

भरतीच्या वेळच्या लाटांचा आपल्याला मोह होतो, आपण आत आत जात राहतो आणि पायाखालची वाळू निघून जाऊ लागते, तोपर्यंत पाणी गळ्याशी आलेले असते. पावसाळ्यात अधिक उंचीच्या वेगवान लाटा असतात. तीन-चार मिनिटात ही लाट संपते. पण खोलीचा अंदाज येत नसतो, लाट जवळच फुटल्याचा आनंद होतो, पण पायाखालून वाळू निसटू लागलेली असते. उंच लाटा आवडतात, पण ज्या वेगाने त्या येतात त्याच वेगाने खेचून नेतात. तसेच भरतीच्या वेळी किनाऱ्यावरील खडकाळ जागेचा अंदाज येत नाही. किहिमसारख्या किनाऱ्यावर अशा खडकांचे प्रमाण खूप आहे.

खडकाळ किनारपट्टीबरोबरच वाळू उपशामुळेदेखील पर्यटकांना धोका असतो. अर्नाळा, किहिम, केळवे, माहीम अशा ठिकाणी वाळूउपसा झाल्याचे आम्ही पाहिले होते. अगदी आरे-वारेच्या किनारपट्टीवरदेखील वाळू उपसा पाहिला होता. अशा वाळू उपशामुळे पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकण्याची शक्यता असते.

किनारपट्टी विस्तीर्ण असेल तर थेट पाण्यापर्यंत गाडय़ा नेण्याची विचित्र अशी  हौस असते. हर्णे मुरुडच्या बीचवर हा प्रकार तेव्हा सर्रास दिसला. अशा वेळी भान उरत नाही आणि अनावस्था प्रसंग ओढवण्याची शक्यता असते. गणपतीपुळे, सागरेश्वरसारख्या ठिकाणी जीवरक्षक पर्यटकांना सूचना देतात, पण पर्यटकांना त्याचे भानच नसते.

दुसरा धोका आहे तो प्रदूषणाचा. गोराई, अक्सा, जुहू, मढ, मार्वे अशा मुंबईनजीकच्या किनाऱ्यांवर अनेक ठिकाणी थेट ड्रेनेजचे पाणीदेखील सोडलेले असते. भरतीवेळी आपल्याला ते जाणवत नाही. पण त्या पाण्याचा शरीराला अपाय होऊ शकतो. किहिमसारख्या ठिकाणी मुंबई जवळ असल्याचा तोटा पावसाळ्यानंतर दिसून येतो. तेलगळती, बोटींची सफाई अशा अनेक कारणांमुळे तेथील पाण्यात पावसाळ्यानंतर प्रदूषण आढळून येते. तर पालघर जिल्ह्य़ातील किनारपट्टी प्रदूषित असल्याचे दिसून आले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बऱ्यापैकी छान बीच आहेत. पण तारकर्ली आणि देवबाग येथे मोठी गर्दी असते.  त्यांना तसेच पर्याय शोधायला लागतील.

दुसरा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे किनारपट्टी पर्यटन म्हटले की पाण्यात गेलंच पाहिजे अशी आपली संकल्पना आहे. पण सन अ‍ॅण्ड सॅण्डचा आपण विचारच करत नाही. पाण्यात जाऊन धिंगाणा धुडगूस घालण्यापेक्षा याचादेखील जरा विचार करायला हरकत नाही.

हे ध्यानात ठेवा

  • गावकऱ्यांच्या सूचना कटाक्षाने पाळा.
  • पाण्याच्या खोलीचा अंदाज नसेल तर अजिबात पाण्यात उतरू नका.
  • भरती -ओहोटीच्या वेळा तपासून घ्या.
  • पाण्यात उतरताना मद्यपान, धूम्रपान करणे पूर्णत: टाळावे.

mangalgogate@gmail.com