‘संथ वाहते कृष्णामाई’ या गीताची अनुभूती कानासोबत नजरेलासुद्धा होते असे एक सुंदर स्थळ आहे. कृष्णेच्या प्रवाहाचा अर्धवर्तुळाकार वेढा, चहुबाजूला काळीभोर कसदार जमीन आणि त्यावर उसाचे मळे. उन्हाळ्यात देखील सुखावणारी हिरवळ. हे ठिकाण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले खिद्रापूर गाव. कोल्हापूरहून इचलकरंजी माग्रे अथवा सांगलीहून नरसोबाची वाडी- कुरुंदवाड माग्रे खिद्रापूर गाठता येते.
इथल्या महादेवाचे नाव कोपेश्वर. अर्थातच रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला महादेव कोपेश्वर. मग साहजिकच त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे. ते काम श्री विष्णूनी केले त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्टय़ असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. महादेवाच्या आधी नंदीचे दर्शन येथे नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे.
साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत याच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे. या मंदिराचं खरे सौंदर्य दडलंय त्याच्या रचनेत. छोटय़ाशा दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो आणि समोर उलगडत जातो कित्येक शतकांचा इतिहास. समोर दिसतो ४८ खांबांवर तोललेला एक मंडप. आत जाऊन बघितल्यावर लक्षात येते कीत्याला तर छतच नाही. पण नीट लक्षपूर्वक बघितले की कळते संपूर्ण वर्तुळाकार रिकामी जागा मुद्दाम ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे.
पुढे सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.
केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. अन्य शिलालेखांप्रमाणे हासुद्धा पुरातत्त्व खात्याच्या ‘विशेष मर्जीतला’ असल्याने त्यालाही उन्हा-पावसाचा मनसोक्त आनंद लुटायला मिळतोय.

 

actress raveena tondon marathi news
‘आर्ची’च्या मनमोहक अदांमुळे रविना टंडनही घायाळ! अनेक सेलिब्रिटींना…
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
Hanuman mandir in pakistan | A 1500 Year Old Shri Panchmukhi Hanuman Mandir Is In Karachi Pakistan
पाकिस्तानातील १५०० वर्षे जुने श्री पंचमुखी हनुमानाचे मंदिर तुम्हाला माहितीये का?

डॉ. आरती आढे-रोजेकर
drmohi44@gmail.com