आषाढाच्या धो धो सरी कोसळून गेल्यावर, हिरवाईच्या अनेक छटा मिरवणाऱ्या आणि धबधब्यांचा जलजल्लोष साजरा करणाऱ्या गोव्याच्या जंगलात मारलेली एक फेरीसुद्धा तुम्हाला प्रसन्न करणारी ठरेल.

जेव्हा एखादी व्यक्ती बहुपलू असते तेव्हा काही वेळा तिच्यातील एखाद्याचं गुणवैशिष्टय़ाकडे लक्ष वेधलं जाऊन बाकीचे पलू दुर्लक्षित राहण्याचा धोका असतो. याची अनेक उदाहरणे चित्र-नाटय़सृष्टीत पाहायला मिळतात. पर्यटनातही अनेक ठिकाणे अशी आहेत की ज्यांचा एकच चेहरा कायम जगासमोर येतो आणि दुसरा अंधारातच राहातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राला खेटून असलेलं गोवा. गोवा म्हटल्यावर उसळत्या सागरलाटा आणि फेसाळते चषक हीच प्रतिमा सर्वसामान्य पर्यटकांच्या मनावर उमटलेली आहे. पण या राज्याला वन्यजीवनाचा अप्रतिम वारसाही लाभलेला आहे. गोव्याच्या या जंगलांना भेट द्यायला पावसाळ्यापेक्षा दुसरा उत्तम ऋतू नाही. आषाढाच्या धो धो सरी कोसळून गेल्यावर, हिरवाईच्या अनेक छटा मिरवणाऱ्या आणि धबधब्यांच्या जलजल्लोष साजरा करणाऱ्या गोव्याच्या जंगलात मारलेली एक फेरीसुद्धा तुम्हाला प्रसन्न करणारी ठरेल.

भौगोलिकदृष्टय़ा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये असलेलं गोवा, महाराष्ट्राच्या सह्यद्रीतील जंगल आणि कर्नाटकातलं जंगल यांतील दुव्याचं महत्त्वपूर्ण काम बजावतं. गोव्यातला सुमारे ५९ टक्के भूभाग वनाच्छादित आहे. या भूभागावर खाडीकिनाऱ्यांच्या कांदळवनांपासून ते सदाहरित रानापर्यंत अरण्याचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळेच नेहमीचा गोवा म्हणजेच पुरातन मंदिरे, ऐतिहासिक चच्रेस आणि सागर किनारे बाजूला ठेवून जर गोव्याच्या हिरव्यागार जंगलाकडे मोर्चा वळवला तर गोव्याचा खराखुरा ‘वाइल्ड चेहरा’ बघायला मिळतो.

सर्वसाधारणपणे जंगलात जायचे, अभयारण्यात फिरायचे म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर हत्ती, वाघ, बिबटय़ा असे मोठे प्राणीच येतात. पण या नेहमीच नजरेत भरणाऱ्या प्राण्यांपलीकडे एक छोटय़ा जिवांची आणि उडणाऱ्या पाखरांची दुनियाही आहे आणि गोव्याची जंगले या बाबतीत अतिशय संपन्न आहेत. गोव्याची पूर्व हद्द जिथे कर्नाटकला भिडलेली आहे तिथे भगवान महावीर अभयारण्य हे गोव्यातले सर्वात मोठे अभयारण्य आहे. या हिरव्यागर्द जंगलात गौर(गवा), सांबर, चितळ, बिबटय़ा असे मोठे प्राणी तर आहेतच, पण स्लेंडर लोरिस आणि फ्लाइंग स्क्विरलसारखे स्पेशल अ‍ॅपिअरन्स देणारे प्राणीही आहेत. या अरण्यात जे दोनशे सव्वा दोनशे प्रकारचे पक्षी आहेत त्यामध्ये ट्री पाय, ओरिओल, ड्रोंगो, मुनिया, बॅबलर, बुलबुल, वुडपेकर असे नेहमीचे भिडू तर आहेतच, पण ग्रेट हॉर्नबिल, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर, मलबार ट्रोगन, व्हर्नल हँिगग पॅरट, लिटल स्पायडर हंटरसारखे पक्षीप्रेमींना आकर्षति करणारे पक्षीही आहेत. महावीर अभयारण्यातील दाट जंगलात तुम्ही पायी चालत पक्षी निरीक्षणाचा आनंद घेताना जमिनीवरही बारकाइने बघायला विसरू नका. या अरण्यात धामण, मांजऱ्या साप, ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक असे बिनविषारी साप जसे आहे तसेच रसेल्स व्हायपर (घोणस), मण्यार, नाग, मलबार पिट व्हायपर असे विषारी सापही आहेत. त्यातही बदामी, गुलाबी रंगाचा आणि नाकावरचा उंचवटा मिरवणारा  ‘हम्प नोज्ड व्हायपर’ साप त्याच्या कॅमोफ्लेज रंगसंगतीमुळे आसपासच्या परिसरात असा मिसळून गेलेला असतो की विचारू नका. गोव्याच्या जंगलातला एकाच नजरेत प्रेमात पाडणारा साप म्हणजे ऑर्नेट फ्लाइंग स्नेक. इतर अनेक उडणाऱ्या प्राण्यांप्रमाणेच म्हणजेच फ्लाइंग फ्रॉग, फ्लाइंग स्क्विरल प्रमाणेच हा देखणा साप प्रत्यक्ष उडत नसला तरी ग्लाइड होत म्हणजे तरंगत तरंगत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो. दिवसा हालचाली करणाऱ्या या सापाच्या अंगावरील रंगांची नक्षी त्याचे ऑर्नेट विशेषण सार्थ करते. विशेषत: त्यामधील शेंदरी रंगाचे ठिपके पाहाताना पोवळी जडवलेल्या दागिन्याची आठवण होते.

याच अभयारण्यात तांबडी सुर्ला येथे गोव्यातील सर्वात प्राचीन, १२ व्या शतकातील शिवमंदिर आहे. तसेच गोव्याचे आकर्षण ठरलेला दूध सागर धबधबाही आहे. सुमारे हजार फुटांवरून तीनचार टप्प्यात कोसळणारा दूधसागर डोळ्यांचे पारणे फेडतो. ऐन पावसाळ्यात अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी गेली दोन वष्रे या धबधब्याचा रस्ता बंद केला जातो, पण नंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येही दूध सागराच्या पांढऱ्या शुभ्र धारा तितक्याच वेगाने ओसंडत असतात.

उडत्या (तरंगत्या) सापाप्रमाणेच गोव्याच्या जंगलात उडते सरडेही आहेत. त्यासाठी जायला हवं नॉर्थ गोव्यातील पोंडा तालुक्यातील बोंडला अभयारण्यात. गोव्यातील हे आकाराने सर्वात लहान अभयारण्य आहे. इथेच गोव्यातलं एकमेव प्राणी संग्रहालय असल्याने शनिवार-रविवारी कुटुंबासह पिकनिकला येणाऱ्यांची संख्या भरपूर असते. याच अभयारण्यात ड्रॅको अर्थात उडता सरडा अगदी सहज पाहायला मिळतो. या सरडय़ाच्या पायांना एक कातडी पडदा असतो, त्याच्या मदतीने हा सरडा आरामात उंच झाडावरून जमिनीकडे किंवा दुसऱ्या झाडाकडे तरंगत जातो. तसा आपल्या नेहमीच्या सरडय़ासारखाच हा दिसत असला तरी त्याच्या गळ्यावर एक छोटीशी, पिवळ्या रंगाची पताका असते, त्यामुळे तो ओळखता येतो. बोंडलाच्या अरण्यात तुम्हाला जायंट स्क्विरल्स अर्थात शेकरूही अगदी जवळून पाहायला मिळतात.

या दोन जंगलांशिवाय गोव्यातील नेत्रावळीचं जंगल आणि कोटिगाव अभयारण्य देखील आपल्या समृद्ध वन्यसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र कोणत्याही जंगलात स्थानिक वाटाडय़ाशिवाय जंगलात शिरायचे धाडस करू नका.पावसाळ्यात काही भागांमध्ये जळवांचे प्रमाण जास्त असते, त्यापासून काळजी घ्या. जंगलातील फुले, फळे, भूछत्र, अळंबी तोडू नका. वन्य प्राण्यांना (अगदी सरपटणाऱ्याही) डिवचू नका. वन भ्रमंती करायची तर ही खबरदारी घ्यायलाच हवी. मग पुढच्या गोवा भेटीमध्ये गोव्याचा हिरवा खजिना अवश्य बघा.

कसे जाल?

  • गोव्यातील अभयारण्यांसाठी दाबोलिम हा सोईचा विमानतळ आहे. पणजीहून महावीर अभयारण्य ५७ किलोमीटर तर बोंडला ५० किलोमीटरवर आहे. रेल्वेने गेल्यास मडगाववरून जावे.
  • कधी जाल ? पावसाळ्यातील वन्यजीवन अनुभवण्यासाठी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर.
  • निवास – वनखात्याची निवास व्यवस्था महावीर आणि बोंडला दोन्हीकडे आहे.

मकरंद जोशी

makarandvj@gmail.com