पावसाळा जवळ आला की, भंडारदऱ्यातील झाडे लयबद्ध लुकलुकू लागतात. जणूकाही या झाडांवर दीपमाळाच आहेत. काजव्यांच्या रूपाने झाडांवर प्रकाशफुलेच लगडली असावीत, असा हा देखावा डोळ्यांचे पारणे फेडतो.

धुक्याची दुलई पांघरलेला सखा सह्यद्री, मिट्ट काळोख, रातकिडय़ांचा किर्रकिर्राट अशा अद्भुत वातावरणात भूमीवर तारांगणच अवतरले तर लख लख चंदेरी..हे गाणे सहज ओठावर येईल ना? भंडारदऱ्यातील काजव्यांची मायावी दुनिया क्षणोक्षणी अशा अनेक गाण्यांची आठवण करून देते आणि आपल्या काव्यप्रतिभेलाही साद घालते. दरवर्षी वर्षां ऋतूच्या स्वागतासाठी इथे काजव्यांची मैफल जमते आणि त्यात आपल्यालाही सहभागी करून घेत एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.

Loksatta Lokrang Maharashtra Foundation is recognized in Maharashtra for awards in literary and social fields
पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
Aditya Thackeray Yavatmal
‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ दरवर्षी भंडारदऱ्यात काजवा महोत्सव आयोजित करतं. यंदा २० मे ते २० जून या महिनाभराच्या कालावधीत भंडारदऱ्यातला हा दीपोत्सव सुरू आहे. या काजवा महोत्सवात जाणं झालं ते गेल्या गुरुवारी. अगदी वटपौर्णिमेच्या दिवशीच. त्यामुळे चंद्रप्रकाशात काजवे काय ‘दिवे’ पाजळणार, अशी हिरमोड करणारी शंकेची पाल मनात चुकचुकलीच. पण, भंडारदऱ्यात पोहोचलो आणि काजव्यांनी ही शंका फोल ठरवली. चंद्रप्रकाशामुळे काजव्यांचे तेज लपले जात होते हे खरे, पण घनदाट झाडांवर ही प्रकाशफुले अशी काही चमकत होती ही चंद्रप्रकाश फिका वाटावा. अगदी चंद्राच्या साक्षीनं काजव्यांची ही रोषणाई डोळे दिपवणारी होती.

भंडारदारा धरणाच्या सुमारे ५० किलोमीटर परिघातील गावागावांतल्या जंगलातील ही रोषणाई पर्यटकांना मोहिनी घातले. हे अद्भुत दृष्य डोळ्यांत साठविण्यासाठी या गावांगावांतून जाणाऱ्या जंगल रस्त्यावर रात्री पर्यटक मोठय़ा संख्येने दिसतात. वाहनांतून फिरताना हे तेजोमय काजवे सर्वाधिक कुठे दिसतात, याचा शोध भिरभिरती नजर घेतच असते. एखाद्या ठिकाणी गाडी थांबवून दिवे बंद केले की हे झाडावरचे दिवे लुकलुकू लागतात. मग, इथे खूप काजवे आहेत, तिथे खूप आहेत, असे म्हणतं आपण अलगद काजव्यांच्या प्रेमात पडतो आणि जंगलात स्वत:ला हरवून बसतो. जिकडे तिकडे काजवेच काजवे. काजव्यांचा हा दीपोत्सव आपसूकच  जंगल भ्रमंती घडवून आणतो. या रोषणाईकडे पाहिले की झाडांवर लगडलेली ही प्रकाशफुलेच आहेत, असे वाटते. या झाडांवरची काजव्यांची आरास अशी दिसते की जणूकाही तो ख्रिसमस ट्रीच आहे. एकाच लयीत काजव्यांचे चमकणे कधी कधी दीपमाळेसारखे भासते. अगदी तशीच लुकलुकणारी.

मध्येच एखादा काजवा अलगद आपल्या अंगावर खेळतो. आपणही त्याच्याशी खेळू लागतो. पण काही क्षणांतच तो उडून जातो आणि  जणूकाही हिराच हातून निसटला की काय, अशी आपली मन:स्थिती होते. पण, पुढच्याच क्षणात लखलख करत काजवा आपल्या चेहऱ्याचर हलकेच हसू उमटवतो. काजव्यांचा हा प्रकाशखेळ अनुभवताना रात्र कधी सरते, हे कळतही नाही आणि हा खेळ अर्धवट सोडून जावा असेही वाटत नाही.

भंडारदऱ्याचा परिसर वृक्षराजीने बहरलेला. बेहडा, सादडा, हिरडा, उंबर, आंबा, जांभूळ या झाडांवर जणू फुलेच बहरावीत, असे काजवे दिसतात. भंडारदरा, मुतखेल, कोलटेंभे आदी जवळपास दहा-बारा गावांत ही रोषणाई दरवर्षी अनुभवता येते. काजव्यात असलेल्या ल्युसिफेरीन या द्रव्याची ऑक्सिजनशी विक्रिया घडली की जैवप्रकाशाची निर्मिती होते. काजवा हा अल्पायुषी कीटक. जेमतेम दोन दिवसांचे आयुर्मान. म्हणजे साधारणपणे दोन रात्री तो प्रकाश देतो. अल्पायुष्यातही दुसऱ्याला आनंद देण्याची, विस्मयचकित करण्याची आणि प्रकाशमान होण्याची त्याची ताकद मात्र स्फूर्तिदायी आहे.

वर्षां ऋतूच्या स्वागतासाठी आलेल्या या काजव्यांची मैफल साधारण महिनाभर रंगते आणि पर्जन्यराजाशी गळाभेट घेतल्यानंतर अलगदपणे निरोप घेते. मग एक अनामिक हुरहुर लागते.  पुन्हा भेटीची ओढ लागते. पण, भंडारदऱ्यात पावसाळ्यातला बहरलेला निसर्ग आपली मनोवस्था ओळखून आपल्याला हलकेच कवेत घेतो. खरंतर पावसाळा भंडारदरा भटकंतीचा कालावधी. याच कालावधीत ओसंडून वाहणारे भंडारदरा धरण पाहण्याची मजा काही औरच. एमटीडीसीच्या राज्यभरातील रिसॉर्टचं वैशिष्टय़ या ठिकाणीही दिसतं. ते म्हणजे लोकेशन. भंडारदरा धरण पाहावं तर याच रिसॉर्टमधून. अगदी रिसॉर्टला लागूनच धरण आणि पलीकडे धुके पांघरलेला सह्यद्री असे विलोभनीय दृश्य दिसतं. रंधा आणि अंब्रेला धबधब्यांवर जवळपास ४५ मीटरवरून कोसळणारा जलप्रपात अंगावर घेण्यासाठी इथे पर्यटकांची रीघ असते. भंडारदऱ्यावरून सुमारे २६ किलोमीटर असणारा घाटघर आणि कोकणकडा परिसरही रमणीय. पावसाळ्यात कोकणकडय़ावरून दिसणारं दृश्य अप्रतिमच. अगदी धुक्यात हरवलेला हा परिसर तासन्तास पाहतच राहावा, असा आहे. भंडारदऱ्याला आलं की रतनवाडीतलं अमृतेश्वर मंदिर आपल्या भ्रमंतीयादीत असायलाच हवं. हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे.   इथल्या रतनगड किल्ल्याबरोबरच, आकाशाशी स्पर्धा करणारे कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, सांदन व्हॅली भटक्यांना साद घालत असतात. दाट धुके त्यांचे सौंदर्य आणखी खुलवते. ही सगळी भ्रमंती वेळेचे भान हरपून टाकते. हळूहळू धुके विरळ होऊ लागते आणि निरोपाची वेळ जवळ येते.  नवी ऊर्जा, अनुभवसमृद्ध होऊन आपण मार्गस्थ होतो. पण, आठवणींच्या एका कप्प्यात काजवे मात्र चमकतच राहतात.

सुनील कांबळी sunil.kambli@expressindia.com