दुष्काळ हा वाईटच. पण, अशा दुष्काळात इतिहासाच्या काही पाऊलखुणा समोर येतात. धरणक्षेत्रात असंच काहीसं घडलंय. मर्यादित काळासाठी का होईना, या पाऊलखुणांचा वेध आपल्या भटकंतीत घेता येईल.
वरुणराजाच्या नाराजीमुळे सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस झाला आणि परिणामी महाराष्ट्रावर दुष्काळ ओढवला. आधीच अल्प पर्जन्यामुळे कमाल पातळी न गाठू शकलेली धरणे खरिपाच्या हंगामाला सुरुवात होताच झपाटय़ाने रिती होऊ लागली. धरणक्षेत्रातील पाणी हटू लागले आणि वर्षांनुवर्षे पोटात दडवून ठेवलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा गाळातून डोकावू लागल्या. कुठे घाट, कुठे मंदिरे, कुठे मशिदी, कुठे नुसत्याच काही मूर्ती अथवा मंदिराचे अवशेष, तर कुठे चक्क पुरातन बंधारे दिसू लागले. सोशल मीडियातून वणव्यासारखी ही माहिती जगभर पोहोचली. इतिहास अभ्यासकांबरोबरच पर्यटकांचे थवेच्या थवे आकसलेल्या धरणांकडे झेपावले. सर्वाधिक लोकप्रियता लाभली ती उजनी धरणातील पळसनाथाच्या मंदिराला आणि राधानगरी येथील बेनझीन व्हिला नामक वाडय़ाला. यामागोमाग नंबर लागला तो नाशिकच्या चांदोरी येथील प्राचीन मंदिरांच्या समूहाचा. पाठोपाठ माणिक डोह धरणातील निजामकालीन मशिदी, औरंगाबादेतील हर्सूल तलावातून डोकावलेला पुरातन बंधारा, शिवसागर जलाशयाचे पाणी आटून बाहेर आलेले प्राचीन मंदिर अवशेषांच्या बातम्या आल्या. मात्र पुण्याजवळील पवना आणि भाटघर जलाशयात गडप होणाऱ्या तीन देवस्थानांची दखल अद्याप दिसली नाही.
भोरजवळील वेळवंडी नदीवर १९२७ साली भाटघर धरण बांधण्यात आले. धरणाचे पाणी भरत गेले आणि वेळवंड गावातील नागेश्वर महादेवाचे मंदिर तसेच पैलतीरावरील कांबरे बुद्रुक गावातील कांबरेश्वराचे मंदिर पाण्यात लुप्त झाले. तेव्हापासून दर वर्षी साधारण १० महिने ही मंदिरे पाण्याखाली असतात. शिमग्यानंतर जसजसे पाणी ओसरत जाते तशी ही मंदिरे पुन्हा पाण्याबाहेर येतात. जणू काही वार्षिक उपक्रमच म्हणावा. बहुतांश काळ पाण्यात व्यतीत करणाऱ्या या मंदिरांवर पाण्याच्या प्रवाहाच्या घर्षणाचा तसेच साचणाऱ्या गाळाचा विपरीत परिणाम होऊन मंदिराच्या मूळ वास्तूचे बरेच नुकसान झालेले आढळते. नागेश्वराचे मंदिर तर काही वर्षांपूर्वी पूर्ण ढासळले होते. गावकऱ्यांनी मिळून जमेल तसे दगड रचून त्याचा जीर्णोद्धार केल्याचे वेळवंड ग्रामस्थांकडून समजले.
भोरहून पसुरे मार्गे वेळवंड गावं साधारण
४३ किमी अंतरावर वसलेले आहे. गावातून बांबू आयलंड नावाच्या फार्म हाउस प्रकल्पाच्या कच्च्या सडकेने जलाशयाकडे चालत जाताना वाटेत नव्याने बांधलेले वाडेश्वराचे दर्शन घडते. मंदिर परिसरात गावकऱ्यांनी गाळात इतस्तत: सापडलेल्या मूर्ती, पिंडी, नंदी तसेच एक वीरगळ रचून ठेवली आहे. पुढे शेत ओलांडून काही अंतर चालत जाताच पूर्वाभिमुख नागेश्वर मंदिराचे दर्शन घडते. गावकरी याला नागोबा मंदिर नावाने ओळखतात. मंदिराचे अवशेष मंदिराच्या सभोवती विखुरलेले आहेत. अनेक वीरगळी गाळात अध्र्याअधिक रुतलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. मंदिराला प्रदक्षिणा घालताना लक्षात येते की काही वर्षांपूर्वी ढासळलेले मंदिर उभारताना ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारातील वीरगळींचा वापर अनवधानाने भिंती उभारण्यासाठी केला असावा. गाभाऱ्यासमोरच एक मोठा नंदी आणि त्यासमोर एक पिंडी तर आवारात एक-दोन झिजून जीर्ण झालेल्या, भग्न मूर्ती रचून ठेवलेल्या आहेत. सभामंडपात कासव शिल्प आहे. गाभाऱ्यात शंकराची पिंडी आणि कोनाडय़ात इतर काही मूर्त्यां पाहायला मिळतात. पैलतीरावर कांबरेश्वराच्या मंदिरावर फडफडणारा ध्वज लक्ष वेधून घेतो.
नाविक हजर असल्यास होडीने जलाशय ओलांडता येतो, पण ते शक्य नसल्यास ३७ किलोमीटरचा फेरा घेत माळेवाडीमार्गे कांबरे खुर्द गाठावे लागते. गावातील प्राथमिक शाळेशेजारून जाणारी वाट थेट कांबरेश्वरापाशी घेऊन जाते. कांबरेश्वराचे मंदिर तुलनेने अजूनही सुस्थितीत उभे आहे. ऐसपैस सभागृह आणि गर्भ गृहावरील एकसंध छत अजूनही शाबूत आहे. मंदिराचा कळस कच्च्या विटांचे बांधकाम करून त्यावर चुन्या गुळाच्या लिंपणाचे सुंदर नक्षीकाम करून सुशोभित करण्यात आलेला आहे. गर्भगृहावरील कळस कमळाकृती असून मंदिराच्या छताच्या कोन्यांवर नागशिल्पे कोरलेली आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरील तसेच गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील पट्टीवर गणेश शिल्प कोरलेले आहे. मंदिराच्या पुढय़ात चौथऱ्यावर नंदी विराजमान झालेले आहेत. आवारात काही वीरगळी विखुरलेल्या आढळतात. सततच्या वाहणाऱ्या प्रवाहामुळे मंदिराच्या कळसाचे नक्षीकाम पार झिजून गेलेय. गर्भगृहात शिवलिंग आणि काही मूर्ती विराजमान आहेत. जलाशयात दूरवर मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत, काही शिळा गावातील शाळेशेजारी रचून ठेवलेल्या आढळल्या.
गावात एक जुन्या बांधणीची पिंडीच्या आकाराची दगडी विहीरही पाहायला मिळते. दोन्ही मंदिरांबद्दल लिखित इतिहास हाती लागला नाही. ग्रामस्थांकडून नेहमीप्रमाणे पांडवकालिक गृहीतकं ऐकायला मिळाली. थोडक्यात गावकरी अनभिज्ञच आहेत. पण कांबरे गावातील विशाल ओंबळे याने आपल्या परीने कांबरेश्वराची माहिती कांब्रेक ब्लॉगस्पॉटवर दिली आहे. अर्थात त्यावर गावकऱ्यांमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या दंतकथांचा समावेश आहे.अभ्यासकांनी त्यांचा वापर करून मंदिरांचा अन्वयार्थ लावायला हरकत नाही.
मावळ प्रांतातील पवना नदीवर पवना धरण १९७२ साली बांधण्यात आले. पवना खोऱ्यातील अजिवली गावाजवळील वाघेश्वराचे मंदिर पाण्याखाली गेले. हे मंदिरदेखील १० महिने पाण्यात आणि २ महिने पाण्याबाहेर असते. मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. बहुतांश भिंती ढासळल्या आहेत. मात्र मुख्य प्रवेशद्वार सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह असा डोलारा पेलत कोरीव दगडी खांब अजूनही तग धरून आहेत. मंदिरासमोर भग्न नंदी आणि पिंडी टेकू लावून सावरलेली आहे. आवारात नक्षीकाम कळसाचे केलेले दगड, काही मूर्ती, वीरगळी, सतीशिळा विखुरलेल्या आढळतात. दोन गणेशमूर्ती तर गर्भगृहात शिवलिंग आणि कोनाडय़ात पार्वतीची मूर्ती आढळते. खांबांवर कीर्तिमुख, फूल-पानांचे नक्षीकाम आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेश तर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. देवदर्शनासाठी आलेल्या मंदिराच्या पुजाऱ्याकडून कळले की येथे अंदाजे दोनशे किलो वजनाची पंचधातूची भली मोठी घंटा होती. ती आता गावात नव्याने बांधलेल्या वाघेश्वराच्या मंदिरात कडी-कुलुपात संरक्षित ठेवलेली आहे.
गावातील लोकांकडून फारशी ठोस माहिती मिळत नाही. पण अभ्यासकांच्या मते ही वास्तूशैली पाहता या मंदिराचा कालावधी मध्ययुगीन असावा. मुघलकालिन शिखराची रचना ही याकाळाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
दुर्दैवाने आपल्याकडे या पुरातत्त्वाची पुरेशी दखल घेतली जात नाही. प्रतिवर्षी गाळ आणि पाण्याखाली लुप्त होणारा हा वारसा उन्हाळ्यापुरता कौतुकाचा धनी होतो. एखाद्या वास्तूच्या वाटय़ाला हे कौतुकदेखील नसते. निदान जेव्हा दिसतात तेव्हा तरी त्याचा आनंद घ्यायला हरकत नाही.
प्रीती पटेल patel.priti.28@gmail.com