मांडव्याहून दक्षिणेकडे चालत मोलगीला पोहोचलो होतो. मोलगी हे सातपुडय़ाच्या दक्षिण रांगेत वसलेलं बाजाराचं गाव. थोडं उंचावर वसलेलं. ती डोंगररांग उतरली की मी सातपुडय़ातून बाहेर पडणार होतो. साठ दिवसांच्या ‘वॉकिंग ऑन द एज’ मोहिमेतील सुरुवातीची सातपुडय़ातली भटकंती आता संपणार होती. मोलगीजवळ डोंगरावरुन घाट जिथे उतरायला लागलो तिथेच दाब नावाचं गाव आहे. हे आदिवासींच्या याहा मोगी देवीचं स्थान. भिल्लोरी भाषेत याहा म्हणजे आई.

वाट उतरायला सुरुवात करताच दूरवर सपाटीचा प्रदेश दिसायला लागला. सातपुडय़ाची साथ आता काही तासातचं सुटणार होती. थांबत विश्रांती घेत तो नयनरम्य घाट बऱ्यापैकी उतरलो, तेव्हा दक्षिण क्षितिजावर डोंगराची पुसटशी रेष दिसली आणि अंगावर रोमांच आला! तो सह्य़ाद्री पठाराचा उत्तरकडा दिसत होता. गेल्या पाच दिवसांत सातपुडय़ाशी नवी मैत्री जुळली होती. त्यामुळे त्याला सोडताना मनात थोडी हुरहुर होती. पण आता जुना मित्र सह्य़ाद्री खुणावून बोलवत होता. पायाचा वेग आपसूकच वाढला.

घाट उतरल्यावर पूर्ण सपाटी. अक्कलकुवा शहरात एक दिवस मुक्काम करुन पुढे निघालो. अक्कलकुव्याच्या दक्षिणेला तापीवरचं उकाई धरण असल्यामुळे पूर्वेकडून वळसा मारायला लागणार होता. इथे गुजरातची एक चिंचोळी पट्टी महाराष्ट्रात घुसली आहे. त्यामुळे थोडी भटकंती गुजरातमधूनदेखील झाली. तापी ओलांडली. नर्मदा आणि तापी या दोन्ही प्रमुख पश्चिमवाहिन्या या भटकंतीत पाहायला मिळाल्या.

आता सह्य़ाद्रीचा कडा स्पष्ट दिसायला लागला होता. पुढचे दोन दिवस उत्तरेला सातपुडा आणि दक्षिणेला सह्य़ाद्रीची साथ होती. जसा भूभाग बदलला तशी भाषाही. पावरी, नुईरी, भिल्लोरी या सातपुडय़ाच्या भिल्लभाषा, सपाटीला देहवली. पुढे सह्य़ाद्रीजवळ मावची गावित भाषा ही नंदुरबार जिल्ह्य़ात सपाटीला बोलली जाते. तशीच सह्य़ाद्री पठारावर धुळे जिल्ह्य़ातही बोलली जाते. पण दोन्हीमध्ये फरक आहे म्हणे. अर्थात मला कुठलीच न समजल्याने फरकही कळला नाही.

तापी ओलांडून मी आता सह्य़ाद्री पठारालगतच्या सखल भागात आलो होतो. आतापर्यंत सह्य़ाद्रीच्या पठाराचा पश्चिम कडाच पाहिला होता. पण इथे उत्तर कडाही पाहायला मिळाला. त्याच्या पायथ्याशी हळदाणी गावात चर्चच्या पास्टरच्या घरी एक मुक्काम केला. त्या भागात बरीच ख्रिश्चन वस्ती आहे. माणसं वागायला सौम्य, शिक्षणाचा प्रसार चांगला. बहुतेक कुटुंबं दोन मुलांपर्यतच मर्यादित. या सगळ्यांमुळे परिस्थिती तुलनेत बऱ्यापैकी होती.

हळदाणीला एका टेकाडावर छान छोटीशी गढी आहे. तिच्याच बाजूने जाणाऱ्या वाटेवरुन मी पठाराकडे निघालो. सह्य़ाद्रीचे कडे जवळून दिसायला लागले. ओळखीचा भूभाग दिसायला लागला होता. कुठे लांब जाऊन परतताना आपल्याला ओळखीची ठिकाणं दिसायला लागल्यावर घर जवळ आल्याची सुखद भावना होते, तस वाटलं अगदी.

घाटापर्यंतचा रस्ता बराच वळणावळणाचा होता. निम पानगळीचं जंगल. घाटाखाली असल्याने उकाडा खूप. बाटलीतल्या गरम झालेल्या पाण्याने तहान काही शमत नव्हती. त्यामुळे एखाद्या पाडय़ात माठाचं पाणी प्यायला मिळालं की जीव अगदी सुखावायचा. थांबत, विसावत खोसे घाटाने पठारावर आलो. घाट छोटासाच, पण उन्हात दम काढला त्यानं.

पठारावर धुळे जिल्ह्य़ात थोडं चालल्यावर आता लक्ष्य होतं ते नाशिक जिल्ह्य़ातलं साल्हेरवाडी हे साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याचं गाव. सटाण्याच्या रोहित जाधवने तिथे सुनील भोये यांच्याकडे माझी व्यवस्था करून दिली होती. दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत साल्हेर किल्ल्यावर काम करत असताना रोहितची सुनिलचे वडील काशिनाथदादांशी ओळख झाली होती. रोहित साल्हेरला यायचा तेव्हा काशिनाथदादांशी तासंतास साल्हेर किल्ला आणि परिसराची माहिती घ्यायचा. रोहितने ‘साल्हेर तख्त’ नावांचं एक छोटेखानी पण माहितीपूर्ण पुस्तकदेखील लिहलंय. शहरातली साधनं आणि स्थानिकांचे ज्ञान एकत्र आलं की चांगलं काम होऊ शकतं याचे हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.

पुढचा मुक्काम अर्जुन सागर धरणालगतच्या सुपले दिघर गावात. काशिनाथ दादांचे बंधू उलुशा भोये यांच्याकडे. काशिनाथदादांसारखंच एकमेकांना सांभाळून राहणारं कुटुंब. सगळेच माळकरी. त्यामुळे वृत्ती सात्विक. गेलो तेव्हा सांजावलं होतं. मंडळी शेतावरुन येऊन आंघोळी उरकत होती. उलुशादादांच्या पत्नी पारीबाई अंगणात शेणाचा हात फिरवत होत्या. रात्री त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाऊन ओसरीवर अंथरलेल्या गोधडीवर अंग टाकले. लख्ख चांदणं पसरलं होतं. अंगणात निजानीज होत होती. पारीबाईंच्या नातीनं त्यांच्याकडे ‘गाण सांग’ म्हणून हट्ट धरला. गोड आवाजात पारीबाई गाण म्हणायला लागल्या. ‘‘खंडेराव देव तनुं ठिकनू कुठं नं रं .. काय सांगू बाई मनं ठिकनू जेजुरगडं..’’ असंच वेगवेगळ्या देवांचं स्थान विचारुन त्या प्रश्नाचं उत्तर त्याचं कडव्यात येत होतं. गोधडीवर आजीच्या कुशीत पडल्या पडल्या ती तीन वर्षांची नात गाणं ऐकत होती. पाठोपाठ जमेल तसं म्हणतही होती. शब्द इकडे तिकडे होत होते, पण चाल मात्र पक्की उचलत होती. पारंपरिक गाण्याचा वारसा आजीच्या ओंजळीतून थेंबाथेंबाने नातीच्या ओंजळीत पडत होता. सह्य़ाद्रीच्या कुशीत मला झोप कधी लागली ते समजलंच नाही.

प्रसाद निक्ते walkingedge@gmail.com