शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्या शिवछत्रपती या ग्रंथात पावसाळ्यात चिंब भिजलेल्या सह्य़ाद्रीचे फारच सुरेख वर्णन करतात. ते म्हणतात, ‘‘सह्य़ाद्रीचा खांदाबांधा विशाल आहे. तितकाच तो रेखीव आहे. त्याच्या घट्ट अंगाखांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की तेथून खाली डोकावत नाही. मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की या खांद्यांवरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो तो ऐकावा. सह्य़ाद्रीचं हसणं खिदळणं ते. बेहोश खिदळत असतो.’’ पावसाळ्याचे चार महिने सखा सह्य़ाद्री पावसाच्या शतधारांनी अव्याहत निथळत असतो. एवढा राकट, रांगडा गडी तो. चार महिने त्याचे महास्नान सुरू असते. त्याच्या अंगावरची लाल माती या अभिषेकाने वाहून जाते. धबधब्यांच्या रूपाने हे त्याचे स्नानोदक खाली येते आणि असंख्य ओढे, नद्या यांच्यामाग्रे प्रसाद रूपाने सर्व जमीन सुजलाम् सुफलाम् करीत जाते. नवरात्रीचे घट बसू लागले की सह्य़ाद्रीचा हा स्नानसोहळा संपू लागतो. त्या असंख्य मेघमाला निरोप घेताना आहेर म्हणून सह्य़ाद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. सोनकी, कारवी, कांचन, झेंडू, तेरडा अशा असंख्य फुलांची नक्षी त्या शेल्यावर शोभून दिसते. देखण्या सह्य़ाद्रीचे रूप आता अजून खुलून दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सह्य़ाद्रीचा स्नानसोहळा आपल्यासारख्या भटक्यांनी विविध वेळी आणि विविध ठिकाणी अनुभवला. कधी तो कुठल्या घाटवाटेवर, तर कधी गर्द रानात. कधी रायरेश्वराच्या पठारावर तर कधी धारकुंडसारख्या धबधब्याच्या ठिकाणी. कधी नाणेघाटातल्या नानाच्या अंगठय़ावर तर कधी थेट मराठवाडय़ातल्या कपिलधारा क्षेत्री. मेघमालांच्या वर्षांवासोबत आपलीसुद्धा चिंब भटकंती सुरू होती. जो चालतो त्याचं नशीबसुद्धा चालत राहतं असं आपल्याकडे सांगितलं जातं. सह्य़ाद्रीच्या साक्षीने त्याचा हा महास्नानसोहळा अनुभवल्यावर सह्य़ाद्रीचं बदललेलं रूप बघायला आणि अनुभवायला आता नवनवीन ठिकाणं आपली वाट पाहात असतात. आश्विनाचा महिना सुरू झालेला. मेघमाला आपले रिकामे कुंभ घेऊन परतू लागलेले. थंडीची चाहूल देणारं धुकं सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर पसरलेलं दिसू लागतं. अनेक फुलांची रंगपंचमी सर्वत्र दिसायला लागते. अतिशय आल्हाददायक हवा आणि सगळा परिसर हिरवागार झालेला. अशा वेळी घरात बसणं शक्यच नाही. कदाचित चिंब भटकंती नसेल जमली तरी आता मात्र सह्य़ाद्रीच्या भेटीला जायलाच हवं. नवरात्रीचे दिवस संपून दसरा उजाडतो. हा तर सीमोल्लंघनाचाच दिवस. तोच मुहूर्त साधून बाहेर पडावं. रानभाज्या आणि रानफुले आपल्या स्वागताला तयार असतातच. कौला-भारंगी-शेवळं-टाकळा या खास रानभाज्या दूर ग्रामीण भागातच खायला मिळतील. अनेक फुलांची उधळण झालेली बघायला मिळेल. त्यासाठी फक्त कासच्याच पठारावर गर्दी करण्याची गरज नाही. रतनगड, पाबरगड, पेबचा किल्ला, पानशेत ते वेल्हा परिसर, रायरेश्वर, हाटकेश्वर, बागलाण परिसरातले किल्ले इथेपण असंख्य रानफुले पसरलेली असतात. विविध रंगांची ही रानफुले कोवळ्या उन्हात अत्यंत देखणी आणि तजेलदार दिसतात. डोंगरमाथ्यावरून अजूनही अनेक निर्झर वाहात असतात. ट्रेकिंगसाठी हा सुकाळ असला तरी निव्वळ भटकणाऱ्यांसाठीसुद्धा ही पर्वणी असते. त्रिपुरी पौर्णिमेला गावोगावी शंकराच्या मंदिरात उजळल्या जाणाऱ्या दीपमाळा अगदी न चुकता बघाव्यात. गावोगावच्या जत्रा-यात्रा किंवा सप्ताह या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावावी.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natural attractions of sahyadri ranges in maharashtra
First published on: 04-10-2017 at 02:56 IST