मालवणपासून ३० किमीवर असलेले कुडोपी गाव थोडे आडबाजूला आहे. डोंगरातून वाहात येणार पाणी पाटाने गावात खेळवले आहे. त्यावरच गावाची शेती, बागायती व धुणीभांडय़ांच्या पाण्याची गरज भागते. गावात कातळशिल्पांबद्दल चौकशी केली, पण असे काहीही आपल्या गावात नाही आहे असे गावकऱ्यांनी सांगितले. तितक्यात मला आठवले की, आमच्या गावात दगडात कोरलेली प्रचंड विहीर आहे. विहिरीची रचना अशी आहे की, त्यात घोडय़ावर बसूनही पाण्यापर्यंत जाता येईल. ही विहीर पांडवांची विहीर म्हणून ओळखली जाते. (आपल्या भारतात गावातल्याच सामान्य लोकांनी पिढय़ान्पिढय़ा खपून असे काही अचाट, प्रचंड काम केलेले असेल तर त्याला पांडवांचे नाव दिलेले आढळते.) त्यामुळे या कातळशिल्पांनाही पांडवांचा काही संदर्भ असेल, म्हणून पांडवाच्या शिल्पांबद्दल विचारल्यावर गावकऱ्यांनी होकार दिला. पांडवांची चित्रे सडय़ावर असल्याचे कळले.
गावातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही गावाच्या मागचा डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत एका झाडावर शेणाने बनवलेले मधमाश्यांचे तीन फूट उंचीचे उलटय़ा नरसाळ्याच्या आकाराचे पोळे बघायला मिळाले. स्थानिक लोक या पोळयाला ‘कुंभडक’म्हणतात. शेणाने बनवलेल्या या पोळ्याच्या बाहेरच्या बाजूला हाताने जमीन सारवल्यावर जशी नक्षी येते तशीच नक्षी मधमाश्यांनी पायांनी तयार केलेली दिसली. पंधरा मिनिटे सडय़ावर चालल्यावर अचानक कातळात कोरलेली चित्रे दिसायला लागली. त्यांचे आकार व गूढरम्यता पाहून आम्ही थक्क झालो.माणूस, झाडे, पशू, पक्षी, मासे इत्यादी आकार आम्ही ओळखू शकलो. यातील एका मानवाकृतीची लांबी साडेतीन मीटर भरली. तर एका वर्तुळाकृती चित्राचा परीघ तीन मीटर होता. काही चित्रांचे आकार मात्र गूढरम्य होते. त्यांचे आकार पाहून मला शामलन नाइटच्या ‘साइन्स’ या हॉलीवूडपटाची आठवण झाली. त्यात परग्रहवासी शेतांमध्ये मोठमोठी वर्तुळे, चिन्हे काढून ठेवतात. सडय़ावरच्या या चित्रात दैनंदिन जीवनात आजूबाजूला दिसणारी माणसे, प्राणी, निसर्ग चितारण्याचा प्रयत्न दिसत होता.अशा चित्र प्रकाराला शास्त्रीय भाषेत ‘रॉकआर्ट’ म्हणतात. कुडोपीच्या या कातळचित्रांचा सतीश लळित यांनी अभ्यास करून त्यावर पेपरही प्रसिद्ध केलेला आहे. एकूण ६४ चित्रे त्या माळावर विखुरलेली आहेत. ती शोधून त्यांचा अर्थ लावता लावता तीन तास कधी निघून गेले कळलेच नाही. परतताना मनात सारखा विचार येत होता ,कोकणातला धुवाधार पाऊस, सडय़ावरचा ठिसूळ दगड, वारा, गवत यांच्याशी झुंज देत ही शिल्पचित्रे हजारो र्वष तशीच पडली आहेत. आज त्यातील बरीच चित्रे नष्ट झाली आहेत, पुसट झाली आहेत.
’ जाण्यासाठी : मालवण-देवगड रस्त्यावर मालवणपासून २२किमीवर आचरा गाव आहे. आचऱ्याहून एक रस्ता कणकवलीला जातो. या रस्त्यावर आचऱ्यापासून २.५किमीवर डावीकडे कुडोपी गावाकडे जाणारा फाटा फुटतो. या फाटय़ाने ६ किमी गेल्यावर गणपती मंदिर आहे. येथून उजव्या बाजूला एक रस्ता कुडोपी-टेंबवाडीत जातो. वाडीत पोहोचल्यावर गावातून वाटाडय़ा घेऊन कातळशिल्पे पाहायला जावे.
अमित सामंत amitssam9@gmail.com