भारतातील इशान्येकडील राज्यांतील भटकंतीसाठीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे आसाम. त्याच्या आकारामुळे पंख पसरवून ब्रह्मपुत्रा नदीवरून उडणाऱ्या पक्ष्याची आसामला उपमा दिली जाते.

प्रसिद्ध काझीरंगा अभयारण्याची गणना जागतिक वारसा यादीत होते. अगदी सहज समोरून गेंडय़ांचा कळप हमखास जाताना जीप सफारीमधून दिसतो. एलिफंट सफारीवरून उंच गवताळ प्रदेशातून थेट आतपर्यंत जाता येते. बरोबरच गाइड चांगला माहीतगार असेल तर भरपूर वाघ, सांबर, जंगली हत्ती, हॉर्नबिल पक्षी आदी पशू-पक्षी बघायला मिळतात. येथील उष्ण -दमट हवेमुळे हिमालयातील बर्फ वितळून नेहमीच इथल्या नद्यांना पूर येत असतो. अतिशय सुपीक गाळ, आजूबाजूला पसरवत ब्रह्मपुत्रा नदी दुथडी भरून वाहताना आपणास नेहमीच दिसते.

आसाममध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी छान थंडी असते. थंडगार हवा खात, मस्त धुक्यात हरवलेल्या वाटा  शोधत चहाच्या मळ्यातून फिरायला मजा येते. आसामची हिरवीगर्द झाडी, भाताची शेते, चहाचे मळे, तऱ्हेतऱ्हेचे पक्षी, समुद्राप्रमाणे अजस्र ब्रह्मपुत्रेचे पात्र, नागमोडी वळणे, मुसळधार पाऊस; सारे काही औरच. निसर्गाने हिरव्या रंगाची मुक्त उधळण केली आहे. ब्रह्मपुत्रा नदीवरची क्रुझदेखील आपल्याला असाच वेगळा अनुभव देऊन जाते.  गुवाहाटीमधील कामख्या डोंगरावरील कामख्या देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. गुवाहाटीमध्ये अनेक हिंदू मंदिरे आहेत. काझीरांगाप्रमाणेच दिपोर ठिकाण पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात काझीरंगा बंद असते. इथे अनेक अभयारण्य आणि पक्षी निरीक्षणाच्या जागा आहेत. ब्रह्मपुत्रा नदीवरील माजुरी बेटावर लोकसंस्कृती बघण्यासाठी लोक आवर्जून भेट देतात. परंपरागत मुखवटे बनवण्याचा व्यवसाय करणारे लोक इथे आहेत. स्थानिक लोक बांबू, नदीतला गाळ, माती, जुनी वस्त्रे इ. गोष्टी वापरून अगदी कलात्मक आणि सुंदर मुखवटे बनवतात. निसर्गरम्य आसामने संस्कृती आणि कलेतदेखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जवळचे विमानतळ गुवाहाटी हे आहे. कोलकाता, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोचीन, गुवाहाटीहून रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

sonalischitale@gmail.com