एखाद्या चार जणांच्या कुटुंबात प्रत्येकाच्या, आपल्या अशा काही आवडीनिवडी असतात. एखाद्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी गेलं, तर कुटुंबातल्या एखाद्याला अपरिमित आनंद होतो, तर आपल्याला पाहिजे तसं इथं काही नाही असं वाटून दुसरा कुणी मारूनमुटकून वेळ काढतो.. पुडुचेरीच्या बाबतीत तसं नाही. इथे समुद्र आहे, शांतता आहे, निसर्ग आहे, अध्यात्म आहे आणि शहरानं जपलेली आवर्जून अनुभवावी अशी संस्कृतीही आहे..

कोणत्याही एखाद्या संध्याकाळी, मुंबईसारख्या महानगरीत, जेव्हा वाहनांच्या इंजिनांची घरघर, हॉर्नचे कर्कश आवाज, मुंगीच्या वेगात पुढे सरकणारी वाहतूक, धुराचे कोंदट लोट, घामाघूम शरीरे आणि वातानुकूलित गाडीतून प्रवास करतानाही मनावर साचणारी कंटाळल्या क्षणांची पुटे अशा अनुभवांची नकोशी गर्दी झालेली असते, कधी तरी या सक्तीच्या शिक्षेतून बाहेर पडावे, अस्सल निसर्ग अनुभवावा, शहरात असूनही शांततेच्या सुखाची शाल पांघरून अशीच संध्याकाळ रम्य वातावरणात घालवावी आणि पुन्हा मुंबईतील कंटाळवाण्या दिवसांना सामोरे जाण्याची शक्ती संपादन करून रगाडय़ात दाखल व्हावे असे रोजच्या रोज मनातल्या मनात तरी प्रत्येकालाच वाटत असेल. पण ही संधी नेहमीच मिळत नाही. कधी तरी, वर्षांतून एखाद्या आठवडय़ात, दोन सुट्टय़ांमधले काही दिवस आपल्यावर मेहेरबान होतात आणि स्वत:ला तुमच्या स्वाधीन करून टाकतात. आम्ही आता तुझे आहोत, तुला हवे तसे जग.. असे सांगू लागतात आणि आपल्याला सुट्टी घालविण्यासाठीचे योग्य पर्याय खुणावू लागतात.. मग घरबसल्या इंटरनेट उघडावे. आठवडाभराची सुट्टी आनंदात, मुंबईच्या दगदगीची मनावर साचलेली कंटाळवाणी पुटे स्वच्छ पुसून मन ताजेतवाने करता येईल अशा वातावरणात घालविण्याची हमी देणाऱ्या स्थळांचा शोध सुरू करावा..

Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
Development of six villages
बीकेसीच्या धर्तीवर मढ, मार्वेसह सहा गावांचा विकास लांबणीवर?

सर्वसाधारणपणे, सुट्टी घालविण्याच्या पर्यायांची निवड ही हवामानावर अवलंबून असते. म्हणजे, ऐन उन्हाळ्यात दक्षिण भारताऐवजी, उत्तर भारतातील बर्फाच्या कुशीतील एखाद्या रम्य ठिकाणाची निवड करावी, पावसाळ्याच्या अखेरीस, जेव्हा हिरवाईला बहर आलेला असतो, तेव्हा दक्षिण भारतातील दऱ्याखोऱ्यांनी नटलेल्या निसर्गरम्य शहरांची सफर करावी किंवा परीक्षा संपल्यानंतरच्या काळात, अस्सल हापूसच्या जोडीला फणस, काजू आणि करवंदांसारख्या रानमेव्यावर ताव मारण्यासाठी कोकणातल्या समुद्रकिनारीच्या एखाद्या लहानशा गावात पथारी पसरावी, असा नेहमीचा बेत आखला जातो. पण, ज्याचे दर्शन घडल्याखेरीज मुंबईकराचा दिवस पार पडतच नाही अशा समुद्राच्या साथीने आणि सफरीच्या आनंदाच्या साऱ्या कल्पनांना समाधानाची झालर चढविणाऱ्या एखाद्या अनोख्या शहराची सफर करायची असेल तर पुडुचेरीसारखे ठिकाण नाही..मुख्य म्हणजे, जेव्हा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटांची गाज ऐकू येणं इतर आवाजांमुळे दुरापास्त असतं, त्याच संध्याकाळच्या वेळी, पुडुचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावर निवांतपणे वाळूत स्वत:ला झोकून देऊन निळाशार समुद्र न्याहाळताना आणि वाऱ्याची मस्त झुळूक अनुभवताना कानात लाटांची गाजदेखील चक्क घुमू लागलेली असते. कारण, संध्याकाळी सहा वाजल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरचा देखणा, नेटका आणि भूरळ घालणारा रस्ता वाहनांसाठी बंद झालेला असतो. इथे फक्त माणसांची वर्दळ सुरू असते. वाळूत बसावे, समुद्राच्या लाटांचा खेळ न्याहाळतानाच, जगभरातील पर्यटकांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंदही अनुभवावा आणि तृप्त होऊन मुक्कामाच्या हॉटेलात परतावे, यापरता आनंद नाही. पुडुचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळच्या या शांत वेळी अवघ्या जगाचे संस्कृतीरंग अवतरलेले दिसतात, ते उगीच नाही.. असाच आनंद अनुभवत असताना अचानक समुद्राला शिवणाऱ्या आभाळात एखादा काळा ढग अवतरावा, हळुहळू त्याने वरवर यावे आणि अवघे आकाश व्यापावे, मग वाऱ्यानेही आनंदी होऊन ढगांशी धुसमुसळेपणा सुरू करावा आणि आपण तो खेळ पाहात स्वत:ला पुरते विसरून जावे.. हा विसर पडण्याचा अनुभवही अनोखा असाच! तो फक्त या किनाऱ्यावरच मिळत असावा. अचानक पावसाची सणसणीत सर अनपेक्षितपणे सुरू व्हावी आणि किनाऱ्यावरच्या रस्त्यांचे चक्क स्वच्छ आरसे व्हावेत, त्या आरशातील आपल्या प्रतििबबांनी आपल्यासोबत पावले टाकावीत.. हे सारे अचंबित करणारे क्षणही इथे अनुभवायला मिळतात.

पुडुचेरीचा समुद्र हे काही या शहराचे एकमेव कौतुक नाही. या शहराला एक महान आध्यात्मिक वारसा आहे. योगी अरिवदांचा आश्रम हे पुडुचेरीचे आणखी एक आकर्षण. आध्यात्माची गोडी असो वा नसो.. इथे येऊन आश्रमाच्या आवारात पाऊल टाकले, की मन आपोआपच आस्तिक होऊन जाते. प्रत्येक पावलासोबत मनावर एका अनामिक श्रद्धेचा अमल सुरू होतो आणि फुलांनी बहरलेल्या बगीच्यातील रंगीबेरंगी फुलांच्या टवटवीत सुगंधाने भारलेल्या एका चौथऱ्यावर माथा टेकताना, आपण आपल्या अस्तित्वाला विसरून जातो.. क्षणकाळासाठी होईना, अशी अनुभूती मिळणारी ठिकाणे पर्यटनस्थळी फारशी सापडत नाहीत. ते ठिकाण पुडुचेरीला आहे.. १९२६ मध्ये या आश्रमाची स्थापना झाली. इथेच अरिवदाची ही समाधी आहे. इथले ग्रंथालय आणि हस्तकला केंद्र आवर्जून न्याहाळावे, जमले तर इथल्या प्रसादालयातील सात्त्विक व उत्कृष्ट भोजनाचाही आस्वाद घ्यावा. अगोदर आरक्षण केले, तर अरिवद आश्रमाच्या सान्निध्यातील मुक्कामाचा आध्यात्मिक आनंदही अनुभवणे शक्य असते. अरिवद आश्रमाबरोबरच, ऑरोव्हिला हे पुडुचेरीतील एक आकर्षण आहेच. याची विश्वग्राम ही ओळख खऱ्या अर्थाने सार्थ आहे. कारण जगभरातील संस्कृती, समजुती, समाजजीवन यांचा संगम येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे पाहावयास मिळतो.

बोटॅनिकल गार्डन ही इथली आणखी एक ओळख.. पुडुचेरीच्या प्रत्येक पर्यटनस्थळाला एक स्वतंत्र इतिहास आहे. इथल्या रस्त्याकडेचं, फुलांनी बहरलेलं प्रत्येक झाड पर्यटकांच्या स्वागतासाठीच सज्ज असल्याने, कधीच कोमेजल्यासारखं होतच नसावं. सदैव टवटवीत झाडांच्या फांदीवरची फुले रस्त्यावर जणू पर्यटकांच्या स्वागतासाठी गालीचा पसरत असतात.. गजबजाट, गोंगाट, घाईगडबड, गर्दी यांपासून दूर जाऊन चार क्षण निवांतपणे घालविण्याची इच्छा असणाऱ्यांना आणखी काय हवे?..

पुडुचेरीत आणखीही पाहण्यासारखे खूप काही आहे. इथल्या म्युझियममधील वस्तू पाहताना भान हरपते. शहरापासून सहा-सात किलोमीटर अंतरावरील चुन्नमबार बोट हाऊसचा फेरफटका हा आनंदाचा परमोच्च िबदू असतो. रुपेरी वाळूत बसून निळाशार समुद्र न्याहाळावा किंवा बोटीतून फेरफटका मारत समुद्राच्या पाण्याची खोली अनुभवावी.. आणखी काही वेळ घालवावासा वाटला, तर किनाऱ्यावरचे तंबू पर्यटकांच्या स्वागतासाठी आसुसलेले असतातच.. फेरफटका मारण्यासाठी सायकली आणि मोटारसायलीही इथे उपलब्ध असतात.

फ्रान्सच्या संस्कृतीचा अंश पुडुचेरीत पाहायला मिळतो. कारण पुडुचेरी ही फ्रेंचांनी वसविलेली वसाहत आहे. इथल्या प्रत्येक कोपऱ्याला एक शिस्तबद्ध आकार आहे. याआधी ते पॉँडिचेरी या नावाने ओळखले जात होते. २००६ मध्ये त्याचे पुडुचेरी असे नामांतर करण्यात आले. या शहराचे वेगळेपणच सांगायचे झाले, तर हे इतर शहरांसारखे शहर नाही, एवढेच शब्द पुरेसे आहेत. फ्रेंच फूडपासून तामिळनाडूच्या खास दाक्षिणात्य पदार्थाची अस्सल चव चाखायची असेल, तर इथल्या काही नावाजलेल्या रेस्टॉरंट्सना आवर्जून भेट द्यावी. केंद्रशासित प्रदेश असल्याने, जागोजागी पर्यटकांना खुणावणारी वाईन मार्टस दिसतातच. त्याची आवड असेल, तर दिवसभरातील फेरफटक्यानंतर संध्याकाळी निवांतपणे मुक्कामावर यावे आणि घुटक्यागणिक मनात दिवसभरातील आनंदाच्या क्षणांच्या आठवणीची साठवण करावी.. इथे मुक्कामासाठी पंचतारांकित हॉटेल्स आहेतच, पण परवडणारी व चांगल्या सुविधा देणारी, उत्तम पाहुणचार करणारी हॉटेल्सदेखील असल्याने आधीच नियोजन करणे उत्तम.

या प्रवासाचा सांस्कृतिक अनुभव घ्यायचा असेल, तर मुंबईहून विमानाने चेन्नईला पोहोचल्यावर सरळ राज्य परिवहनचा बस स्टँड गाठावा आणि पुडुचेरीस जाणारी साधी बस पकडावी. पुढत्या तीन-चार तासांच्या प्रवासात, आपल्याला दक्षिणेकडील समाजजीवनाची, माणसांची आणि त्यांच्या परस्परांशी वागण्याच्या संस्कृतीची तोंडओळख नक्कीच झालेली असते..

दोन-तीन दिवसांच्या मुक्कामातही पुडुचेरीचा फेरफटका पूर्ण करता येतो. तुमच्याकडे आठवडाभर असेल तर तिथून पुढे कोडाईकॅनाल, उटी यासारखी आकर्षणे आहेतच.. दक्षिणेकडील पर्यटनाची स्वर्गस्थळे म्हणून या ठिकाणांची ओळख असल्याने, पुडुचेरीपर्यंत गेलात, तर पुढे हेही चुकवू नका. आजकाल विमान कंपन्या भाडय़ात भरघोस सवलत देतात. प्रवासाचे नियोजन काही महिने अगोदर केले तर विमान प्रवास तुमच्या सुट्टीतील  सफरीतला आणखी एक मस्त आणि वेळेचा सदुपयोग करणारा पर्याय ठरेल.

दिनेश गुणे dinesh.gune@expressindia.com