आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी १९८० सालापासून संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेतर्फे २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. मंगळवारी तो पार पडला. जागतिकीकरणामुळे पर्यटनाच्या व्याख्या बदलत असून पर्यटनाचा वापर देशादेशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर असे प्रयत्न केले जात असताना वैयक्तिक पातळीवरही अनेक जण आपापल्या परीने पर्यटनाची वेगळी व्याख्या तयार करण्याचं धाडस करत आहेत. त्यापकी एक महत्त्वाची कम्युनिटी म्हणजे सायकलस्वारांची. अलीकडच्या काळात पर्यटनामध्ये सायकल टुरिंगला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. म्हणूनच गेले काही आठवडे आपण सायकल टुरिंगबद्दल माहिती करून घेत आहोत. आजच्या लेखात आपण लांब पल्ल्याचं सायकलिंग करण्यासाठी नेमकी काय तयारी करावी आणि कोणत्या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवाव्यात याचा आढावा घेणार आहोत.

महागडी सायकल : गेली अनेक दशकं लोक सायकल टुरिंग करत आहेत आणि प्रत्येक जण खास टुरिंगच्याच सायकलचा वापर करत आहे, असं नाही. मजबूत सांगाडा आणि चांगले टायर हाच पूर्वीपासूनचा निकष राहिला आहे आणि यापुढेही तोच राहील. त्यामुळे टुरिंगला जाताना महागडी सायकलच हवी हा समज सर्वप्रथम डोक्यातून काढणं गरजेचं आहे. चालवायला आरामदायक आणि आपल्यासोबत सामानाचं वजन पेलू शकेल अशी सायकल योग्य.

भरपूर पैसे : लांब पल्ल्याच्या सायकिलगला जायचं असेल तर खूप पैसे जवळ असणं आवश्यक आहे, हादेखल एक गरसमज आहे. तुम्ही तुमच्या प्रवासाची व्यवस्थितपणे आखणी केलीत तर अगदी कमी खर्चात तुम्ही सायकल टुरिंग करू शकता. त्यासाठी जुन्या ओळखी कामाला येऊ शकतात. टुरिंगला निघण्यापूर्वी त्यांना तुमच्या प्रवासाची कल्पना देऊन ठेवलीत तर तुमचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च सुटू शकतो. तसंच तुम्हाला येत असलेल्या कलेचादेखील वापर करून तुम्ही प्रवासात पसे कमवू शकता. दिवसाला ठरावीक बजेट ठरवणं हे अशा प्रवासामध्ये खूपच फायद्याचं ठरतं. त्याचप्रमाणे शोधक वृत्ती असल्यास कमी खर्चाचे अनेक पर्याय सापडू शकतात.

कपडे : कपडे ही वजन वाढवणारी आणि जागा व्यापणारी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रदेशात आणि हवामानात सायकिलग करणार आहात याचा पूर्ण विचार करूनच तुमच्यासोबत कपडे घ्या. प्रत्येक प्रदेशात स्वस्त कपडय़ाचं मार्केट असतंच, त्यामुळे तिथल्या गरजेनुसार आणि पेहरावानुसारही कपडय़ाची खरेदी करता येते.

रिपेरिंगचं ज्ञान : टुरिंगला जाण्यापूर्वी तुमच्या सायकलच्या प्रत्येक भागाची माहिती असणं आणि त्याच्या रिपेरिंगची माहिती करून घेणं अतिशय आवश्यक आहे. सायकलचे काही महत्त्वाचे भाग अतिदुर्गम भागात मिळणं कठीण असेल तर तेसुद्धा सोबत घ्यायला हवेत.

स्वयंपाकघर सोबतीला : कुठल्याही प्रवासात सर्वात जास्त खर्च हा खाण्यावर होत असतो. जिभेवर आणि खर्चावर नियंत्रण ठेवायचं असेल तर स्वत:चं स्वयंपाकघर सोबत बाळगणं हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जेवण बनवण्यासाठीच्या काही मूलभूत गोष्टी सोबत घेतल्यास गरज पडेल तेव्हा आणि आवश्यक असेल तेवढय़ा गोष्टी तयार करून खाता येऊ शकतात.

इलेक्ट्रॉनिक उपकरणं – मोबाइल फोन, कॅमेरा, जीपीएस, लॅपटॉप, टॅब किंवा लाइट्स या सर्व गोष्टी बॅटरीवर चालतात. परंतु सगळीकडेच चाìजगची सोय उपलब्ध होईल असं नाही. त्यामुळे सोलार चार्जर हा उत्तम पर्याय आहे. दिवसभर सायकिलग करत असताना तो सायकलवर चार्ज करून रात्री त्या साठवलेल्या विजेचा सदुपयोग करता होईल यात शंका नाही.

आरोग्याची काळजी : एखादा चांगला प्रवास तुम्हाला तब्येत बिघडली म्हणून अर्धवट सोडावा लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढंच सायकिलग करा. वाईट हवामानात सायकिलग, अर्धवट झोप, चुकीच्या वेळी खाणं, आजाराकडे दुर्लक्ष करणं या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात.

प्रशांत ननावरे – prashant.nanaware@expressindia.com

Twitter – @nprashant