पहाटे पाच-साडेपाचला कोंबडय़ाच्या आरवण्याने जाग येते. बाहेर उजाडायला लागललं असतं. खराटय़ानं अंगण झाडल्याचा आवाज कानावर पडत असतो. चुलाण्यावर किंवा बंबात पाणी तापवत ठेवलेलं असतं. ‘ऊठ रे राजा, ऊठ गं बायो’ असं आई तिच्या मुलांना उठवत असते. कधी घरात रेडिओवर सकाळचा कार्यक्रम लागलेला असतो. लता मंगेशकरांच्या आवाजातला ‘अजि सोनियाचा दिनु’ किंवा असाच एखादा अभंग कानावर पडतो. थोडा वेळ तसंच अंथरुणावर पडून राहायचं. बाजूलाच एखादी कोंबडी किंवा घरचा कुत्रा-मांजर बसलेले असते. थोडय़ा वेळाने उठून तोंड धुवायचं. आवरायचं. चुलीवरचा गोड कोरा चहा प्यायचा. ‘दूद न्हाई बाबा आमच्याकडं,’’ चहाचा छोटा प्याला हातात देताना म्हाताऱ्या मावशी सांगायच्या. तिथल्या वातावरणात तो कोरा चहासुद्धा शहरातल्या दूध घातलेल्या चहापेक्षा चविष्ट लागतो. तरतरी आणतो. कधी मिळालीच तर तिथेच चहाबरोबर चपाती, भाकरी खाऊन चालायला सुरुवात करायची.

दर दिवशी नवी वाट. मोहिमेच्या सुरुवातीची बरीचशी चाल डांबरी सडकेने तर कधी कच्च्या सडकेने. थेट डोंगरवाट नव्हतीच. कडय़ावरून जायची किंवा घाटाने पण सडकच. अगदीच कंटाळवाणा प्रकार. पण इगतपुरीनंतर फक्त अधूनमधून डांबरी रस्त्याला जावं लागलं. बाकी वाटचाल डोंगरांतल्या पायवाटांची. कधी थोडासाच चढ-उतार, तर कधी मोठा डोंगर ओलांडायचा. पण गंमत अशी की, डांबरी रस्त्यावर बराच काळ चालल्यावर थोडेसे पाय दुखायला लागतात तसे डोंगराची चढ-उतार असेल तरी दुखत नाहीत.

साधारणपणे सकाळी सातच्या आसपास चालायला सुरुवात केलेली असते. थांबत, विसावत दुपारी बारा-साडेबारापर्यंत चालायचं. त्यानंतर दुपारी दोन-अडीचपर्यंत उन्हाचा तडाखा जास्त जाणवतो. जेवायची वेळही झालेली असते. मग जवळच्या गावात किंवा पाडय़ात थांबायचं. घोटभर पाणी प्यायचं. ‘भाकरीची सोय होईल का मावशी?’’ असं विचारल्यावर बहुतेक ठिकाणी सोय व्हायचीच. कधी आपण विचारलेलं नसतानाही, ‘‘एखादी भाकरी दे बाई त्याला. उन्हातान्हाचं फिरतंय बिचारं’’ असं घरातली म्हातारी आपल्या मुलीला किंवा सुनेला सांगायची. भाकरीबरोबर कधी भाजी, कधी चटणी. जेवून तृप्त व्हावं. अंगणात चूळ भरून, तांब्याभर पाणी घटाघट प्यावं. अंगणातल्या झाडाच्या सावलीत निवांत पडावं. ऊन थोडं उतरेपर्यंत. ताजंतवानं झाल्यावर अडीच-तीनच्या सुमारास पुन्हा चालायला लागावं.

वाटाही कशा वेगवेगळ्या प्रकारच्या. कधी सपाटीच चाल, तर कधी चढ-उतार. कधी खुरटय़ा झुडपांचा ओसाड प्रदेश तर कधी उन्हाचा कवडसाही जमिनीवर पडणार नाही असं सावलीच जंगल. कधी वाट अगदी उत्तर-दक्षिण जावी, ज्यामुळे मोहिमेचं अंतर झटक्यात कापलं जावं. तर कधी वळणावळणांच्या वाटा. त्यामुळे दिवसभर चालूनही आपण अगदी थोडेसेच दक्षिणेकडे सरकलेले असतो.

घाटमाथ्यावर अगदी ओसाड माळावरून चालताना वारा वाहत असला तर अगदी दुपारच्या उन्हात चालतानाही काही वाटत नाही. पण वारा नसेल तर दमछाक होते. त्यात चढ असेल तर अजूनच. घामाच्या धारा वाहायला लागतात. मग अशा वेळी एखादं आंब्याचं डेरेदार झाड बघून सावलीत थांबायचं. आंबा, फणस, उंबर अशा झाडांची सावली दाट. त्यामुळे एखादंच झाड असलं तरी थंड वाटतं. त्यावर कितीतरी पक्षी शीळ घालत बसलेले असतात. पण वन खात्याने लावलेली निलगिरीची कितीही झाडं असली तरी त्यांची ना सावली, ना त्यावर नावालाही एखादा पक्षी. ते नुसतंच कागदावरचं वनीकरण.

आंब्याच्या सावलीत सॅक काढून बसायचं. टोपी उतरवायची. बूट-मोजे उतरवायचे. पँट थोडी वर घ्यायची. शर्टच्या बाह्य़ा वर करायच्या. शरीर थंड होऊ द्यायचं. पाण्यात थोडं मीठ-साखर आणि आवळ्याचा रस घालून घ्यायचं मग पंधरावीस मिनिटांनी शरीर थंडावतं. थकवा निघून जातो. पुन्हा चालायला सुरुवात करायची.

दोन गावांमधलं अंतर कमी असेल आणि वाट सोपी असेल तर कुणाला तरी विचारून चालायला सुरुवात करायची. ‘‘देवानं त्वांड दिलंय, त्ये वापरायचं. कुनालाबी इचारलं तर सांगतायत नीट. लबाड कोन बोलायचं नाय’’ म्हणजे विचारात जा. लोक व्यवस्थित वाट दाखवतील असा थोडा वेळ बरोबरीने चालणाऱ्या सावळे मामांचा सल्ला. ते मुलीच्या घरून आपल्या गावी परत चालले होते पायीपायी.

अर्थात जिथे वाटेवर फारशी वस्ती नसेल किंवा वाट मळलेली नसेल तेव्हा नुसतं विचारून एकटय़ानं जाणं शहाणपणाचं नाही. मग अशा वेळी वाटाडय़ा घ्यायचा. विशेषकरून जंगल किंवा पठारं ओलांडायची असतील तेव्हा. सह्य़ाद्रीतील काही पठारं तर विस्तीर्ण. त्यातच लोणावळ्याजवळचं कुसूर किंवा महाबळेश्वरजवळच्या कोळेश्वरसारख्या मोठाल्या पठारांवर तर धनगरांची एकदोन घरं सोडली तर वस्तीच नाही. नवखा माणूस हमखास भरकटणारच. वाटाडय़ाशिवाय हे पार करणं अशक्यच.

अशी अधूनमधून वाटाडय़ाची संगत. तर कधी डोंगरभटके मित्र चार-पाच दिवस बरोबर चालायला येतात. तेव्हा फार छान वाटतं. पाच दिवसांपूर्वी भोरजवळच्या घाटमाथ्यावरील सांगवीत हृषीकेश यादव आणि स्वप्नाली धाबुगडे येऊन मिळाले. हृषीकेशचा अनुभव दांडगा. उभा- आडवा सह्य़ाद्री फिरलेला आणि देशातील पहिल्या यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्त्व केलेला हा माणूस. हा मोहिमेत आपल्याबरोबर चालतोय हाच मोठा आनंदाचा आणि सन्मानाचा प्रसंग होता. त्या दोघांच्या साथीने रायरेश्वर आणि कोळेश्वराची पठारं ओलांडून महाबळेश्वरी पोहोचलोय. असे सांगाती असताना सह्य़ाद्रीतल्या भटकंतीची मजा काही औरच असते.

walkingedge@gmail.com