हिंदी चित्रपटांमुळे स्वित्र्झलडची सफर हल्ली सवयीची झाली आहे. युरोप टूरमध्ये पर्यटकदेखील आवर्जून चित्रीकरणाच्या स्थळांना भेटी देतात. दिलवालेमुळे स्वित्र्झलडमधले इंटरलाकन हे हमखास पाहण्याच्या यादीत असते. तेथूनच केवळ ५० मिनिटांच्या अंतरावरील ‘शिनीग प्लाट’ मात्र आपण पाहतच नाही.

दरवर्षी एप्रिल-मेमध्ये अख्ख्या युरोपातील तमाम निसर्गप्रेमी या शायनेग्गला भेट देतात. आपल्या व्हॅली ऑफ फ्लॉवरचे हे युरोपियन भावंड. एप्रिल महिन्यात येथे अल्पाइन फ्लॉवर्सना बहर येतो. आल्प्स पर्वतराजीतील सारी फुले येथे एक-दीड महिन्यात फुललेली असतात. अर्थातच ही सर्व जंगली फुले असतात. तब्बल ६५० प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती येथे आहेत. विल्डर्सविल स्टेशनवरून एक विशेष अशी लाकडी रेल्वे सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० या वेळेत या पठारावर घेऊन जाते. तीव्र चढ-उतारांमुळे या प्रवासाला ५० मिनिटे लागतात. मात्र, या प्रवासात लेक थुन आणि लेक ब्रियाझचे मनोहारी दर्शन होत राहते. ही रेल्वे १८९३ ला सुरू झाली होती. ‘शिनीग प्लाट’ हा जर्मन शब्द आहे. त्याचा अर्थ चमकते पठार असा होतो. या पठारावर पोहोचल्यावर आल्प्सची हिमाच्छादित पर्वतराजी सुर्यप्रकाशात चमकत असते. म्हणूनच कदाचित याला चमकते पठार म्हणत असावेत. पठारावर चालण्यासाठी व्यवस्थित मार्ग आखून दिले आहेत. प्रत्येक फुलांचे नाव व माहिती देणारे स्टिलचे फलक आहेत. पठारावर मुक्कामासाठी नुकतेच एक हॉटेल झाले आहे. यंदा मात्र बर्फाचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे पठार काहीसे उशिरा म्हणजेच मेच्या अखेरीस सर्वासाठी खुले होणार आहे. लाकडी रेल्वेचा प्रवास, पठारावरील जंगली फुले, सायंकाळचा संधिप्रकाश, रात्रीचे मंद चांदणे आणि पहाटेचे झुंजुमुंजु वातावरण हे सारे एकदा तरी अनुभवावे असेच आहे.

badess@gmail.com