काही क्षण निसर्ग तुमच्यासाठीच राखून ठेवतो असं म्हणतात. याचा अनुभव मला २०१२ मध्ये ताडोबात आला.

तेलिया बछडय़ांना पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक ताडोबाला येतं. ही बछडीही डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखी. रोज सगळ्यांना दर्शन देणे, रस्त्यावर येणे, रस्ता रोखून धरणे, झाडावर चढण्याचा प्रयत्न, अशी त्यांची धमाल. या बछडय़ांचा पाठलाग सतत १४ महिने केला. ताडोबात जा आणि फोटो काढ, असा माझा फावल्या वेळातला दिनक्रम होता. काही दिवसांनंतर माझ्याकडे एकसारखेच फोटो जमा होऊ लागले. नंतर तर मी कॅमेरा खाली ठेवून फक्त या बछडय़ांचे निरीक्षण करायचो. मी काहीतरी वेगळेपण शोधत होतो. असाच एकदा ताडोबाला असताना दुपारी वामकुक्षी घेत होतो. दुपारी साडेतीनला हॉटेलखाली आलो नाही म्हणून माझा मित्र बंडू मानकर रूमवर आला. चला, उशीर झाला, असं तो म्हणाला. तोंडावर पाणी मारून मी गाडीत बसलो आणि पाणवठय़ाजवळ पोहोचायला चार वाजले. ही बछडी तिथे अजून आली नव्हती. सावलीत गाडी उभी कर, असं म्हणताणाच एक बछडी पाणवठय़ावर आली. पाचच मिनिटांत चारही बछडी पाणवठय़ावर आली आणि त्यांची पाण्यात मौजमस्ती सुरू झाली. सुमारे तासभर हा खेळ सुरू होता. हा खेळ संपला तेव्हा फोटो काढून माझी बोटे दुखू लागली. पण अनेक महिन्यांपासून जे शोधत होतो ते गवसल्याचा आनंद अवर्णणीय होता.

harshadbarvebooks@gmail.com