पर्यटनासाठी परदेशात, परराज्यात गेल्यानंतर सारा भर असतो तो कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थलदर्शन कसे होईल यावर. ते साहजिकच आहे. पण त्याचबरोबर त्या देशातील, प्रांतातील संग्रहालय, वाचनालयंदेखील तितकीच महत्त्वाची असतात. त्यांना भेट दिल्यावर तुमच्या ज्ञानात तर भर पडतेच, पण त्या देशाच्या सांस्कृतिक वारशाची ओळख होते. ही ओळख पुढच्या भटकंतीला समृद्ध करते.

इंडोनेशिया भटकायला जाणाऱ्यांच्या यादीत बालीला भेट देणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट असते. किंबहुना बाली म्हणजेच इंडोनेशिया असा अनेकांचा समज आहे. जकार्ता हे राजधानीचे शहर म्हणून आणि एक भटकंती दरम्यानचा थांबा म्हणून वापरले जाते. तसे पाहिले तर जकार्ता हे आपल्या मुंबईसारखेच एक व्यापारी केंद्र असणारे आणि बऱ्याच अंशी आपल्यासारखी मिश्र सामाजिक-आर्थिक रचना असणारे शहर. याच शहरात इंडोनेशियाची संपूर्ण वैविध्यता जोपासणारे एक ठिकाण आहे ते म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय.

trek02मध्य जकार्तामध्ये असणारी ही वास्तू इंडोनेशियातील १७ हजारांहून अधिक बेटांचे सांस्कृतिक प्रतीक आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. मोनास या राष्ट्रीय वास्तूपासून जवळच पांढरीधोप अशी ही वास्तू गज्जा म्युझिअम म्हणूनदेखील ओळखली जाते ती प्रवेशद्वारावर असणाऱ्या हत्तीच्या देखण्या मूर्तीमुळे.

२४ एप्रिल १७७८ मध्ये तत्कालीन डच राज्यकर्त्यांनी रॉयल बटाव्हिएन सोसायटी ऑफ आर्टस अ‍ॅण्ड सायन्स नावाने एक संस्था सुरू केली. या संस्थेचे एक संस्थापक जेसीएम राडेरमॅचर यांनी इमारत आणि स्वत:चा संग्रह (पुस्तके आणि काही वस्तू) यासाठी देणगी म्हणून दिली आणि या संग्रहालयाची सुरुवात झाली. पुढे हस्ते परहस्ते या संग्रहात भरच पडत गेली. १९६२ मध्ये हे संग्रहालय इंडोनेशियन सरकारच्या ताब्यात आले.

हे संग्रहालय आवर्जून का पाहायचे याची काही खास कारणं आहेत. इंडोनेशिया देशाची बेटांवरील रचना आणि विस्तार हा तेथील वैविध्यतेला पूरक ठरला आहे. या यच्चयावत सर्व बेटांवर काय घडले, तेथील वस्ती कशी होती, त्यांचे देव कोणते होते, त्यांची वाद्य काय होती याची अगदी बैजवार मांडणी येथे केली आहे. अगदी इंग्रजीमध्ये असणाऱ्या माहिती फलकांसहित.

सर्वात महत्त्वाचे दालन म्हणजे इंडोनेशियात ठिकठिकाणी सापडलेला पुरातत्त्वीय ठेवा. पुरातत्त्वीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असणाऱ्या सुमारे पाच हजार मूर्ती येथे एकाच ठिकाणी पाहता येतात. इंडोनेशियावर असलेला हिंदू आणि बौद्ध धर्माचा प्रभाव अगदी ठळकपणे येथे मांडला आहे. तुम्ही धार्मिक आहात की नाही हा मुद्दा बाजूला ठेवला तरी केवळ हे शिल्पसौंदर्य पाहून तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील. अतिशय निगुतीने केलेल कोरीव काम दिसून येते. इंडोनेशियात उत्खननात सापडलेला आजवरचा सर्वात जुना शिलालेख येथे पाहता येतो. त्याचबरोबर दक्षिण पूर्व अशियातील प्राचीन घडामोडींवर प्रकाश टाकणाऱ्या अनेक वस्तू येथे आहेत. तर ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा सुमारे ६० हजार वस्तू येथे आहेत. संग्रहालयातील सर्वात मौल्यवान विभाग दुसऱ्या मजल्यावर आहे. येथे मुख्यत: ऐतिहासिक दागिन्यांचा संग्रह आहे. प्रजनापरमिताचा अलंकारांनी नटलेला असा अतिशय मौल्यवान पुतळा या दालनाच्या प्रवेशद्वारी आहे. रामायण कोरलेला सोनेरी बाऊल, चमचे, पर्सेस अशा नवव्या शतकातील प्रांबनन येथे सापडलेल्या अनेक वस्तूंनी सजलेला वोनोबॉय होर्ड आवर्जरून पाहण्यासारखा आहे.

इंडोनेशिया हे अधिकृतपणे मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केलेले आहे. पण त्यांनी जोपासलेला हा सर्वधर्मसमभावपणा नक्कीच भावणारा आहे. इंडोनेशियातील भटकंतीची सुरुवात या संग्रहालयापासून केली तर नक्कीच हा देश समजून घ्यायला फायदा होईल.

सुहास जोशी – suhas.joshi@expressindia.com