वन्यजीव पर्यटन म्हणजे व्याघ्र पर्यटन अशीच आपली समजूत आहे. तसेच स्थलांतरित पक्षी म्हटले की फ्लेमिंगोच डोळ्यासमोर येतात. पण गेल्या काही वर्षांत पक्षी निरीक्षणाकडून पक्षी पर्यटनाकडे आपली वाटचाल झाली असून, त्यात स्थलांतरित पक्ष्यांचा वाटा मोठा आहे. ऑक्टोबरपासून आपल्या देशात तब्बल ३५०च्या आसपास स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांनी पाणथळ जागा आणि जंगले गजबजलेली असतात.

‘वन स्वॅलो डजंट मेक ए विंटर, मेनी स्वॅलोज मेक अ विंटर’. स्वॅलो म्हणजे बार्न स्वॅलो हा पक्षी. मराठीत याचं नाव माळ भिंगरी. उत्तराखंडातून आपल्या राज्यात स्थलांतर करणारा हा पक्षी. उत्तराखंडात अत्यंत शुभ मानला जाणारा पक्षी. विणीच्या हंगामात याचा मुक्काम उत्तराखंडात तर हिवाळ्यात आपल्याकडे असतो. विजेच्या तारांवर बार्न स्वॅलोच्या माळा झुलू लागल्या की हिवाळ्याची चाहूल लागते. खरं तर हा एकच नाही तर जगभरातून भारतीय उपखंडात स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांच्या जवळपास ३५० प्रजाती सृष्टीतल्या या बदलाची चाहूल देत असतात.

mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Halve the price of high priced garlic
लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू
sandeshkhali news
विश्लेषण : संदेशखाली प्रकरण काय आहे? यावरून ममता-भाजप संघर्ष का उडाला?
manoj jarange patil and chhagan bhujbal
‘दादागिरीला थांबवणार की नाही’, मनोज जरांगेंच्या वक्तव्यांवरून छगन भुजबळ आक्रमक; म्हणाले, “छत्रपती…”

रोझी स्टर्लिग अर्थात भोरडी मैना ही अफगाणिस्तानातून येते. अक्षरश: हजारोंच्या थव्याने आकाशात घिरटय़ा घालणाऱ्या पक्ष्यांचे इतके नयनरम्य आकार तयार होतात की पाहणाऱ्यांने दोन क्षण थबकायलाच हवं. वैशिष्टय़ म्हणजे हिच्या येण्याची वेळ टोळधाडीच्या बरोबरच असते. टोळ हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. यांचे स्थलांतर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. सप्टेंबरच्या सुरुवातीस तिचं आगमन होतं आणि पुन्हा मार्चमध्ये ती परतीचा मार्ग पकडते. पटकंदब म्हणजे बार हेडेड गिज. मंगोलियातून स्थलांतर करून येणारा हा पक्षी अतिउंचावरून उड्डाण करतो. सर्वात उंचावर वरून विहरणारा जगातील हा एकमेव पक्षी आहे. अर्थात त्यासाठी त्याच्या फुफ्फुसं तेवढीच ताकदीची असतात. हा येतो तो मोठय़ा थव्याने.

चक्रवाकाचं नाव तर आपण पुराणात वाचलं असेलच. तोदेखील सैबेरियातून येथे येत असतो. रशियातून इंपिरियल इगल हा नावाप्रमाणे प्रचंड असा पक्षीदेखील याच काळात स्थलांतर करतो. तर वेडर्स वर्गातील ब्लॅक टेल्ड गॉडविट हे थेट उत्तर ध्रुवावरून सुमारे १० हजार किलोमीटरचे अंतर १५ दिवसांत कापून आपल्याकडे येत असतात.

अक्षरश: जगाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय उपखंडात येण्यासाठी पक्ष्यांची लगबग सुरू असते. त्या त्या प्रदेशात सुरू झालेल्या तीव्र हिवाळ्यापासून बचाव करायला ते आपल्या देशात येत असतात. तर काही देशांतर्गत उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करतात.

हिवाळ्याची चाहूल लागते ती या पक्ष्यांमुळे. पूर्वी एक काळ होता की आपले स्थलांतरित पक्ष्यांचे जग वृत्तपत्रातील फ्लेमिंगोच्या छायाचित्रांपुरतेच मर्यादित होते. पण गेल्या काही वर्षांत हे चित्र पालटलं आहे. वन्यजीव पर्यटन म्हणजे केवळ वाघ पाहणे हा दृष्टिकोन कमी झाला आहे. डिजिटल कॅमेऱ्यांमध्ये जसा बदल होत गेला तसे अनेकांच्या हाती एसएलआर कॅमेरे आले आणि पक्षी  छायाचित्रणाला मोठी चालना मिळाली. समाज माध्यमांसारखे साधन उपलब्ध झाल्याने पक्षी पर्यटनाला प्रसिद्धी आणि प्रोत्साहन मिळाले. आणि मुख्य प्रवाहातील पर्यटनातदेखील पक्षी पर्यटनाला महत्त्व येऊ लागले. महत्त्वाचे म्हणजे त्यादृष्टीने पर्यटनातील पायाभूत सुविधांचा देखील विकास होत गेला.

आज भारताच्या कानाकोपऱ्यात वर्षभरात केव्हाही पक्षी पाहण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, हिवाळ्यात या पक्ष्यांच्या दुनियेची मजा काही औरच असते. एखादीच विशिष्ट प्रजाती नाही तर अनेक प्रजातींच्या पक्ष्यांना न्याहाळण्याचा आनंद विशिष्ट ठिकाणी या काळात घेता येतो. भारतातील नेहमीची प्रसिद्ध ठिकाणं तर आहेतच, पण आज चक्क लडाखमध्येदेखील पक्षी निरीक्षणाचे कॅम्प होऊ लागले आहेत. नागालॅण्डमध्ये अक्षरश: लाखोंच्या संख्येने स्थलांतर करणारे अमुर फाल्कन पाहण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले आहेत. तरीदेखील हिवाळ्यातील एकाच ठिकाणी भरपूर पक्षी पाहण्यासाठी काही जागा ठरलेल्या असतात. त्यामध्ये पाणथळ जागांचा समावेश प्रामुख्याने होतो. भरतपूर येथील केवलादेव अभयारण्य हे तर पक्ष्यांचे नंदनवन म्हणूनच ओळखले जाते. मानवनिर्मित अभयारण्य असले तरी आज त्याचा समावेश युनेस्कोच्या वारसास्थळांमध्ये केला जातो. भरतपूरला पक्ष्यांच्या अक्षरश: शेकडो प्रजाती अगदी सहज दिसतात. महत्त्वाचे म्हणजे येथील व्यवस्था अगदी पर्यटन पूरक आहे. अगदी येथील सायकल रिक्षावालेदेखील मार्गदर्शकाचे काम करतात.

असेच दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे ओरिसातील चिलिका सरोवर. चिलिकाजवळचे मंगलाजोडी हे ठिकाण आज पक्षी पर्यटनासाठी सर्वार्थाने विकसित झाले आहे. राहण्याची सोय आहे. पक्षी पाहण्यासाठी बोटी आहेत. विशेष म्हणजे कधी काळी या भागात पक्ष्यांच्या शिकारी करणारे लोकच आता त्यांच्या संवर्धनाचे काम करत असून मार्गदर्शक व बोटी चालवत आहेत. असंख्य पक्षी पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. पुणे – सोलापूर मार्गावरील उजनीच्या बॅकवॉटरवर भिगवण येथे येणाऱ्या पक्ष्यांमध्ये बरेच वैविध्य आहे. आठ-दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून सैबेरियाहून आलेले वेडर्स, सॅण्डपायपर्स, सी गल्स येथे हमखास दिसतात. भिगवणबद्दल आवर्जून नमूद करायची बाब म्हणजे जवळच्याच कुंभारगाव येथील संदीप आणि दत्ता नागरेबंधूंनी खास पक्षी पर्यटनासाठी विशेष सुविधा सुरू केल्या आहेत. येथे होमस्टेची सुविधा आहे. जोडीला गावातील मुलांना पक्षी निरीक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण दिलं आहे. सर्वसामान्यांना फ्लेमिंगोचे आकर्षण असले तरी भिगवणला स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांच्या तब्बल २०० हून अधिक प्रजाती पाहायला मिळतात. नाशिक जिल्ह्य़ातील नांदुरमध्यमेश्वर धरणाचा जलाशय हादेखील पक्षी अभयारण्य म्हणून  प्रसिद्ध आहे.

नैनितालपासून वीसेक किलोमीटरवर असणारे पंगोट आणि सातताल ही दोन ठिकाणं पक्ष्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. हिमालय पर्वतरांगेच्या पायथ्याशी आढळणारे पक्षी येथे विशेषकरून आढळतात. इतकेच नाही तर मुंबईसारख्या महानगरातदेखील शिवडी आणि भांडुप पंपिंग स्टेशनच्या परिसरातील पाणथळ जागा या स्थलांतरित पक्ष्यांच्या अगदी लाडक्या आहेत.

अर्थातच या सर्वाचे सौंदर्य, आकार, रंग यांमध्ये प्रचंड विविधता असते. वरच्या बाजूने बाक असलेला अ‍ॅवोसेट, पेलिकन, जोरजोरात चीत्कारणारा क्रौच एक ना दोन हजारो पक्ष्यांनी सृष्टीत एक अनोखा जल्लोष सुरू केलेला असतो.

केवळ पक्षी पर्यटनाच्या सहली नेणारे व्यावसायिक जसे आहेत तसेच अगदी नावाजलेल्या पर्यटन कंपन्यादेखील आपल्या पर्यटनात पक्षी पर्यटनाचा समावेश करत आहेत. अनेक स्थानिकांनी परिश्रमपूर्वक आपल्या भागातील पक्ष्यांची माहिती जमा करून पक्षी पर्यटनाच्या सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. आज  सिक्कीमसारख्या राज्यातदेखील केवळ पक्षी पर्यटनाची सुविधा देणारे व्यावसायिक आहेत. हिवाळ्यातील नेहमीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा अशा नावीन्यपूर्ण ठिकाणांना भेट दिलीत तर नक्कीच आपल्या पर्यटनाचा आनंद तर द्विगुणित तर होईलच, पण सृष्टीतल्या अनमोल सौंदर्याची ओळखदेखील होईल.

पक्षी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे

भरतपूर, लिटल रण ऑफ कच्छ, भिगवण, गोव्यातील अभयारणे, कर्नाटकातील दांडेली अभयारण्य, केरळातील थत्तेगड, ओरिसामधील चिलिका सरोवर, पश्चिम बंगालमधील सुंदरबन, अरुणाचल प्रदेशमधील इगलनेस्ट आणि मिस्मि हिल्स, उत्तराखंड अशा ठिकाणी आक्टोबरच्या मध्यापासून ते फेब्रुवारी मार्च या काळात पक्ष्यांच्या चिवचिवाटाने बहरलेला असतो.

हे लक्षात ठेवा

शक्यतो निसर्गाशी एकरुप होतील असे कपडे वापरावेत.

भडक रंगांमुळे पक्षी विचलित होतात.

अतिगर्दी, गोंधळ, गोंगाट टाळावा.

किमान बेसिक दुर्बिण असावी.

घरटय़ांचे छायाचित्रण टाळावे.

पक्ष्यांचे आवाज मोबाईलद्वारे वाजवणे पूर्णपणे टाळावे.

पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील भागांमध्ये आडवाटांवर जाऊ नये.

पक्ष्यांच्या मागावर राहून पाठलाग करणे टाळावे.

जवळपास सर्व भाषांमध्ये पक्ष्यांवर पुस्तके उपलब्ध आहेत. सलिम अली यांचे ‘बुक ऑफ इंडियन बर्ड’ हे पुस्तक अवश्य वाचावे. पक्षी निरिक्षण आणि पक्षी छायाचित्रणासाठी देशातील अनेक तज्ज्ञांनी एकत्र येऊन ‘कॉन्झर्वेशन इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून मागदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ती वाचावीत आणि पाळावीत.

आदेश शिवकर – adesh.shivkar@gmail.com