उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रत्येकालाच हिमालयात जाणे शक्य नसते. महाराष्ट्रातही उन्हाळ्यात भटकंती करता येईल, अशी खूप ठिकाणे आहेत. वैशाख वणवा पेटलेला असतानाही वसंतातली भटकंती आनंददायी करता येईल. अर्थात त्यासाठी काही पथ्ये पाळणे महत्त्वाचे आहे. परीक्षा संपल्या, उन्हाळी सुट्टय़ा लागल्या की भटक्यांचे पाय हिमालयाकडे वळतात. ऐन मे महिन्यात स्वेटर-कानटोपी घालायचा आनंद हा तिथेच घेता येतो. ट्रेकिंग नाहीतर थंड हवेत भटकायला उन्हाळ्यात हिमालय हे उत्तम ठिकाण असते. पण महाराष्ट्र देशीसुद्धा ऐन उन्हाळ्यात, वसंत ऋतूमध्ये आवर्जून भटकंती करण्यासारखे खूप काही आहे, असे म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील याची खात्री आहे. पण योग्य ठिकाण आणि योग्य अशी तयारी करून गेले तर महाराष्ट्रातसुद्धा उन्हाळ्यातली भटकंती मोठी आनंददायी होते. अर्थात काही पथ्ये आणि ठिकाणांची योग्य निवड करणे हे मात्र गरजेचे आहे.
ऐन वैशाख वणवा पेटलेला असताना आणि बऱ्याच भागात पाण्याचे दुíभक्ष असताना कुठे आणि कसे जाणार? पण यावेळीसुद्धा सखा सह्य़ाद्रीच आपल्या सोबतीला आहे. घाटमाथ्यावरची आंबा, गगनबावडा, आंबोली, कोकणात दापोली, देवरुख ही ठिकाणं आजही उन्हाळ्यात जाण्याजोगी आहेत. विशेषत: संध्याकाळनंतर शीतल वारे वाहू लागले की सगळा परिसर आल्हाददायक होतो. पन्हाळासुद्धा एक चांगला पर्याय होऊ शकतो. विदर्भात जरी उन्हाचा कहर असला तरी गाविलगड, चिखलदरा ही ठिकाणे हा उत्तम पर्याय आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ातला गडिहग्लज, चंदगड हे तालुके आणि इथे असलेली ठिकाणे उन्हाळ्यात पर्यटनासाठी मुद्दाम जावी अशी आहेत. या परिसरात अजूनही खूप झाडी टिकून असल्यामुळे पर्यटकांनासुद्धा पारगड, आंबोली या ठिकाणी मनसोक्त फिरता येते. गडिहग्लज ही मोठी व्यापारी पेठ असल्यामुळे राहण्याच्या उत्तम सोयी इथे आहेत.
उन्हाळी भटकंतीचे खूप फायदेसुद्धा आहेत. मुळात वसंत ऋतू असल्यामुळे आंबा, फणस, काजू, करवंद, जांभूळ ही फळे याच वेळी मिळतात. अनेक वृक्षांची पाने गळत असल्यामुळे त्यावर बसणारे पक्षी पाहणे ही पक्षीनिरीक्षकांसाठी मोठी पर्वणी असते. वृक्ष जरी निष्पर्ण झाले तरीसुद्धा पळस, पांगारा, सावर, बहावा या झाडांना येणारी फुले ही ऐन उन्हाळ्यात अप्रतिम दिसतात. विविध रंगांची उधळण या वेळी रानोमाळ झालेली पाहता येते. भटक्यांसाठी मुद्दाम उन्हाळ्यात रात्री करण्यासारखे ट्रेक्स म्हणजे पर्वणी असते. माहितीच्या मार्गावर रात्रभर ट्रेकिंग करणे, चढत जाणाऱ्या रात्रीबरोबर हळूहळू गार होत जाणारे वातावरण हे खास याच काळात अनुभवले पाहिजे. आकाशदर्शनासाठी उन्हाळ्यातील रात्री हा अगदी योग्य कालावधी असतो. रात्र कुठल्यातरी उंच किल्ल्यावर किंवा गावापासून लांब असलेल्या ठिकाणी ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणात घालवणे हे फक्त उन्हाळ्यातच शक्य होऊ शकते.
अर्थात या सगळ्यासोबत काही पथ्ये मात्र निश्चित पाळायला हवीत. चत्र -वैशाख या महिन्यात अनेक गावात जत्रा-यात्रा मोठय़ा प्रमाणावर होत असतात. त्यामुळे अनेकांचे मुद्दाम गावाकडे जाणे होतेच. जत्रेत मिळणारे खाद्यपदार्थ आता आपल्याला खायची सवय नसते. त्यामुळे लहानपणी आम्ही अमुक तमुक पदार्थ खूप खायचो त्यामुळे त्यावर आता परत ताव मारणे हे अंगाशी येऊ शकते. उन्हाळ्यात दिवस मोठा असल्यामुळे भटकंती करताना शक्यतो सकाळी १० पर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर प्रवास करावा. वातानुकूलित वाहनातून एकदम बाहेर येणे टाळावे. त्यापेक्षा ५ मिनिटे आधी गाडीच्या काचा उघडून बाहेरच्या वातावरणाशी समरस होणे अत्यंत महत्त्वाचे असते. अन्यथा बाहेरच्या उन्हामुळे चक्कर येण्याची शक्यता असते. ऐन उन्हाळ्यातसुद्धा महाराष्ट्रात केलेली भटकंती निश्चितच रमणीय असते. त्यात अनेक फायदे आहेत. मात्र ती करताना पथ्ये मात्र जरूर पाळावीत. एकदा ते गणित जमले की ऐन वसंतात निसर्गाची विविध रूपे आपल्या भटकंतीमध्ये पाहता येतील. आपली भटकंती समृद्ध होईल..!

हे अवश्य करा
कान आणि मान झाकेल अशीच, टोपी डोक्यावर घालावी. डोळ्याला गॉगल आणि अंगात सुती कपडे हे असावेच.
उन्हाळ्यात मुख्यत्वे शरीरातील पाणी कमी होत असल्यामुळे सतत पाणी जवळ ठेवणे हे अनिवार्य असते. दिवसा कमीत कमी २ लिटर पाणी तरी पोटात गेलेच पाहिजे.
पाण्यासोबतच इलेक्ट्रॉलची पावडर पाण्यात विरघळवून ते पाणी सोबत ठेवावे.
पूर्वी कोकणात कुणाकडेही गेले तरी गूळ-पाणी अगदी न चुकता समोर यायचे. उन्हाळ्यात फिरताना आपल्यासोबतसुद्धा गूळ ठेवणे सहज शक्य असते.
गुळाबरोबरच दाण्याचे लाडू, चिक्की, खजूर या गोष्टीसुद्धा आपल्यासोबत असणे आवश्यक आहे.
ट्रेकिंग किंवा प्रवास जरी असला तरी शेंगदाणे सोबत ठेवावेत. ते रात्री पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी ते फुगलेले दाणे खावेत. कुठल्याही गावात शेंगदाणे अगदी सहज मिळू शकतात.
चिवडा, चकली, फरसाण असले तेलकट पदार्थ मात्र टाळले पाहिजेत. कारण त्यांनी खूप तहान तहान लागते आणि घशाला शोष पडतो.
मोठय़ा प्रमाणावर जाहिरात होणारी शीतपेये मात्र चुकूनसुद्धा पिऊ नयेत. तसेच थेट बर्फ खाणेसुद्धा टाळले पाहिजे. घशाला आणि शरीराला त्यांनी हानीच पोहोचते. त्याऐवजी उसाचा रस, नीरा, ताक, कोकम सरबत, पन्हे, आवळा सरबत हे अनेक पटींनी उत्तम. एकतर ते चवदार असतात आणि ऐन उन्हाळ्यात थंडावा देतात.
अनेकांना गुळणा फुटण्याचा त्रास असतो त्यांनी कांदा सोबत ठेवावा.

Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
Nagpur, Gold Prices, Dip, Ahead of Holi, Offering Relieve, Buyers,
खुशखबर ! होळीच्या तोंडावर सोन्याचे दर घसरले.. असे आहेत आजचे दर…

 

आशुतोष बापट
ashutosh.treks@gmail.com