हिमालयाची डोंगररांग, हिमशिखरांतून वाहत येणाऱ्या नद्या व त्यांची खोरी, अप्रतिम जंगल अशा अनेक नैसर्गिक ठेव्यांचे वरदान लाभलेला असा हा अरुणाचल. एका चौरस किलोमीटरला १७ माणसे अशी भूभागाची वाटणी असलेला प्रदेश. स्थल पर्यटन, निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग, माउंटन बायकिंग, राफ्टिंग अशा अनेक उपक्रमांसाठी पूरक अशी ही भूमी. त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल व स्थानिकांशी संवाद साधण्याची संधी इतर भारतीयांना मिळेल. पण हे सर्व करताना स्थानिक निसर्ग व स्थानिक संस्कृतीला धक्का लागणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेणे आवश्यक आहे.
हा सगळा भूभाग सीमाप्रदेशाचा असल्याने येथील गावे, रस्ते यांची नीट माहिती मिळणे कठीण जाते. सीमाप्रदेशामुळे तेथील नकाशे उपलब्ध नाहीत. रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. प्रत्येक भागाची भाषा वेगळी असल्याने संपर्काच्या अडचणी येतात. इतर भारतीयांशी या प्रदेशातील लोकांचा फारसा संबध प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यामुळे तेथील लोकांमध्ये कायम दुर्लक्षित केले गेले असल्याची भावना निर्माण झाली आहे. पण येथील भटकंती मात्र तुम्हाला जगावेगळा आनंद देणारी आहे.
अरुणाचलमध्ये भटकण्यासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर असे दोन कालावधी उत्तम मानले जातात. मान्सूनपूर्व काळात एप्रिल-मे महिन्यात तवांग बोमदिलासाठी हल्ली भरपूर पर्यटक जात असतात. पण मान्सूनोत्तर नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ तसा कमी गर्दीचा असतो. या काळात सृष्टीचं अनोखं रूप न्याहाळता येतं. थोडा त्रास घ्यावा लागतो. दिलेल्या दोन्ही मार्गावर राहण्याची सोय चांगली आहे. छोटय़ा ग्रुपने स्वत:च नियोजन करून ही भटकंती करता येते. सेला पास नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये बर्फामुळे पूर्ण बंद असतो. तर झिरोला पाच हजार फुटांवरदेखील सकाळी बर्फाचं आच्छादन पाहायला मिळतं. इतक्या कमी उंचीला बर्फ हिमालयात सहसा पाहायला मिळत नाही.
गुवाहाटी – इटानगर – झिरो – मजोली – काझीरंगा – गुवाहाटी
गुवाहाटी ते तेजपूर (५ तास) : गुवाहाटी हे ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेले आसामच्या राजधानीचे शहर व संपूर्ण पूर्वोत्तर राज्याचे केंद्रस्थान. सर्व सुविधा असलेले मोठे शहर. तेजपूर हे ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेले शहर. ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला सुमारे २ कि.मी. लांबीचा एकमेव पूल तेजपूरला जोडणारा आहे. अरुणाचल प्रदेशची भूभागाद्वारे होणारी सर्व वाहतूक या पुलावरून होते.
तेजपूर ते इटानगर (५ तास) : इटानगर हे अरुणाचलच्या राजधानीचे शहर. चौदाव्या शतकातील जुन्या राजधानीच्या किल्ल्याच्या परिसरात वसलेले आधुनिक शहर. इटानगरमध्ये जवाहरलाल नेहरू संग्रहालय आहे. वेगवेगळ्या जमातींनी बांबू व वेताच्या वापरातून तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू व कलाकृती येथे बघायला मिळतात.
इटानगर ते झिरो (५ तास) : झिरो हे अपातानी जमातीचे ५ हजार फूट उंचीवरील गाव. इतर जमातीप्रमाणेच अपातानी हे चंद्र व सूर्य यांना देव मानतात. त्यांची घरे बांबू व वेत यापासून बनवलेली असतात. त्यांचे संग्रहालय तेथे आहे. झिरोचे मार्केट बघण्यासारखे आहे. गावाजवळील टेकडीवर काही वर्षांपूर्वी खोदकाम करताना निदर्शनास आलेले २५ फूट उंचीचे भव्य शिविलग आहे. झिरो भटकायला एक पूर्ण दिवस हवा.
झिरो ते मजोली (८ तास) : मजोली हे जगातील सर्वात मोठे नदीतील बेट आहे. तेथे वैष्णव पंथीयांचे पीठ आहे. पंधराव्या शतकातील संत व आसामचे सुधारक शंकरदेव येथे आले व त्यांनी येथे सत्रांची स्थापना केली. या सत्रांद्वारे कला, संस्कृती व धर्म यांचा प्रसार व प्रचार करण्यात येतो.
मजोली ते काझीरंगा (५ तास) : मजोलीहून बोटीने जोरहाटला यावे लागते. जोरहाटला ब्रह्मपुत्रेच्या काठावरील कोकीलामुख गावात प्रसिद्ध वनमानव जादव पायेंग राहतो. त्याची भेट घेऊन जोरहाटवरून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानला जाता येते.
काझीरंगा ते गोहाटी (५ तास) : रस्ता दुपदरी व मध्ये विभाजक असलेला व खूप चांगला आहे. त्यामुळे हा प्रवास सुखावह होतो.
हृषीकेश यादव hrishikeshyadav@hotmail.com