महाराष्ट्राच्या मानचिन्हांपकी एक असलेले शेकरू अर्थात तांबूस खार पाहायची असेल आणि घनदाट निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल तर एकदा भीमाशंकरला जायलाच हवं. सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाट परिसरात भीमाशंकर अभयारण्य वसलं आहे. अभयारण्याचं संपूर्ण क्षेत्र १३०.७८० चौ.किमी. असून, १९८५ मध्ये या क्षेत्राला अभयारण्य घोषित करण्यात आले.

डोंगराच्या दोन उंच कडय़ात हे अभयारण्य विभागलं गेलं आहे. अभयारण्याच्या पहिल्या भागात भीमाशंकराचे मंदिर आणि जंगलाचा समावेश आहे. भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिगांपकी सहावं ज्योतिर्लिग. हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिराला शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांनी दर्शनासाठी भेट दिल्याच्या नोंदी आढळतात. श्रावणात भीमाशंकर येथे मोठी यात्रा भरते. मंदिराच्या छतावर सुंदर नक्षीकाम आहे. हा भोळाशंकर असंख्य भक्तगणांना आपल्या दर्शनाने आनंदित करतो.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत
Water supply by tanker to 61 villages in Jat and Atpadi talukas of the district sangli
सांगली: सव्वा लाख लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर
Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

अभयारण्याच्या दुसऱ्या बाजूस ठाणे, रायगड जिल्हय़ातील जंगलाचा समावेश होतो. येथील जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, शेंद्री, पिसा, ऐन, साग, मोह, बांबू, हिरडा, बेहडा, करवंद, आईन अशी विविध झाडं आणि वनौषधी आढळतात. येथे बिबटय़ा, सांबर, हरिण, कोल्हा, सािळदर, भेकर, लांडगा, वानर, तरस, काळवीट, रानससा, उदमांजर, रानडुक्कर, पिसोरी हरिण, खवल्या मांजर असे अनेक वन्यजीव आपल्याला दर्शन देऊन जातात. अतिशय घनदाट अरण्याने वेढलेल्या या अभयारण्यात अनेक पक्ष्यांचा अधिवास आहे. शेकरूचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक मोठय़ा प्रमाणात इथं येतात. घनदाट जंगल आणि त्याला ज्योतिर्लिगाची जोड यामुळे येथे पर्यटकांची सतत गर्दी असते.

भीमाशंकर मंदिराच्या पश्चिमेला कोकण कडा आहे. येथून भीमाशंकरच्या जंगलाचे विहंगम दृश्य दिसते. कोकणकडय़ापासून सीतारामबाबा आश्रमाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. येथून नागफणीला जाण्यासाठी पायवाट आहे. कोकणातून हे शिखर नागाच्या फणीसारखे दिसते म्हणून या शिखराला नागफणी असे नाव पडले आहे.

घनदाट वनश्रीने सजलेले, अनेक धबधब्यांना अंगाखांद्यावर खेळवणारे, छोटय़ामोठय़ा टेकडय़ांची गर्दी असलेले हे अभयारण्य भटकंतीला आसुसलेल्या आणि रानवाटांवर प्रेम करणाऱ्या वनपर्यटकांचे आवडते स्थळ आहे. इथल्या वाटा पर्यटकांना जंगलभ्रमंतीसाठी खुणावत राहतात. इथले डोंगर ट्रेकिंगसाठी आव्हान देतात तर इथला भोळाशंकर असंख्य भक्तगणांना आपल्या दर्शनाची ओढ लावतो. भीमाशंकराचं दर्शन घेऊन पुढे गेलं की दरीत पापमोचन तीर्थ दिसतं. भीमाशंकराच्या ज्योतिर्लिगातून निघालेलं पाणी जमिनीखालून वाहात या ठिकाणी भीमानदीच्या स्वरूपात प्रकट होतं असं म्हणतात.

भीमाशंकरला जाण्यासाठी पुणे-राजगुरूनगर-मंचर-घोडेगाव-पोखरीघाट ते भीमाशंकर असे जाता येते. शिवाजीनगर बस स्थानकातून ठरावीक वेळेच्या अंतराने बस उपलब्ध आहेत. मुंबईहून भीमाशंकरला जायचं असेल तर लोणावळा, तळेगाव, चाकणमाग्रे मंचर असं जाता येतं. भीमाशंकर आणि आसपासची ठिकाणं पाहायची असतील तर खासगी वाहनाने जाणं केव्हाही सोयीचं ठरतं. काही देवराई या भागात आहेत. देवराई म्हणजे जंगलातली पवित्र जागा. देवाच्या नावानं राखून ठेवलेल्या वनक्षेत्राला कोण हात लावणार या उद्देशाने देवराई जपल्याही गेल्या अशी माहिती इथं भेट दिल्यानंतर सांगितली जाते. एका दिवसाच्या सुट्टीत भीमाशंकरचा पूर्ण आनंद घेता येत नाही. देवदर्शनाबरोबर निसर्गपर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर किमान दोन-तीन दिवस नक्कीच हवेत. वन विभागाचे विश्रांतीगृह आपल्या स्वागतासाठी तयार आहेच. त्याचबरोबर पर्यटन विकास महामंडळ आणि ग्रामस्थ संचालित निवास व्यवस्थाही येथे उपलब्ध आहे. वन विभागामार्फत कोंढवळ येथे स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पर्यटकांसाठी रॅपिलग, ट्रेकिंगचीदेखील सोय करण्यात आली आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com