भराडहून निघाल्यापासून सलग तीन दिवस नर्मदेकाठच्या गावांतून सातपुडय़ात फिरत होतो. थुवानी, केळी, अट्टी, पउला, डेबरामाळ, मांडवा. उंच-सखल प्रदेश. एक टेकडी उतरतो तोच दुसरीचा चढ सुरू. ओअ‍ॅसिसपणे भासणारी क्वचित कुठे दिसणारी तुरळक हिरवी झाडं सोडल्यास सारा प्रदेश उजाड, बोडके डोंगर आणि उन्हाचा तडाखा. कधी डोंगराचा खडा चढ. अशात एखाद्या निष्पर्ण झाडाच्या बुंध्याची चिंचोळी सावलीही हवीहवीशी वाटणारी.

या रखरखाटात चालत असतानाच एखादं घरं लागतं. बांबूच्या जाळीदार भिंती. न लिंपलेल्या. घरात कुणी दिसलंच तर राम राम करावं. त्याचं प्रत्युत्तर येत असतानाच झोपडीबाहेरची खाट आपल्यासाठी मोकळी केली जाते. त्यावर गोधडी अंथरून दुसरी लोडासारखी गुंडाळून ठेवली जाते. थंड पाण्याचा भरलेला तांब्या आणि पेला घेऊन कोणी तरी येतंच. तुम्ही कोण, कुठले, कशाला आलात, हे सारे प्रश्न नंतरचे.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

दुपारच्या जेवणाची वेळ असेल तर भाकरी मिळेल का? असं क्वचित विचारावं लागतं. संध्याकाळी पोहोचलात तर अंधार पडेपर्यंत तेथेच गप्पा चालू राहतात. आणि हे पाहुणे आपल्याकडेच मुक्कामाला आहेत हे गृहीतच धरलेलं असतं. एकीकडे गप्पा चालू असतानाच भाकरी भाजल्याचा वास यायला लागतो. थोडय़ाच वेळात चला जेवायला असं निमंत्रण येतं. जाळीदार झोपडीत सतरंजीवर बसलो की हात धुवायला पुढय़ात एक तसराळं, समोरचा माणूस अदबीने पाणी घालतो. जेवायला बहुधा तूरडाळ, कडधान्य किंवा उडदाची डाळ. तसराळंवजा थाळीत डाळ. बांबूच्या मोठय़ा टोपलीत थाळीच्या आकाराच्या मोठय़ा भाकऱ्या. ज्वारी किंवा मक्याच्या. साधं घर असेल तर तोंडी लावायला किसलेली कैरी, तुलनेनं बरं असेल तर कांदादेखील. भूक शमेपर्यंत आपोआपच शब्द उमटतात, अन्नदाता

सुखी भव!

जेवणं झाल्यावर जरा वेळ गप्पा मारत अंगणातल्याच खाटेवर खुल्या आकाशाखाली लक्ष लक्ष चांदण्या मोजत आडवं व्हावं. अजून दोन गोधडय़ा नाही तर चादरींची सोय केलेली असते. उन्हात थकलेलं शरीर सुखावलेलं असतं. निद्रेच्या मार्गावर मनाला जाणवत राहतो तो या माणसांच्या मनाचा ओलावा. या रूक्ष प्रदेशातला, रखरखाटातला ओलावा. या कठोर प्रदेशात डोंगरातले झरेदेखील उन्हाळ्यात आटून जातात. मग हा ओलावा कसा काय टिकून राहतो?

प्रदेश खडतर म्हणावा तर कसा? नुसता ओसाडच नाही, तर दुर्गमही. भराड, मुखडीसारख्या अनेक गावांना जायला आजही कच्चा रस्तादेखील नाही. डोंगरवाटच तेवढी. अट्टी, शेलगदा, पउला, डेबरामाळला तर आता आता कुठे चार-पाच वर्षांत रस्ता झालाय. कुठे डांबरी, तर कुठे मातीचा कच्चा. ना या जगाबाहेरच्यांचा येथल्या लोकांशी काही संबंध यायचा, ना यांचा बाहेरच्यांशी. जमीन कागदपत्रांची काही कामं असतील तर तालुक्याला जायचं किंवा तंबाखू, मीठ, मिरची अशा गरजेच्या गोष्टींसाठी प्रवास. आज रस्ते झाले तेथे कमांडर जीपचीच काय तेवढी सुविधा. येता-जाता शंभर रुपये. कुणाला परवडतायत?

रस्ते नाहीत, तशी वीजही नाही. नर्मदा शेजारी असून सिंचनाची सोय नाही. आताशा आलेले सोलरचे मिणमिणते दिवेच काय तेवढे. मोबाइल मात्र आहेत. पण रेंज कमीच. पाण्यासाठी पायपीटही ठरलेलीच. डोंगरातले झरे आटले की नर्मदेच्या किनारी जायचं तर एक-दोन डोंगर ओलांडायचे किंवा जवळच्या म्हणजे एक-दोन डोंगर ओलांडून दुसऱ्या गावच्या झऱ्यावर जायचं.

शिक्षणाचे अंकुर आता कुठे या रखरखाटात फुलायला लागलेत. आदिवासी वसतिगृहात राहून बी.कॉम., बी.ए., बी एड. करणारी मुलं भेटतात अधूनमधून. शिकून नोकरी करायची तर बाहेर पडावंच लागेल. तिथे काम करून पैसे मिळवतील. पण इथला विकास? तो नाहीच, इथे तीच पायपीट. तोच अंधार, तीच पाण्यासाठी वणवण आणि तोच रखरखाट, एक तो मनाचा ओलावा सोडल्यास. तो मात्र असा की, त्यानं दमलेल्या शरीराला सुखवावं आणि आपल्याही मनात आत कुठे तरी एक बारीकसा झरा पाझरावा, त्या रखरखाटातही.

प्रसाद निक्ते walkingedge@gmail.com