एक-दोन दिवसांची भटकंती ही आता अनेकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. पण याच दोन दिवसांत एखादा सामाजिक प्रकल्प पाहणं हे नक्कीच सरधोपटपणाच्या पलीकडचं ठरू शकतं आणि मौजमजेतल्या आनंदापलीकडे जगणं समृद्ध करणारं पर्यटनदेखील घडू शकतं.
आजच्या काळात सगळेच जण पर्यटनासाठी जातात. तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच झाला आहे. वर्षभर कामाच्या रहाटगाडय़ामध्ये प्रत्येकजण गुंतलेला असतो, तो दोन-तीन वेळा जशी सवड मिळते तसा स्वत:ला ताजेतवाने करण्यासाठी बाहेर पडत असतो. त्या पर्यटनामध्ये काहीतरी नावीन्य, थरार, नवीन पर्यटनस्थळे, नवं काही तरी शिकण्याची ऊर्मी, पर्यावरणाबद्दल आस्था, सामाजिक भान या सगळ्या वा ह्य़ामधील काही गोष्टी तरी साध्य व्हाव्यात अशी त्याची अपेक्षा असते. पर्यटनाहून आल्यावर त्याला या काही गोष्टींमुळे अतीव समाधान मिळते व त्याच्या त्याच्या समाधानाचा हुंकार हा असतोच. हा हुंकार कायमच निसर्गरम्य जागी गेल्यानेच मिळतो असे नाही. तर अनेक वेळा तो एखाद्या सामाजिक प्रकल्पाला भेट देऊनदेखील मिळू शकतो. फक्त तशी दृष्टी आपल्याला विकसित करावी लागेल.
एखाद्या प्रकल्पाला भेट दिल्याने नेमकं काय मिळतं याचं उत्तर खरं तर शब्दात देणं अवघड आहे. किंबहुना ती एक अनुभूती असते असेच म्हणावे लागेल. एखादा सुंदर धबधबा, प्राचीन मंदिर, निसर्गरम्य नदी परिसर असं पाहिल्याने नेमकं काय मिळतं याचं उत्तर हे शब्दात मांडता येईलही कदाचित. निसर्गसौंदर्याने मोहित होतो तेव्हा तुमच्या चित्तवृत्ती ताज्या होतात. पण जेव्हा एखाद्या सामाजिक प्रकल्पाला भेट देता तेव्हा तुम्ही अंतर्बाह्य़ बदलता. त्या ठिकाणची मेहनत, त्यांची जिद्द, तुटपुंज्या साधनसामग्रीत सुरू असलेला त्यांचा प्रवास हे सारं कोठेतरी मनाला उभारी देणारं असतं. आपल्या रोजच्या रहाटगाडग्यात आलेली उदासीनता दूर करणारा असतो. आणि त्याचबरोबर त्या प्रकल्पातील लोकांनादेखील प्रोत्साहित करणारे ठरते. मग त्या प्रकल्पात कोणी तरी एखादा गावाचा कायापालट केलेला असतो, तर कोणी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी महाकाय प्रकल्प राबवत असतो, एखाद्या दूर आदिवासी पाडय़ावर जंगलात कोणी बांबूपासून असंख्य उत्पादन तयार करून आदिवासींना स्वयंपूर्ण करण्यासाठी झटत असतो, तर कोणी आदिवासींच्या आरोग्यासाठी आयुष्य वेचत असतो, तर एखादा अनाथ मुलांसाठी झटत असतो. अशी कैक उदाहरणं आपल्या राज्यात सापडतील. गरज आहे ती आपल्याला ती डोळसपणे शोधायची.
गेल्या काही वर्षांत आपल्याकडे अशा प्रकल्पांना भेटी देण्याचे ‘सोशल टुरिझम’ चांगलेच विकसित होत आहे. पण त्यातदेखील नेहमीचाच साचा तयार होत आहे. त्याकडे पाहण्याची दृष्टी विकसित होत नाही. प्रकल्पाला भेट द्यायची आणि पुढे कोठेतरी जायचे, किंवा कोठेतरी जाऊन मग प्रकल्पात यायचे असा एक ट्रेन्ड रुजू पाहतोय. अशाने ना प्रकल्पाकडे लक्ष जाते ना इतर पर्यटनाकडे. कधी कधी त्यात उपकृतपणाची झाकदेखील दिसून येते. त्यामुळेच शहरी मानसिकता दूर ठेवून करायचे हे पर्यटन आहे. त्यासाठी थोडा वेगळा वेळ काढावा लागेल. कारण हे पर्यटन तुमचं जगणं समृद्ध करणारं असतं. आनंदाने जगणाऱ्यांसाठी आणखीन उभारी देणारं आहे.

हे लक्षात ठेवा
तुम्ही एखादे प्रेक्षणीय पर्यटन स्थळ पाहायला जात नाही आहात हे सर्वप्रथम ध्यानात घ्यावे.
जेथे जाणार तेथे शक्यतो आधी कळवता आले तर उत्तम, जेणेकरून त्यांच्या नियोजित कामात अडथळा येणार नाही.
तुम्ही भेट देत असलेला उपक्रम हा व्यापारी तत्त्वावरील चालणारे पर्यटन केंद्र नाही. एखादी सुविधा कमी-जास्त असू शकते. त्यामुळे पर्यटनस्थळी जसा हिशोब करता तसा करू नये.
उपक्रम जर अदिवासींशी निगडित असेल तर तेथील लोक हे प्रेक्षणीय वस्तू आहेत असे पाहू नये.
शक्यतो जेथे जाल त्या ठिकाणी आपल्यावर तेथे होणारा खर्च तर द्याच, पण प्रकल्पाला जमेल तशी आर्थिक मदत देता येईल असे पाहावे.
प्रकल्पावरील मुक्कामाच्या काळात पूर्णवेळ तेथेच राहावे. तेथे राहून आजूबाजूच्या पर्यटनस्थळी भेटी देण्याचे नियोजन नसावे.
अनेक वेळा उत्साहाच्या भरात प्रकल्प पाहण्याचा मूळ उद्देश मागे पडू शकतो आणि इतर पूरक रंजक गोष्टींवरच लक्ष केंद्रित होते. हे टाळावे.

कोठे जाल? कसे जाल?
आनंदवन-हेमलकसा-सोमनाथ: येथे कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन केंद्र आहे. येथे डॉक्टरांकडून आपल्याला या आजाराबाबत र्सवकश माहिती मिळून गैरसमज दूर होऊ शकतात. कुष्ठरोग्यांनी चालवलेले अनेक प्रकल्प येथे गेली ६७ वर्षे सुरू आहेत. येथे किमान दोन दिवस हवेत. तेथूनच मग पुढे हेमलकसाला जाता येतं. आदिवासी आरोग्य केंद्र, आदिवासी मुलांची शाळा, वसतिगृह, वन्य प्राण्यांचे अनाथालय असे उपक्रम १९४३ पासून सुरू आहेत. हेमलकसा पाहून सोमनाथला आनंदवनचा सुमारे साडेपाचशे एकरवरील अभिनव शेती प्रकल्प पाहायला जावे. यंदा ३०८ एकवर तब्बल साडेचार हजार क्विंटल तांदूळ उत्पादन झाले होते.
कसे जावे -नागपूर अथवा वरोरा. नागपूर ते आनंदवन १०० किमी, वरोराहून पाच किलोमीटर.
स्नेहालय – एचआयव्हीबाधित मुलांचे वसतिगृह येथे आहे. एचआयव्हीबद्दलचे मनातील सारे गैरसमज तर दूर होतातच, पण या नव्या पिढीतील दुर्दम्य आशावाद येथे पाहता येतो. १५० मुलांचे हे वसतिगृह अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीत आहे.
हिवरे बाजार – ग्रामविकासाचं आदर्श प्रारूप पाहायचे असेल तर अगदी अवश्य भेट द्यावी असे हे गाव अहमदनगरपासून २५ किलोमीटरवर आहे. पर्यावरण, शेती, शिक्षण असा सर्वागीण विकास झालेले एक आदर्श गाव पाहायचे असेल तर येथे जायलाच हवे. शेतीतील अनेक प्रयोग येथे पाहता येतात.
मेळघाट जंगलातील बैरागड या दुर्गम भागातील आदिवासींचे आरोग्य केंद्र म्हणून हे एकदा तरी पाहावेच.
संपूर्ण बांबू केंद्र – मेळघाटमध्येच सेमाडोहच्या पुढे लवादा येथे संपूर्ण बांबू केंद्र आहे. आदिवासींना स्वयंपूर्ण करणारे हे केंद्र म्हणावे लागेल. बांबूपासून तयार केलेल्या अनेक उत्पादने येथे पाहता येतील. छोटा ग्रुप असेल तर केंद्रात राहतादेखील येईल. किंवा चिखलदरा येथे राहून बैरागड आरोग्य केंद्र, संपूर्ण बांबू केंद्र एका दिवसात पाहता येईल.
चित्रकूट – मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश यांच्या सीमेवर वसलेले हे पुरातन गाव. दीनदयाळ शोध संस्थेने यशस्वी केलेले ग्रामविकासाचे कैक प्रकल्प पाहता येतात.