नर्मदेच्या तीरावरून सुरू झालेली ‘वॉकिंग ऑन द एज’ मोहीम आता कोल्हापूर जिल्ह्यतल्या दाजीपूपर्यंत येऊन पोहोचली आहे. गेल्या ६५ दिवसांत आठवडय़ागणिक जसा निसर्गातील बदल दिसत गेला, तसा इतरही सगळ्या गोष्टींमध्ये. पाणी, प्राणी, बोली तसाच जेवणखाण्यातही.

आपण शहरी माणसं दिवसभर चरत असतो. सकाळी नाश्ता, मग मध्येच काही तरी तोंडात टाकायचं, दुपारचं जेवण, मग परत मधल्या वेळी काहीतरी. संध्याकाळी टाइमपास खाणं. रात्री जेवण. त्यात दिवसभर चहा कॉफी चालूच. गावांमध्ये खाण्याच्या वेळा तीनच. न्याहरी, दुपारचं जेवण आणि मग थेट रात्रीचं. अधेमधे काही नाही. या तीनही वेळा खायचं ते भाकरी किंवा भातच. मोहिमेत घाटमाथ्यांवरच्या गावांमधूनच फिरत असल्याने साहजिकच गेल्या दोन महिन्यांमध्ये माझं खाणंपिणंही याच पद्धतीने चाललंय. आश्चर्य म्हणजे, शहरात जशी चारच्या सुमारास भूक लागते, तशी येथे अजिबात लागत नाही. आणि अधेमधे अरबट चरबट खाणे होत नसल्यामुळे जेवणही भरपूर जातं. इतका हेल्दी आहार मी आजवर कधीच केला नव्हता.  सातपुडा परिसरात भाकरी मक्याची किंवा ज्वारी. तेथे भाजी हा प्रकारच फारसा नाही. भाकरीबरोबर घट्ट डाळ तीही भरपूर. पुढय़ातली थाळी डाळीनेच भरलेली. बांबूच्या टोपलीत ठेवलेल्या भाकऱ्यांमधली एक उचलायची आणि हातात घेऊन खायची. तेथे जशा भाज्या नाहीत, तसा मांसाहारही खूपच कमी. नवस पूजा असेल तेव्हाच काय तो. जेवायला बसलं की समोर मोठं तसराळं ठेवून, यजमान अदबीनं हात धुवायला पाणी घालणार. तसराळं अगदी घसघशीत. काही घरांमध्ये नक्षीदार पात्रं. हात धुवायचीही पद्धत साधारण त्रंब्यकेश्वरपर्यंत होती. पण सातपुडय़ातून दक्षिणेकडे सरकत गेलो तसा तसराळ्याचा आकार लहान होत गेला. सह्यद्री पठारावर त्याची जागा छोटय़ा पातेल्याने घेतली. त्र्यंबकेश्वरच्या पुढे ही पद्धत हळूहळू थांबली आणि तांब्यातल्या पाण्याने अंगणात हात धुवायची पद्धत सुरू झाली.

Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
summer
सुसह्य उन्हाळा!
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
satpura range marathi news, bhongarya bazar marathi news
सातपुडा पायथ्याशी होळीआधी भोंगर्‍या बाजारात ढोलचा निनाद!

नाशिक जिल्ह्यतल्या घाटमाथ्यावर ज्वारी मक्याची भाकरी मागे पडली आणि नाचणीची भाकरी मिळायला लागली. कधी गव्हाच्या भाकऱ्या. आता भाज्याही वरचेवर मिळायला लागल्या. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली की आतून थोडी कुजबुज ऐकायला यायची. मग यजमान बाहेर येऊन विचारणार, ‘वशाट चालतं का?’ हो म्हटलं की जेवणात कधी कोंबडी, कधी अंड वगैरे. पण घाटाच्यावर असल्याने मासे नाहीत. जेथे धरणं आहेत तेथे अधूनमधून मासे पकडतात एवढंच.

मावळ पट्टय़ात बऱ्याचदा पिठलं भाकरी. ”नाचणीची भाकर आणि पिठलं चालेल का? आमचं आपलं चुलीवरचं जेवण.” पाव्हण्याला आपलं जेवण आवडायचं नाही वाटून बऱ्याचदा विचारायचे. मी मनात म्हणायचो, ”अहो चालेल काय धावेल.

डोंगरांमधून फिरत असल्याने मावळ, सातारा पट्टय़ात बऱ्याचदा धनगर वाडय़ांमध्ये मुक्काम व्हायचा. गावापासून लांब डोंगरात वरच्या बाजूला त्या वाडय़ा. या दोन महिन्यात जो काही दुधाचा चहा मिळाला तो बहुतेक धनगर वाडय़ातच. कधी मस्त आंबट ताक मिळायचं, तेही भरपूर. मोठय़ा पिढीतल्या धनगर मामांना रोज ताक लागतंच. त्यांची अंगमेहनत आणि असं सकस खाणंपिणं त्यामुळे बहुतेक सगळे अंगापेरानं धिप्पाड.

क्वचित कधीतरी दुपारी आडवेळेला एखाद्या गावात पोहोचतो. लोकांची जेवणं झालेली असतात. घरात कधी भाकरी असते, कधी भात. पण कालवण नसतं. मग चटणीबरोबर भाकरी. गेल्याच आठवडय़ात एका ठिकाणी, असाच दुपारी आडवेळी पोहचलो. त्यांच्याकडे भात होता, पण भाजी डाळ काही नव्हतं. मग त्यांनी तो भात आणि घाटी मसाल्यासारखी कोरडी चटणी दिली. ही अशी जोडी तोपर्यंत कधीच खाल्ली नव्हती. पण तोही प्रकार एवढा चविष्ट लागला की मी अजून थोडा भात घेऊन खाल्ला.

अशीच चवदार चटणी रायरेश्वराच्या परिसरात खायला मिळाली. चालताना आणखी दोघे भटके मित्र माझ्याबरोबर होते. पुढली वाट विचारायला कोणी दिसतंय का ते शोधत असताना, एका शेतात एक थोडं वयस्कर जोडपं काम करताना दिसलं. आम्ही शेताच्या बांधावर सावलीला बसलो. पाणी प्यायला वाट विचारली. थोडय़ा गप्पा झाल्या. मग त्या मावशींनी तांदळाच्या तीन भाकऱ्या आणि वाटीभर घट्ट ओलसर चटणी हातात ठेवली. खरं तर ते त्यांचं दुपारचं जेवण. पण नको नको म्हणतानादेखील ते त्यांनी आमच्या हातात दाबलं. ”जेवा तुम्ही. आम्ही घरी जाऊन जेवतो.” आम्ही तिघांनी त्यातील एक भाकरी आणि ती खोबरं लसणाची चटणी खाल्ली. त्या सुगरणीने काय जादू केली होती काय माहीत, पण तशी चटणी कधी खाल्ली नव्हती. ती चव आयुष्यात कधीच विसरणार नाही.

walkingedge@gmail.com