‘अमक्या तमक्या जंगलाचा पट्टा अभयारण्य घोषित झाल्यापासून रानडुक्कर, सांबर वगैरे प्राण्यांची संख्या वाढते आहे’ अशा प्रकारची बातमी वाचून शहरी सुजाण पर्यावरणप्रेमी आनंदी होतात. असे प्राणी वाढले की वाघ-बिबटय़ांना खाद्य मिळून त्यांचीही संख्या वाढायला मदत होईल अशा विचाराने तो मनात सुखावतो. जंगल वाचवण्याच्या निकडीची जाणीव असलेल्या तुमच्या माझ्यासारख्या निसर्गमित्रांचा हा एक दृष्टिकोन. पण या दृष्टिकोनाची दुसरी बाजू ‘वॉकिंग ऑन द एज’ मोहिमेत सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावरून भटकताना पदोपदी समोर येत होती.

‘‘इथे पाणी भरपूर आहे. पूर्वी बरेच जण हिवाळ्यात गहू काढायचे. पण कळसूबाई-हरिश्चंद्रमधला पट्टा अभयारण्य घोषित केल्यापासून इथे सांबरं आणि रानडुक्कर वाढलीयेत. शेतात घुसून पिकं फस्त करतात. काठी कुंपण केलं तर सांबरं आवरतात. पण डुक्कर त्यातूनही घुसतात आणि नासाडी करतात. म्हणून गहू लावत नाही कुणी आता’’, जुन्नरजवळच्या कुकडेश्वर परिसरातल्या एका शेतकऱ्याचा हा दुसरा दृष्टिकोन.

शहरी माणसाच्या मूलभूत गरजा भागलेल्या असतात. तिथं शिक्षणाचा प्रसारही झालेला असतो. त्यामुळे पर्यावरणासारख्या रोजच्या गरजांपलीकडल्या गोष्टींचा विचार तो करू शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास रोखायचा तर जंगलं टिकवायला हवीतच आणि त्यासाठी आवश्यक पावलंही उचलायला हवीत. पण शहरी माणूस या सगळ्यापासून शेकडो किलोमीटर दूर असतो. उचललेल्या पावलांची झळ त्याला कधीच बसत नसते. ती बसते स्थानिकांना. कोयना-चांदोलीच्या पट्टय़ात डुकरा-सांबरांबरोबर गवेही आहेत. तेही शेतीची नासधूस करतात. दुसरीकडे डोंगरात नाचणी, वरीसारखी पिकं काढायला बंदी आहे. जंगलात बिबटे आणि अस्वलं आहेत. कधी कधी त्यांचाही उपद्रव होतो. बिबटे अधूनमधून गावातली वासरं, शेळ्या किंवा कुत्रे उचलतात.

जिथे मोठे व्याघ्रप्रकल्प आहेत तिथली गावं उठवली जातात. मग त्यांचं कुठे तरी पुनर्वसन होतं. कोयना व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर भागातील काही गावांचं पुनर्वसन सातारा जिल्ह्य़ातील दुसरीकडे झालंय, काहींचं रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या खेड तालुक्यात तर काहींचं पार ठाणे जिल्ह्य़ातल्या ग्रामीण भागात. जरा विचार करा. तुमच्या माझ्यासारखी शहरातली व्यक्ती जिथे राहतेय, ते रहिवासी संकुल उद्या व्याघ्रप्रकल्पाचा भाग म्हणून घोषित झालं आणि त्या व्यक्तीला सांगण्यात आलं की आता येथून उठायचं आणि दोनशे किलोमीटरवरल्या दुसऱ्या शहरात पर्यायी जागा दिलीये तिथे बाडबिस्तारा घेऊन जायचं. जाईल का ती व्यक्ती? होईल का तिला व्याघ्रप्रकल्प घोषित झाल्याचा आनंद?

जो प्रकार जंगलांचा, तोच धरणांचा. शहरी माणूस कुठे तरी नवा फ्लॅट खरेदी करतो. ‘‘तिथे अगदी चोवीस तास पाणी, बरं का!’’ असं अगदी समाधानानं इतरांना सांगतो. पण याचीसुद्धा झळ पाणी जिथून येतं त्या धरणक्षेत्रातल्या रहिवाशांनाच सोसावी लागते. वरंधा घाट-रायरेश्वर परिसरात देवघर धरण आहे. सतरा वर्षांपूर्वी तिथली गावं उठली. पर्यायी जागा मिळाली फलटणजवळ. दुष्काळी भागात. कालव्यानं तिथपर्यंत पाणी पोहोचवायची योजना आहे. पण ते काम अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे बऱ्याच जणांनी फलटणला न जाता गावाजवळंच वाचलेल्या जमिनी होत्या तिथे शेतात घरं बांधली आणि तिथेच राहतात. पण इतक्या वर पंपानं धरणाचं पाणी आणणं शक्य नाही. त्यामुळे शेतीसाठी तर सोडाच पण घरच्या वापरासाठीसुद्धा उन्हाळ्यात काही गावांमध्ये टँकरनं पाणी आणायला लागतंय.

दुसऱ्या काही धरण क्षेत्रांमध्ये तर पाणी जवळ असूनही उपसायला परवानगी नाही. ‘‘इथलं पाणी खालच्या शहरी भागाला विकलं गेलंय.’’ नाशिकजवळच्या कश्यपी धरणक्षेत्रातल्या गावामधला एक जण सांगत होता आणि उपसायला परवानगी आहे पण त्यासाठी वीजच नाही ही सातपुडय़ात नर्मदेकाठच्या लोकांची व्यथा.

थोडक्यात काय, धरणांसारखे विकासाचे प्रकल्प असोत की अभयारण्यासारख्या पर्यावरण संवर्धनाच्या योजना, झळ सोसतो तो डोंगरातला रहिवासीच. या सनातन तिढय़ावर उपाय काय करणे हे माझ्या बुद्धिपलीकडचं. धरणांचा मुद्दा विकासाशी निगडित, तर जंगलांचा पर्यावरणाशी. त्याबाबतीतला माझा शहरी ‘रोमॅन्टिसिझम’ मात्र या भटकंतीत अगदी जमिनीवर आला.

पूर्वी कधी तरी केलेल्या एका ग्रुप ट्रेकची आठवण झाली. जंगलात चालताना वाटेवर एक स्थानिक फाटीसाठी झाडाच्या फांद्या छाटत होता. ग्रुपमधल्या एका मुलीला राहवलं नाही. ‘‘अरे रे नका हो तोडू झाडं. झाडं जगवायला हवीत’’ ती त्या माणसाला म्हणाली. काही न बोलता शून्य नजरेने त्याने तिच्याकडे पाहिले. आणि परत फांद्या छाटायला लागला. त्याच्या मनात काय विचार आला असेल माहीत नाही. पण त्यानं फाटी तोडली नाही तर त्याच्या घरची चूल कशी पेटणार? तोच प्रकार प्राणिहत्येचा. गावकऱ्यांनी विष घालून बिबटय़ाला मारल्याच्या बातम्या अधूनमधून आपण वाचतो आणि हळहळतो. फाटी तोडणं, प्राणी मारणं हा कायद्याच्या दृष्टीने ‘ऑफेन्स’ असेल. पण स्थानिकांचा तो ‘डिफेन्स’ आहे. परिस्थितीची झळ ज्याला पोहोचत नाही आणि ज्याला पोहोचते अशा दोन जगांमधल्या माणसांच्या एकशे ऐंशी अंशाची फारकत असलेला दृष्टिकोनातला तो फरक आहे इतकंच.

प्रसाद निक्ते  walkingedge@gmail.com