‘साष्टांग शरणागती’ हा ‘अन्वयार्थ’ (२६ एप्रिल) वाचला. चीनचे बंडखोर नेते डोल्कून इसा यांचा भारतीय व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने चीनच्या दबावापुढे लोटांगण घातले आहे असे त्यात म्हटले असून ते मनाला पटत नाही. कारण गृहमंत्रालयातील सूत्रांनुसार चीनने दहशतवादी ठरवलेल्या विगूरवंशीयांच्या अधिकारांसाठी लढणारे नेते डोल्कून इसा यांनी व्हिसा हा पर्यटक म्हणून मागितलेला होता व त्याद्वारे ते धरमशाला येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत सहभागी होणार होते. ‘ही बाब पर्यटकांना जारी करण्यात आलेल्या नियमांत बसणारी नसून त्यांनी जर परिषदेसाठी व्हिसा मागितला तर त्यावर सकारात्मक विचार केला जाऊ शकतो,’ असा दावा मंत्रालयाने केला आहे. व्हिसा रद्द करण्याचे कारण काहीही असो; पण प्रथम व्हिसा देऊन भारताने चीनला ‘जसास तसे’ उत्तर आम्हीही देऊ शकतो, असा योग्य संदेश दिलेलाच आहे. म्हणून पुढे व्हिसा नाकारला तरी काहीही फरक पडत नाही.
तसेच याआधीही, भारत चीनच्या दडपडणाचा फारसा विचार करत नाही हे पंतप्रधानांनी स्वत:च्या शपथविधी समारंभात भारतातील धरमशाला येथून तिबेटची सूत्रे पाहणाऱ्या सरकारचे पंतप्रधान लॉबसॉग संजन यांना निमंत्रित करून दाखवून दिले होते, याची आठवण होते.
– चेतन मोरेश्वर मुळे, नंदुरबार.

हा बुद्धिवाद की बुद्धिभेद?
‘संस्कृतिसंवाद’ सदरातील ‘धार्मिक कल्पनांतून सांस्कृतिक ऐक्य’ या लेखात (२७ एप्रिल) शेषराव मोरे म्हणतात, ‘धर्म, धर्माशी संबंधित भूमी, पाप-पुण्याच्या कल्पना, पुण्यप्राप्तीसाठी पुण्यक्षेत्रांचे दर्शन एवढय़ापुरतेच त्यांचे वैचारिक विश्व मर्यादित होते. या साऱ्याचा परिणाम सांस्कृतिक ऐक्य निर्माण होण्यात झाला, एवढेच आपल्याला समजून घ्यायचे आहे. हे समजून घेताना स्वत: धार्मिक असण्याची, कोणा देव-देवतावर, स्वर्ग-नरकावर वा पाप-पुण्यावर श्रद्धा असण्याची गरज नाही. देशातील काही कोटी लोकांची तशी श्रद्धा होती व आहे हे वास्तव समजून घेतले तरी पुरेसे आहे. हे वास्तव समजून घेणे हा बुद्धिवादाचाच एक भाग आहे.’
बुद्धिवादाच्या आडून बुद्धिभेद करणे हे शेषरावांसारख्या तथाकथित विचारवंताला सहज शक्य होते, कारण आजही लोकांची तशी श्रद्धा आहे; पण या वास्तवामागील धगधगता विस्तव समजून घेणे यालाच बुद्धिवाद म्हणतात. समाजाच्या ऐक्यासाठी धर्म आणि धर्मावर आधारित देवदेवता, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या कल्पना राबवणे म्हणजे समाजाला अनामिक भीतीच्या दडपणाखाली ठेवून मेंदूची कवाडे बंद करायला लावणे होय. यातूनच कर्मविपाक सिद्धांत आणि नशीब, प्राक्तनासारख्या माणसाला गुलाम आणि प्रयत्नवादापासून दूर नेणाऱ्या कल्पना वाढीस लागून जनमानसात ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ अशा नापाक वृत्ती वाढीस लागून संपूर्ण भारतीय समाजाचे आजवर प्रचंड नुकसान झालेले आहे.
धर्ममरतडांनी धार्मिक अंधश्रद्धा जनमानसात रुजवण्याऐवजी जर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही विवेकवादी मूल्ये रुजवली असती तर आज भारतात शोषणरहित समाज निर्माण झाला असता. धर्मश्रद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाला फाटा दिल्यामुळे आज भारतीय मानसिकता पूर्वजांच्या आभासी वैज्ञानिकतेचे गोडवे गाण्यात धन्यता मानायला लागली आहे. परिणामी जे काही थोडे वैज्ञानिक संशोधन आपल्याकडे झाले होते, तेही खुंटले. श्रद्धेच्या नावाखाली चिकित्सेला बंदी घातली गेली आणि बुद्धिवाद गहाण पडल्यामुळेच भारत गेली हजार वर्षे गुलामीत खितपत पडला. म्हणूनच धार्मिक श्रद्धांतून आलेले ‘सांस्कृतिक ऐक्य’ जसेच्या तसे समजून घेण्यात शेषरावांना बुद्धिवाद दिसणे हा बुद्धिभेद आहे. हे आपण जेवढय़ा लवकर समजून घेऊ , तेवढय़ा लवकर धार्मिकतेच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडू.
– जगदीश काबरे, नवी मुंबई.

याला सांस्कृतिक ऐक्य म्हणणे हास्यास्पद
समाजातील एका वर्गाने स्वत:च्या पिठय़ान पिठय़ांना आयते बसून खाण्याची जी योजना केली, त्याला शेषराव मोरे भूमीवरील प्रेमाची आणि सांस्कृतिक एकात्मतेची योजना असे म्हणत आहेत.
सात पर्वतांना तपस्येसाठी योग्य मानले, परंतु शूद्रांना तपस्येचा अधिकारच नाही. पवित्र नदीत पापे धुतली जातील, परंतु उच्चवर्णीयांना वरचे घाट आणि शूद्रांना खालचे घाट. असे नियम असताना- माणसांना एकमेकांप्रतीच बंधुभाव नसताना- भारतवर्षांप्रती प्रेम कसे निर्माण व्हावे?
आणि सांस्कृतिक ऐक्याचे म्हणाल तर उत्तरेचे लोक ज्या बळीराजाला मारणाऱ्या वामन अवतारातील विष्णूची पूजा करतात, त्याच बळीराजावर दक्षिणेचे लोक जीवापाड प्रेम करतात आणि पुन्हा त्याचे राज्य यावे अशी प्रार्थना करतात.
स्वतला नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणाऱ्या शेषरावांना वाटते कि, कैलासात शिव आणि विष्णूने तपश्चर्या केली, गंगेच्या पाण्यात पापे धुवून निघतात, त्रिशूळाने सरोवर उत्पन्न केले, विष्णूचा वराह अवतार, या असल्या भाकड कथा लोकांना लुबाडण्यासाठी रचल्या नसून, लोकांनी या भूमीवर प्रेम करावे आणि त्यांच्यात एकी नांदावी यासाठी रचण्यात आल्या. हे असे वाटणे एकतर हास्यास्पद तरी आहे किंवा नास्तिक असणारे शेषराव मोरे देखील त्या भाकड कथा रचणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत असे वाटते.
– अमित जोजारे, नाशिक

कोण हे विद्युत निरीक्षक?
‘विद्युत निरीक्षकांच्या नाकर्तेपणामुळे वीज अपघातग्रस्त न्यायापासून वंचित’ ही बातमी (लोकसत्ता, २६ एप्रिल) वाचून धक्काच बसला. हा वीज निरीक्षक कोण असतो? त्याची नेमणूक कोण करतो? लोकांवर अन्याय करण्याचे अधिकार त्याला कोणी दिले? हे तर माकडांच्या हातात कोलीत देण्यासारखेच आहे. हा निरीक्षक जर कर्मचारी असेल तर त्याच्यामुळे अपघातग्रस्त यांचे जीवन कसे सुरक्षित राहील? आणि त्याने केलेल्या कर्तव्यातील अक्षम्य चुकीची दखल त्याच्या वरिष्ठांनी कशी घेतली नाही? या सर्व गोष्टींसाठी कोण जबाबदार आहे? हा अन्याय अजून किती वर्षे चालेल? विद्युत मंडळाचे अध्यक्ष व इतर सदस्य याची दखल केव्हा घेणार? न्यायालयाने हा मुद्दा का विचारात घेतला नाही? की खासगीकरण आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी यांची ही मिलिभगत आहे?
या गोष्टींचा खुलासा व्हावा, अशी अपेक्षा आहे.
– गजानन वायकुळे, पुसद.

खेळून तरी हरायचे होते..
लहान मुलांच्या क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर बाद होणाऱ्याने ‘ट्रायल बॉल’ होता असा हट्ट धरला की बॉलर उदार असेल तर पुन्हा बॅटिंग मिळते, हा सर्वाचाच अनुभव असतो. पण ही ‘ट्रायल बॉल’ची पद्धत भारताने जेव्हा चीनसारख्या खेळाडूच्या विरोधात वापरली, तिथे भारताचे चुकले की काय अशी काळजी वाटते. चीनमधील विगूर बंडखोरांचे नेते डोल्कून इसा यांचा भारतीय व्हिसा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ही चीनसमोर सपशेल शरणागतीच होय. एक म्हणजे व्हिसा कायम ठेवण्याची बिशाद नव्हती तर गेले दोन दिवस भारताने डोल्कून इसा यांना व्हिसा देऊन चीनला सणसणीत चपराक लगावल्याचे सोंग घेण्याची काही गरज नव्हती. दुसरे, अजहर मसूदच्या ठरावास संयुक्त राष्ट्रांत पाठिंबा देतो, एकदा इसा यांचा व्हिसा रद्द करा असा व्यवहार झाला असेल तरीही तो आपला राजनैतिक पराभवच ठरतो. कारण दुसरी शक्यता खरी मानल्यास चीनला जागतिक पातळीवर भारताची कोंडी करण्यास आपण प्रोत्साहित करत आहोत. म्हणजे भारताने चीनला शह देऊ नये म्हणून चीनने नेहमी भारताची जागतिक व्यासपीठांवर कोंडी करून ठेवावी असा संदेश चीनला जाईल.
त्यामुळे एकदा दंड थोपटले होतेच तर भारताने निदान हा राजकीय सामना खेळून हरायचे होते. सुरुवातीला व्हिसा देण्याचा ‘ट्रायल बॉल’ खेळून भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण चीनसमोर अजूनही ‘कच्चा लिंबू’ आहोत याचेच प्रदर्शन केले आहे.
– किरण बाबासाहेब रणसिंग, नवी दिल्ली.

चीनचा रोष पत्करणारा देशाभिमान!
चीनच्या लेखी बंडखोर असलेले नेते इसा यांना व्हिसा प्रदान करून भारत सरकारने आपला कणखरपणा दाखवला असे म्हणेपर्यंत दुसऱ्या दिवशी चीनने डोळे वटारल्याने दिलेला व्हिसा रद्द करण्यात आला.
याउलट, चीनने तिबेट ताब्यात घेतला तेव्हा दलाई लामा आश्रयासाठी भारतात आले व चीनचा रोष पत्करूनही त्यांना त्यावेळच्या काँग्रेस सरकारने आश्रय दिला. त्यामुळे प्रखर देशाभिमानी कोण, असा प्रश्न पडल्यास नवल नाही.
– ओम पराडकर, पुणे.

अशा समारंभांत काय निरसपणे बोलायचे?
‘चालायचेच.. चरायचेच..’ हे पत्र (पूर्णपणे उपरोधिक आणि नकारात्मक विचारांचे वाटले. रामभाऊ नाईक यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभातील सर्वच वक्ते राजकारणातील अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेले नेते आहेत. एवढेच नव्हे तर खुसखुशीत वक्तृत्वशैलीकरिता प्रसिद्ध आहेत. अशा समारंभांमधून वक्त्यांनी निरसपणे बोलणे अपेक्षित नाही. सरकारी खर्चाने संरक्षण घेऊन राणा भीमदेवी थाटात बोलणाऱ्या नेत्यांपेक्षा हे नेते कधीही चांगले. रामभाऊ नाईकांसारख्या सुसंस्कृत व्यक्तीबद्दल पत्रात व्यक्त केलेले मत मला पूर्णपणे अयोग्य वाटले.
– सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>