‘माध्यमांचा सामना’ हा अग्रलेख (१७ फेब्रु.) वाचनीय आहे. आपणच एक मुद्दा अधोरेखित केला आहे की ‘वर्तमानपत्राची मालकी, संपादकपद आणि राजकीय सीमारेषा यांचे नियमन करणारी काहीही व्यवस्था नसल्याने त्याचा सर्रास दुरुपयोग सातत्याने केला जातो.’ हा खूप समर्पक आहे, जो अनेक वर्षांपासून अबाधितपणे राबविला /अमलात आणला जातो.

राजकारण्यांचे दबावतंत्र/पैशांचा अनेक मार्गानी निर्माण होणारा स्रोत, पत्रकारितेची उखळ पांढरे करून घेण्याची वैयक्तिक आणि सामूहिक मानसिकता, सामान्य समाजाची अनभिज्ञता आणि उदासीनता, हितसंबंधांची लबाड हातमिळवणी, शासकीय अंमलबाजवणीचा मिंधेपणा वगैरे याला जबाबदार आहे.  माध्यमांचा वापर हा बाजारू आणि विकाऊ  असल्यामुळे हे साधन स्वार्थ साधण्यासाठी कधीही कायदाच्या चौकटीत बंदिस्त केले जाणार नाही, पळवाटांना चौखूर पर्याय ठेवले जातील, जे आजही निर्धोकपणे वापरले जात आहेत. तेव्हा स्वसंयम, स्वविवेक, स्वसर्जनशीलता असे बरेच काही आचरणात आले तर माध्यमे ही खरी जनजागृतीची साधने म्हणून उदयास येतील.

 -किरण इनामदार

 

आमंत्रणाच्या प्रथेचाही पुनर्विचार व्हावा

‘माध्यमांचा सामना’ हा अग्रलेख (१७ फेब्रु.) वाचला. निवडणुकीचा प्रचार बंद झाल्यापासून ते नवीन सत्तास्थापना होईपर्यंतचा काळ धूसर असतो. त्या काळात हितसंबंधीयांची स्वत:ची माध्यमे काय छापतात, त्या संबंधात नियमन असणे गरजेचेच आहे.

मतदानावर परिणाम होऊ  नये म्हणून कल-चाचणी घेणे वा त्याचे निकाल प्रसारित करणे यांवरही काही काळ बंधने असतात. नवीन प्रतिनिधी निवडून आले तरी त्यांनी बहुमताने नवीन सत्ताप्रमुखाची निवड करेपर्यंत सत्तास्थापनेची प्रक्रिया अपूर्णच असते. तामिळनाडूमध्ये एकाच पक्षाच्या दोन तुकडय़ांमध्ये जे काही झाले ते पाहता राज्यपालांनी एका कोणाला तरी सत्तास्थापनेचे आमंत्रण देण्याच्या प्रथेतही बदल आवश्यक वाटतो. टोकाची स्पर्धा असताना केवळ विविध प्रतिनिधींच्या भेटीगाठींच्या आधारावर राज्यपालांनी एकाला आमंत्रण दिल्याने त्याच्या पारडय़ात वजन टाकल्यासारखे होते. कल-चाचणीचे निकाल वाचून जसा सामान्य मतदारावर परिणाम होऊ  शकतो अगदी तसाच परिणाम ‘कोणाला आमंत्रण मिळाले’ हे पाहून लोकप्रतिनिधींच्या विश्वास ठरावावरील मतदानावरही नक्कीच होऊ  शकतो. असे करण्याऐवजी जे कोणी बहुमताने सत्तास्थापनेचा दावा करत आहेत, त्यांना सर्वानाच एकाच प्रतलावर संबंधित प्रतिनिधीगृहासमोर मतदानाला सामोरे जाण्यास सांगणे जास्त सयुक्तिक वाटते.

-प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

 

बाजारू आणि ओंगळवाणे

‘माध्यमांचा सामना’ हा अग्रलेख राजकीय पक्ष आणि वृत्तपत्रे यांच्या संबंधावर नेमके भाष्य करतो. पेड न्यूज या गंभीर मुद्दय़ावरही यातून चांगला प्रकाश टाकला आहे. राजकीय पक्षांची वृत्तपत्रे असणे याला आपल्याकडे मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या लेखणीचा प्रभावी आणि विधायक वापर राजकीय पक्षांनी केलेला आपण पाहिला आहे, पण सध्या मात्र हे स्वरूप बाजारू आणि ओंगळ झाले आहे. पेड न्यूज हा प्रकारही केवळ निवडणुकीपुरताच मर्यादित नाही तर आपल्या माध्यम क्षेत्राला हा  कायमचाच जडलेला आजार आहे.  व्यवसाय, उद्योगजगताच्या खास बातम्या, ठळक उल्लेख, मोठी छायचित्रे यातूनही या आजाराची लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. केवळ पैसे एवढय़ापुरते पेड न्यूज हे प्रकरण मर्यादित नसते तर व्यावसायिक हितसंबंध जपणे हाही याचाच एक प्रकार आहे. छापून आलेले सगळे खरे असते असे वाचकांना वाटते, या गृहीतकातून हे असे प्रकार होताना दिसतात.

-देवयानी पवार, पुणे

 

नेहरूंच्या दूरदृष्टीचे हे फळ!

इस्रो या संस्थेने १०४ उपग्रह सोडण्याचा अनोखा विक्रम केल्याने देशवासीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. अशा वेळी नवभारताची उभारणी करताना अतिशय दूरदृष्टी असलेले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्मरण झाले. युरी गागारीन १९६१ मध्ये पहिला अंतराळवीर ठरला आणि काळाची पावले ओळखून नेहरूंनी विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनानुसार १९६१ मध्ये ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च’ची स्थापना करून बीज रोवले. त्यातून १९६९ मधे इस्रो हे रोपटे उगवले, ज्याची फळे आम्ही अभिमानाने चाखत आहोत.

-डॉ. कैलास कमोद, नाशिक

 

हेच आयुष्याचे खरे आधार

‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसट असते’, ‘श्रद्धा असायला हवी, पण अंधश्रद्धा नको’, ‘आमची श्रद्धा डोळस आहे’, ‘श्रद्धेशिवाय जगणे अशक्य आहे’, फक्त ती आधी तपासून घेतलेली असावी’ अशी विधाने अनेकदा  वाचण्यात येतात. ही सर्व खरे पाहता वदतोव्याघाताची उदाहरणे आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काहीही फरक नाही. एखादा विचार, कल्पना वा सिद्धान्त यांचा जेव्हा डोळे मिटून स्वीकार केला जातो, प्रश्न विचारण्याची वा शंका उपस्थित करण्याची मुभा दिली जात नाही तेव्हा अशा विचार, कल्पना वा सिद्धान्तावरील विश्वासाला ‘श्रद्धा’ असे म्हणतात. ‘तपासून घेणे’ ही क्रियाच श्रद्धेमध्ये संभवत नाही.

शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिमाहात्म्य, बाबावाक्यम् प्रमाणम् इ.विश्वासाचे सर्व प्रकार हे ‘श्रद्धे’तच अंतर्भूत आहेत. नुसता विश्वास वेगळा. पण श्रद्धा ही आंधळीच असते. तिला ‘अंध’ हे वेगळे विशेषण लावण्याची गरज नाही. तर्कशुद्ध विचार, चिकित्सक बुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन हेच आयुष्याचे खरे आधार मानायला हवेत.

-भालचंद्र काळीकर, पुणे

 

आता मतदान न करणे गुन्हा ठरणार?

राज्यातील सगळ्या सहकारी गृहसंस्थांनी निवडणुकीआधी विशेष सभा घेऊन मतदानाचे आवाहन करावे, महत्त्व सांगावे, हा आदेश कोणाच्या सडक्या मेंदूतून आला? असे न केल्यास संचालक मंडळ बरखास्त? म्हणजे आता मतदान न करणे गुन्हा ठरणार?

– सुधीर केशव भावे, जोगेश्वरी (मुंबई)