‘व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था बंद करण्याचे षड्यंत्र’ हे वृत्त (लोकसत्ता, २१ ऑगस्ट) वाचले. शालेय शिक्षण सचिवांचे संस्थेवरील आरोप हे धादान्त खोटे असून त्यात ती बंद करण्याचे षड्यंत्र हे म्हणजे शालेय शिक्षण विभागाच्या ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’चे ज्वलंत उदाहरण आहे. या संस्थेचे कार्य अतुलनीय असल्याचे गेली वीस वर्षे  जवळून अनुभवास आलेले आहे. शालेय समुपदेशन क्षेत्रातील ही एकमेव शासकीय संस्था विद्यार्थी आणि पालकांचे ६७ वर्षे समुपदेशनाचे कार्य करत आहे. याबाबत शिक्षण सचिव उघडपणे डोळेझाक करत आहेत असे प्रकर्षांने वाटते. संस्था ‘केजी’ ते ‘पीजी’च्या विद्यार्थी आणि पालकांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक समस्या सोडविण्याचे महत्तम कार्य अव्याहतपणे १९५० सालापासून करत आहे याचे हजारो साक्षीदार आहेत. एकीकडे ब्ल्यू व्हेलसारख्या आत्मघातकी आणि महाविद्यालयीन प्रवेशाच्या जटिल समस्येतून बालमानस जात असताना शासनास ही संस्था बंद करण्याचे सुचावे, ही ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’च म्हणावी लागेल.

जयवंत कुलकर्णी, नेरुळ, नवी मुंबई.

 

मूर्तीही अखेर मध्यमवर्गीय मानसिकतेचे?

विशाल सिक्का यांचा राजीनामा, नारायण मूर्ती यांची इन्फोसिस संचालक मंडळावरील टीका आणि तत्पूर्वीचा गिरीश कुबेर यांचा ‘अन्यथा’ या सदरातील ‘म्हणून तुलना करायची’ हा लेख. या सर्व पाश्र्वभूमीवर, आमच्या वेळी नववीच्या मराठीच्या पाठय़पुस्तकात असलेला संत तुकारामांचा ‘आवा चालली पंढरपुरा’ हा अभंग आठवला. अभंगात एक सासू (संन्यस्त जीवनाचे प्रतीक म्हणून) पंढरपुरास जायला निघाली आहे; पण सुनेला सांसारिक जीवनातल्या अगणित सूचना दिल्याशिवाय तिचा पाय निघत नाही. सून शेवटी वैतागून ‘आता तुम्ही नि:शंकपणे निघा आणि इथली काळजी करू नका’ असे तिला सुनावते. त्याचा परिणाम मात्र उलटाच होतो! संसाराचे पाश सोडवू न शकल्याने सासू ‘माझे येथेचि पंढरपूर’ असे म्हणत यात्रेचा कार्यक्रमच रद्द करून टाकते!

असेच काहीसे इन्फोसिस प्रकरणात होताना दिसत आहे. मूर्ती एकीकडे आपण २०१४ मध्ये स्वखुशीने पायउतार झाल्याचे सांगतात; परंतु आपल्या पुढची पिढी कंपनीचा शकट योग्य प्रकारे हाताळेल, हा विश्वास त्यांना नाही आणि कंपनीपासून संपूर्ण विरक्ती घेण्याचे धाडसही नाही. नव्वदीच्या दशकात आपल्या वेगळेपणामुळे मध्यमवर्गीयांचे ‘हिरो’ ठरलेले मूर्ती त्याच मध्यमवर्गीय मानसिकतेचे बळी ठरताना पाहणे दु:खद आहे.

परेश वसंत वैद्य, गिरगाव, मुंबई

 

सिक्का यांना विरोध का?

‘गलेलठ्ठ पगारालाही मर्यादा हवी’ या पत्रात (लोकमानस, २१ ऑगस्ट)  मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांच्या दातृत्वाचा उल्लेख आहे, पण आपली गैरकृत्ये (‘अँटिट्रस्ट कायद्या’चा भंग) लपविण्यासाठीच गेट्सने मोठय़ा देणग्या देऊन आपली कातडी वाचवली आणि वरती आपण फार मोठे काम करतो असे मिरवतात, ही दुसरी बाजूदेखील पाहावी.

नारायण मूर्तीवर अग्रलेखातही अन्याय्य उपहास केला आहे. ‘मूर्ती’भंजन करावे; पण सिक्का यांनी स्वत:ला आणि काही थोडय़ांना भरमसाट पगार, बोनस यांची खिरापत वाटली आणि कनिष्ठांना अत्यल्प पगारवाढ दिली, वर कर्मचारीकपात सुरू केली, ज्याला मूर्तीचा विरोध आहे. मूर्तीकडे किती टक्के समभाग आहेत हे बघावे आणि मग ‘मूर्ती’भंजन करावे.

सुधीर केशव भावे, जोगेश्वरी पूर्व (मुंबई)

 

भीष्माचार्य हतबल होत आहे..

विशाल सिक्का  यांचे  प्रचंड वेतन हेसुद्धा त्यांच्या जाण्यामागे  एक कारण होते, पण जेव्हा या माणसाने राजीनामा दिला तेव्हा ‘इन्फोसिस’चे मार्केट कॅप कित्येक हजाराने कमी झाले. सिक्का किती वजनदार होते याची तेव्हाच त्यांच्या अंतर्गत विरोधकांना जाणीव झाली असेल.  ‘‘मूर्ती’पूजा आणि ‘मूर्ती’ भंजन’ (२१ ऑगस्ट) या अग्रलेखाने मूर्ती यांना खलनायक न ठरवता ते कुठे  चुकले व कुठे कमी पडले, तसेच  भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील हा भीष्माचार्य आता कसा हतबल होत आहे , ज्या गतीने तंत्रज्ञान बदलत आहे ती गती या प्रवर्तक मंडळीनी कशी गमावली आहे ते या विवेचना वरून दिसते. ‘ सिक्का नंतर कोण?’ याचे उत्तर सुद्धा सध्या मिळत नाही यातूनही  सिक्का यांचे उजवेपण  दिसून येते.

रॉबर्ट लोबो , सत्पाळा (विरार)

 

रेरावरही कालमर्यादेची बंधने हवीत..

‘रेरा नोंदणी नसल्यास..’ (लोकसत्ता २१ऑगस्ट) या वृत्तानुसार ज्या विकासकांनी महारेरा या नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी केली नसेल त्यांना व सदनिका खरेदीदारांना बँका कर्ज देणार नाहीत, असे म्हटले आहे. ही वस्तुस्थिती आहे. ‘रेरा नोंदणी’ हा बांधकाम व्यवसायात परवलीचा शब्द झाला आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायातील गैरव्यवहार दूर होऊन ग्राहकाला किती दिलासा मिळेल हे भविष्यात सिद्ध होईलच, कारण अशी नियामक प्रधिकरणे यापूर्वी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, त्यांची अवस्था लक्षात घेतली तर महारेराची त्यात भर पडून सामान्यांचा भ्रमनिरास होऊ  नये. या संदर्भात महारेराच्या कार्यपद्धतीत असलेला एकतर्फीपणा लक्षात आणून दिला पाहिजे.

तो असा की, ज्यांचे गृहप्रकल्प सुरू आहेत अशा स्थितीतील विकासकांवर ३१ जुलैच्या आधीच नोंदणी करणे बंधनकारक केले होते, अन्यथा दंडाची तरतूद होती. त्यामुळे अनेक विकासकांनी त्यांच्या सल्लागारांना भरमसाट पैसे मोजून प्रकल्प रेराकडे नोंदविले. परंतु योग्यरीत्या नोंदविलेल्या प्रकल्पांना किती दिवसांत नोंदणी क्रमांक द्यावा, याविषयी महारेराचे मात्र स्वत:वर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे विहित मुदतीत नोंदविलेल्या अनेक प्रकल्पांना आज २२ दिवस संपूनसुद्धा नोंदणी क्रमांक मिळाला नाही. तसेच कधी मिळणार याबाबतीत सूचना देणारी कोणतीही कार्यपद्धती महारेराच्या संकेतस्थळावर नाही. अशा स्थितीत एखादी प्रलंबित यादी जाहीर करून महारेराने पारदर्शकता आणावी, कारण त्यासाठीच तर या यंत्रणेची निर्मिती केली आहे. तसेच ज्या ग्राहकांच्या हिताकरिता हे नियामक स्थापन झाले आहे, या प्रलंबित प्रकल्पातील ग्राहकसुद्धा मेताकुटीला आले असणार, कारण आता त्याची बँकसुद्धा त्याला नोंदणी क्रमांक नसल्याने उभे करत नाही; मात्र त्याच्या भरलेल्या पैशावर व्याज मात्र सुरू आहे. एकूणच हे नियामक नैसर्गिक न्यायाने समोरच्यावर बंधने घालत असेल तर काही बंधने स्वत:लासुद्धा घालून घेईल तर न्यायोचित ठरेल.

मनोज वैद्य, बदलापूर

 

प्रश्न एकता, एकात्मता, बंधुता टिकवण्याचा..

‘इंडियाऐवजी भारत करण्यात गर काय?’ हे ‘लोकमानस’मधील पत्र (२१ ऑगस्ट) वाचले. त्यात ‘हिंदुस्थान’चाही उल्लेख आहे. संबंधित पत्रात लेखकाने मांडलेले विचार व्यावहारिकदृष्टय़ा सरळसोपे आहेत, पण वैचारिकदृष्टय़ा इतर नागरिकांना (िहदू समाज वगळता) त्याला स्वीकारण्यास थोडी संभ्रमाची अवस्था निर्माण होऊ शकते. संबंधित नामकरण त्याचा मूळ आधार किंवा स्रोत काय याचा विचार केला तर ते शक्य आहे. (भारत शब्दाची उत्पत्ती ‘भरत’ या मूळ संस्कृत शब्दापासून असून तो एक विशिष्ट धर्माधिष्ठित राजाच्या नावावरून निर्मिला आहे.) परकीय राजवटीने केलेले नामकरण (इंडिया) याला आपला विरोध असेल, तर ‘िहदुस्थान’ या नावालादेखील आपला विरोध असायला हवा. (ते नाव ज्यापासून आले, तो ‘हिंदुस्तान’ हा शब्द या देशासाठी वापरणारे मुस्लीम आक्रमक हेदेखील परकीय होते.) वरील सर्व नामकरणे ही इतिहासातून उगम पावलेली आहेत. आज भारत देश एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही देश आहे. (‘धर्मनिरपेक्ष’चा अर्थ : ‘भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, तसेच धर्मविरोधीसुद्धा नाही. म्हणजेच भारतात कोणताही राज्यधर्म नाही’ असा इथे अपेक्षित आहे.) जागतिक पातळीवर फक्त सोयीचे अर्थकारण व परराष्ट्रनीती विचारात घेतली जाते हे अगदी बरोबर; पण देशाच्या नावाशी संबंधित मूळ प्रश्न हा जागतिक पातळीवरचा नसून देशाच्या अंतर्गत परिस्थितीमध्ये सांप्रदायिकतावाद निर्माण होईल त्याचा नव्हे का?

अशा परिस्थितीचे संभाव्य परिणाम जाणूनच बहुधा, आपल्या घटनाकारांनी संबंधित मुद्दय़ाचा स्पष्ट (लिखित) उल्लेख केलेला आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद १ (१)  नुसार ‘इंडिया, अर्थात भारत’ असे आपल्या देशाचे नाव असल्याचे नमूद आहे. अशा वेळी नामकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षेने सिद्ध काय होणार? की नामकरणाच्या मिषाने धर्मनिरपेक्षतेला धक्का लावायचा आहे? याचे आत्मपरीक्षण अवश्य करावे!

–  अविनाश विलासराव येडे, परभणी

 

आइनस्टाइनला नोबेलपुंजसिद्धान्तासाठी नव्हे

‘अणूपासून अस्तित्वापर्यंत’ हे शशिकांत सावंत यांनी लिहिलेले पुस्तक-परीक्षण (बुकमार्क, १९ ऑगस्ट) वाचले. एका अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाचा हा परिचय आहे. परंतु लेखात एक छोटी पण महत्त्वाची दुरुस्ती हवी.

आइनस्टाइनला मिळालेले नोबेल पारितोषिक, ‘पुंज सिद्धांत वापरून फोटो इलेक्ट्रिक परिणामाचे स्पष्टीकरण देणे’ (एक्स्प्लनेशन ऑफ द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट यूजिंग द क्वान्टम थिअरी) यासाठी मिळालेले होते. पुंज सिद्धांतासाठी नव्हे. गंमत म्हणजे आइनस्टाइनने पुंज सिद्धांत मांडलेला नव्हता आणि फोटो इलेक्ट्रिक परिणामही शोधलेला नव्हता. तरीही त्याला हे सर्वोच्च पारितोषिक मिळाले याचे कारण शोधण्यासाठी थोडे इतिहासात डोकवायला हवे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात भौतिकशास्त्राच्या जगात खूप अस्वस्थता पसरलेली होती. याचे कारण म्हणजे भौतिकशास्त्रातील काही प्रयोगांच्या निष्कर्षांचे स्पष्टीकरण भौतिकशास्त्रातील तेव्हा अस्तित्वात असलेल्या नियम/सिद्धांतांच्या आधारे मिळत नव्हते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर भौतिकशास्त्राचे तेव्हा असलेले ज्ञान तोकडे पडत होते. म्हणजे भौतिकशास्त्राला संपूर्णपणे नव्या असलेल्या ज्ञानाची गरज भासू लागली. ही क्रांती घडली १९०० साली. या वर्षी मॅक्स प्लांक यांनी पुंज सिद्धांत मांडला, पण हा सिद्धांतसुद्धा बरोबर आहे की नाही याविषयी शास्त्रज्ञ साशंक होते. अशा परिस्थितीत आइनस्टाइनने हा सिद्धांत वापरून फोटो इलेक्ट्रिक परिणामाचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे पुंज सिद्धांताला मोठे बळ मिळाले. भौतिकशास्त्रात एक नवे दालन खुले झाले. पुंज यामिकी (क्वान्टम मेकॅनिक्स) वापरूनच आपण अणू, परमाणू आणि त्यातील सूक्ष्म कणांचा अभ्यास करू शकतो. आज झालेल्या इ(लेक्ट्रॉनिक)-क्रांतीच्या मुळाशी पुंज सिद्धांत आहे ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी.

डॉ. गिरीश पिंपळे, नाशिक.

loksatta@expressindia.com